आंबा पिकतो, रस गळतो...
आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंब्यामध्ये कोकणात पिकणाऱ्या हापूसला जगभरात पसंती मिळते. त्यामुळंच 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' असं म्हटलं जातं. कोकणचं बहुतांश अर्थकारण हापूसभोवती फिरतं. याशिवाय मऱ्हाटी मुलखात आंबा अगदी बांधाबांधावर आंबा पिकतो आणि विकतोही. खऱ्या अर्थानं आंबा पहिल्यांदा गुढीपाडव्यालाच घरी आणला जातो. साहजिकच त्यानंतरच मार्केटमध्ये आंब्याची धूम सुरू होते. त्यामुळंच आंब्याच्या मार्केटमध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजमितीला करोडोंची उलाढाल होणारा आंबा गुढीपाडव्यानंतरच बाजारात भाव खायला लागतो.
गुढीपाडव्याला पूजन
हल्ली मार्केटमध्ये पहिल्यांदा आंबा उतरवण्यासाठी व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांचीही चढाओढ चाललेली पाहायला मिळते. ज्याचा आंबा पहिल्यांदा मार्केटमध्ये येतो तो भाव खाऊन जातो. त्यामुळं अगदी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच हापूस बाजारात आल्याच्या बातम्या झळकतात. मात्र, पूर्वी शेतकरी गुढीपाडव्यालाच पहिल्यांदा झाडावरचा आंबा काढून घरी आणून त्याची पूजा करीत आणि त्यानंतरच तो मार्केटला जाई. कोकण वगळता आजही ही प्रथा बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते.
भारतभरातून आवक
मराठी माणसांची आंब्याची चव चाखण्याची रीत काही न्यारीच आहे. खवय्यांची इथं कमी नाही आणि हौसेला मोल नाही. त्यामुळं तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, आदी राज्यातूनही आंबा मुंबई, पुण्याच्या मार्केटला येतो. विशेष म्हणजे, हापूसची चव सातासमुद्रापार पोहोचल्यानं हापूसची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पण, त्यातही मुंबईकरांची पसंतीच सर्वाधिक असते. अमेरिकेत आंबा पाठवला तरी निर्यातीचा एकूण खर्च विचारात घेता तिथं मिळणारा भाव हा मुंबईपेक्षा कमीच असतो. त्यामुळं सध्या तरी मुंबई हेच आंब्याचं सर्वार्थानं मोठं मार्केट आहे, अशी माहिती आंब्याचे व्यापारी आणि ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिलीय.
मुंबईत कोटींची उड्डाणे
अगदी दहा-पंधरा वर्षापूर्वी आंब्याचं पूजन गुढीपाडव्यालाच होऊन तो मार्केटमध्ये यायचा. आता मात्र काळ बदलालय. विविध तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आंबा अगदी जानेवारीतच मार्केटमध्ये येतो. तरीही मार्केटमध्ये आंब्याची खरी धूम गुढीपाडव्यापासूनच सुरू होते, अशी माहिती एपीएमसी मार्केटचे अध्यक्ष आणि आंब्याचे प्रसिद्ध व्यापारी संजय पानसरे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिलीय.
दिवाळीला जसं स्नेहीजनांना विविध भेटवस्तू दिल्या जायच्या तशाच प्रकारे गुढीपाडव्याला आंब्याची पेटी भेट देण्याचं प्रमाण अलिकडं वाढतंय. मुंबईकरांचं तर हे आंबाप्रेम एवढं आहे की 600 ते 700 कोटींची उलाढाल एकट्या मुंबईत होते, असंही पानसरे यांनी नमूद केलं.
थोडक्यात काय तर मऱ्हाटी प्रांतात आंब्याशिवाय गुढीपाडव्याचा गोडवा नाही, असंच चित्र आजही पाहायला मिळतं.
दृष्टिक्षेपात मुंबईचं आंबा मार्केट
- सर्वात जास्त निर्यात दुबईला
- विमान बोटीव्दारे होते वाहतूक
- कोकणातून वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगडसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरातून होते हापूसची आवक
- रत्नागिरी, देवगड हापूसला ग्राहकांची सर्वाधिक पसंती
- सर्वाधिक आवाक 750 किलोमीटरच्या समुद्रकिनारपट्टीतून
- खाडी हवामानात आंबा चांगला पिकतो
- कोकणातील 1200 ते 1500 गावातून येतो हापूस
- सर्वात महाग हापूस मुंबईतच खपतो
- आंब्याचे मूळ पोर्तुगालमध्ये
Comments
- No comments found