टॉप न्यूज

गुढ्या नाना रंगाच्या, गुढ्या नाना ढंगाच्या!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवसंवत्सराची सुरुवात. उंच बांबूला नवीन वस्त्र, तांब्याचा, चांदीचा कलश, साखरेची माळ आणि सोबत न चुकता कडुनिंबाचा डहाळा लावून उभारलेली गुढी म्हणजे अभिमानाचं प्रतीक. पाडव्याला अवघ्या महाराष्ट्रात कुठंही जा, गगनाची शोभा वाढवणाऱ्या या गुढ्या घराघरांवर दिसणारच. पण मुलुखाप्रमाणं गुढ्यांचे रंग बदलतात, सण साजरा करण्याच्या परंपरा बदलतात. अर्थात या विविधतेतही आहे अनोखी एकता, समता आणि बंधुता...

 

Picture513

 

 

विदर्भातील साखरकडं

vidarbha mapभंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली : पूर्व विदर्भावर छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश यांचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळं या भागात गुढीपाडव्याचं तेवढं प्रस्थ नाही. बुलडाण्याला गुढी उभारल्यावर तिला कडुनिंबाचा मोहर, आंब्याचा टाळा, साखरेच्या माळा घालतात. आंब्याच्या आणि कडुनिंबाच्या टाळ्याला इथे डगळा म्हणतात. या व्यतिरिक्त काही ठिकाणी गुढीवर साखरकडं घातलं जातं. हे साखरकडं स्थानिक लहान मुलं हातातही घालतात, कारण या ठिकाणी प्रचंड उन्हाळा असतो. त्यामुळं कधी कधी तहान लागल्यावर साखरेचं हे कडंही खाल्लं जातं. त्यामुळं उन्हापासून रक्षण करणाऱ्या या कड्याला गुढीवर चढवून त्या कड्याबद्दल आदरही व्यक्त केला जातो. त्याशिवाय हे कडं गुढीचं सौंदर्यही वाढवतं, असं बुलडाण्याच्या स्थानिक सुमन देशमुख यांनी सांगितलं. खडीसाखर किंवा गूळ याबरोबर कडुनिंबाचा मोहोर वाटून तो प्रसाद म्हणून दिला जातो. पुरणाच्या नैवेद्याबरोबर गुढीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात पूर्वी आंब्याचाही समावेश असायचा; परंतु सध्या वातावरणात मोठय़ा प्रमाणावर बदल घडत असल्यानं आता प्रसाद दाखवताना त्यात आंबा असतोच असं नाही.

 

maps 2मराठवाड्यात उमटतात गडूला डोळे
औरंगाबाद : इथंही गुढीला साखरेची माळ, कडुनिंबाचा डहाळा लावतात. पूजा इतर ठिकाणांप्रमाणेच यथासांग केली जाते. परंतु गुढीवर जो गडू लावला जातो त्यावर शुभचिन्हाचं प्रतीक म्हणून डोळे काढतात, जेणेकरून साऱ्या घरादारावर ही शुभदृष्टी राहावी.


लातूर : लातूरच्या गुढीपाडव्याला गुढीला बत्ताशांची माळ, आंब्याचा टाळा, गडू, जरीचा खण आणि फुलांची माळ घातली जाते. या ठिकाणी कडुनिंबाचा मोहोर, आंबा डाळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

 

maps 4पश्चिम महाराष्ट्रात घरोघरी पुरणपोळी
सातारा : साताऱ्यामध्ये गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत इतर ठिकाणांसारखीच आहे. पण इथलं वैशिष्टय़ म्हणजे बावधनची प्रसिद्ध जत्रा. जिल्ह्यातील अनेक गावांतील ग्रामदैवतांची जत्राही गुढीपाडव्याला असते. काही गावांमधून आंबिल गाडा निघतो आणि यात्रा ठिकाणी जाऊन तेथील दैवताला आंबीलाचा नैवेद्य दाखवण्याची परंपराही आहे. या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच.

 

कोल्हापूर : कोल्हापूरमध्येही भल्या पहाटे उठून, आंघोळ करून गुढी उभारली जाते. इतर ठिकाणांप्रमाणेच गुढीला साखरगाठ्यांची माळ, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांचा हार घातला जातो. गडू किंवा चांदीचा पेला वगैरे अशी वस्तू त्यावर घातली जाते. या गुढीला कच्ची कैरी, गूळ, कडुनिंबाचा पाला, चण्याची डाळ याचा नैवेद्य दाखवला जातो. पण हा नैवेद्य केवळ लग्न झालेले स्त्री-पुरुषच खाऊ शकतात, तो मुलांना देत नाहीत, हा या गुढीपाडव्याचा विशेष भाग.


maps 1खान्देशात होते शेताची पूजा
जळगाव : जळगावमध्येही गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत इतर ठिकाणांसारखीच आहे. मात्र खान्देशातल्या गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं गुढीपाडव्याच्या दिवशी शेताची पूजा करतात. खरीप हंगामाचा हा शेवटचा काळ असतो. एप्रिलमध्ये विश्रांतीनंतर रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकऱ्याला लागायचं असतं. त्यामुळे येणारा हंगाम चांगला जाऊ दे, अशी निसर्गदेवतेला विनंती करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी खास शेतात जाऊन काम करतात. त्या शेतजमिनीची साफसफाई केली जाते. याशिवाय घरामध्ये, उभारल्या जाणाऱ्या गुढीभोवती कडुनिंबाच्या झाडाची कोवळी पानं गुंडाळतात. ही गुढी साधारणत: अकरा-बाराच्या सुमारास घरामध्ये आणली जाते. एका पाटावर गव्हाची लहानशी रास रचतात. त्यानंतर ही गुढी आडवी केली जाते. गुढीवरचा गडू त्या राशीवर आडवा ठेवला जातो. त्या आडव्या गुढीची पूजा करतात आणि त्या गुढीला नैवेद्य दाखवतात. खान्देशातही गुढीला साखरकडं घालतात. मात्र इथे या साखरकड्याला साखर कंगन म्हणतात आणि साखरगाठ्यांना हल्ला. या हल्ला आणि कंगन यांच्या मदतीनं गुढी सजवली जाते, असं जळगावातील ललिता ताम्हाणे यांनी सांगितलं.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.