टॉप न्यूज

दिवस पाडव्याचा, शेतीच्या बजेटचा!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा दिवस भारतीय नववर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. शालिवाहन शके या दिवसापासूनच सुरू झालं. 14 वर्षांचा वनवास संपवून रावणाचा पराभव करून श्रीप्रभुरामचंद्र याच दिवशी अयोध्येला परतले. या पारंपरिक गोष्टी आपणाला माहीतच आहेत. पण आपल्या कृषिप्रधान महाराष्ट्रात गुढीपाडव्याला आणखीन एक महत्त्वाचं स्थान आहे. ते म्हणजे, बळीराजाचं आर्थिक वर्ष (फायनान्शियल इअर) याच दिवशी सुरू होतं. शेतकरी राजा संपलेल्या रब्बी हंगामाची आकडेमोड करून येणाऱ्या खरीपाची बेगमी करण्याचा मुहूर्त गुढीपाडव्यालाच करतो. अगदी सालगड्यापासून ते इतर सर्वांची देणी चुकती करण्यापासून ते येणी मिळवण्यासाठीची धावाधाव तो करत असतो. 

 Bail Bazar 1 11

शेतकऱ्याचा लेखाजोखा

बँकेच्या लेखी जेवढं 31 मार्चचं महत्त्व तेवढंच शेतकऱ्याला गुढीपाडव्याचं. पावसाळ्यानंतर खरीपाची पिकं दारी आली की बळीराजाची धावपळ सुरू होते रब्बीची. रब्बीची पेरणी उरकल्यानंतर त्याला कुठेतरी थोडीशी उसंत मिळते. मग सुरू झालेल्या यात्राजत्रांच्या हंगामात तो जीवाची करमणूक करून घेतो. गावचं गावपण जसं हरवतंय तशी शेतकऱ्याची जास्तच पंचाईत व्हायला लागलीय. आता गावात लोहार आहे तर सुतारकाम करणारं कुणी नाय. शेतात काम करण्यासाठी माणूसच मिळत नाही. सालगड्याची बातच सोडा. कारखान्याचं बिल सुटलं, तसंच माळवं बाजारात लावून गाठीशी आलेल्या पैक्याचा लेखाजोखा मांडून त्याला खरीपाची मोट बांधायची असते. त्याचा शुभारंभ आजही बहुतांश शेतकरी गुढीपाडव्यालाच करतात. नाही म्हणायला, शेतकऱ्यांचीही ती परंपराच बनलीय.

 

बारा भानगडी
मध्यमवर्गीय लोकांसारखा शेतकऱ्याचा हिशेब किराणा, दूध, केबल, फोन असा महिन्याच्या खर्चासारखा टिपिकल नसतो. तो सालभराचाच असतो. अगदी पोळ्याला बैलांची शिंग तासून घेतल्याचं पैसंही त्याला चुकतं करायचं असत्यात. ट्रॅक्टरचं भाडं चुकवायचं असतं. उसाला सोसायटीतून वेळेत खत मिळालं नाही म्हणून घरातल्या कारभारणीच्या अंगावरचा डाग गहाण टाकून त्यानं ती नड काढलेली असते. त्याचं व्याजासहित देणं देऊन कारभारणीला दिलेला शब्द खरा करायचा असतो. अशा बारा भानगडी त्याला बघायच्या असत्यात. गत वर्षातला हिशेब गुढीपाडव्याला संपला की परत मोकळा श्वास घ्यायला तो रिकामा होतो.


gudipadva 4सालगड्याचा शुभारंभ गुढीपाडव्यालाच
अगदी अलीकडं दहा-पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्याचं आर्थिक कॅलेंडरच मुळी गुढीपाडव्यानंतर सुरू व्हायचं. एकूणच परिस्थितीमुळं आता त्यात हळूहळू बदल होताना दिसतोय. तरीही आजही बहुतांश शेतकरी गुढीपाडवाच प्रमाण मानून आर्थिक बेगमी करतात, अशी माहिती इटकरे (जि. सांगली) इथले शेतकरी पांडुरंग यादव यांनी दिली. आजही सालगड्याचं देणं चुकतं करणं किंवा नवीन सालगडी ठेवण्याचा शुभारंभ पाडव्यालाच केला जातो, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

 

सालगड्याचं महत्त्व
शेतकरी शेतीच्या कामासाठी वर्षाच्या बोलीनं गडी ठेवतो. त्यानं वर्षभर शेतातील कामं करायची. त्याबदल्यात त्याला ठरलेला मोबदला, तसंच राहणं, जेवणखाण या त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण करायच्या, असं ठरलेलं असतं. हा व्यवहार लेखीठाकी नसतो. शब्दावर. पश्चिम महाराष्ट्रात याला चाकरीचा गडी असंही म्हटलं जातं.

 


gudipadva 2सालगड्याचं अर्थशास्त्र

एकेकाळी जित्राबांसहित कुटुंबाचं खाणपिणं तसंच वर्षाच्या शेवटी घोंगडी अन्‌ कातडी जोडा इनामी, एवढ्यावर सालगडी मिळत होता. शेतीमाल उत्पादनात असमतोल, पावसाचे घटतं प्रमाण आणि एकूणच बदललेल्या परिस्थितीमुळं सालगड्याच्या वार्षिक वेतनात 45 हजारांपर्यंत वाढ झालीय. यामुळं शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. एवढं करूनही उचलपोटी अर्धी रक्कम कामावर येण्यापूर्वी द्यावी लागत आहे.

 

पद्धत बदलतेय
सालगडी असला तरी शेतकरी त्याला घरच्या माणसाप्रमाणं वागणूक देत होता. विशेषतः लग्नसमारंभातून मूळ पत्रिका देऊन कपड्यांचा आहेरही सालगड्याला दिला जात होता. अलीकडं सालगडी ठेवण्याच्या पद्धती बदलू लागल्यात. दर वाढल्यानं रब्बी, खरीप हंगामापुरता किंवा बऱ्याच ठिकाणी आता महिन्याच्या वेतनावर सालगडी ठेवला जात असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या नदीकाठच्या गावासाठी सालगड्याचं वेतन 40 ते 45 हजार रुपये, तर डोंगरमाथ्याचे, खरीप हंगामी क्षेत्रातील सालगडी 25 ते 30 हजार रुपये असे आहेत.


gudipadva 1पंचाग वाचन
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचून पिकपाण्याचा अंदाज घेण्याची परंपराही शेतकरी जोपासताना पाहायला मिळतो. पंचांगात दिलेल्या पाऊसकाळाच्या माहितीला अनुसरून द्राक्ष, ऊस, गहू, ज्वारी आणि इतर पिकांच्या आणेवारीचा अंदाज शेतकरी काढतो. पिकांची जात, रास आणि गुरूबल यावरून पंचागात पिकपाण्याचा अंदाज दिलेला असतो. हा शेतकरी त्यावर आजही विश्वास ठेऊन त्याप्रमाणं पिकांची आणि शेतीच्या कामाची बेगमी करतो. ज्या शेतकऱ्यांना वाचता येत नाही ते गावातील ब्राह्मणाकडं किंवा जंगमाकडं जाऊन पंचांग समजावून घेतात. पंचांगातील पाऊसकाळाचे अंदाज 70 ते 80 टक्के खरे ठरतात, असं ज्योतिषशास्त्री यजुर्वेद केळकर यांनी सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.