वामनदादा म्हणजेच वामन तबाजी कर्डक. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 ला नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या देशवंडी गावात झाला. त्यांच्या आईचं नाव सईबाई, तर वडिलांचं नाव तबाजी कर्डक होतं. एक थोरला भाऊ सदाशिव आणि धाकटी बहीण सावित्री, पत्नी शांताबाई, मुलगी मीरा आणि दत्तक पुत्र रवींद्र कर्डक, असं वामनदादांचं कुटुंब.
घरची परिस्थिती आणि बालपण
वामनदादांचं बालपण गावातच गेलं. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मोळ्या विकणं, टेंभुर्णीच्या पानाचे विडे करून विकणं आणि हेडीचा व्यवसाय करण्याचं काम त्यांचे वडील करायचे. तर गुरं चारणं, जत्रेत कुस्त्या खेळणं, मातीकाम, सिमेंट काँक्रिटचं काम, चिक्की विकणं, आईसफ्रूट विकणं, खडी फोडणं, इत्यादी कामं करत त्यांचं लहानपण गेलं. लहानपणी त्यांच्या कानावर गावातल्या तमासगीरांची गाणी पडली. या गाण्यातल्या शब्दांनी आणि गायनानं वामनदादांच्या मनावर मोहिनीच घातली. दादांचा आवाज गोड होता. सात-आठ वर्षांचे असताना गळ्यात संबळ घेऊन ते मोहल्ल्यात गायन करत फिरायचे. शाहीर घेगडेंचा नाशिक सत्याग्रहाचा पोवाडा त्यांनी ऐकला आणि त्यांचं संवेदनशील मन थरारलं. १९४३ मध्ये वामनदादांनी गीतलेखनाला सुरुवात केली. गावात शाळा नसल्यानं शिक्षणाशी त्यांचा संबंध आला नसला, तरी त्यांच्या काव्यातली प्रगल्भता मनाला मोहून टाकते.
छंद आणि लेखन
पुढे आई आणि बहिणीसोबत मुंबईत आल्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदीचं खूप वाचन केलं.
चित्रपट कथाकार, अभिनेता होण्याचं स्वप्न ते पाहू लागले. 'लल्लाट लेख' या नाटकात घुमाऱ्याची भूमिका त्यांनी केली. रणजीत स्टुडिओत मेकअपचंही त्यांनी काम केलं. ३ मे १९४३ मध्ये एका हिंदी गीताचं त्यांनी विडंबन केलं आणि त्यांना जगण्याचं नवं जगच सापडलं. १९४३ पासून २००४ पर्यंत गीतलेखन आणि गायनाचा त्यांचा हा अखंड प्रवास. प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास वामनदादांनी गीतरचना केली. उर्दूतील गझल, खमसा, नज्म हे प्रकार त्यांनी मराठीत आणले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट आणि कार्य
१९४० मध्ये नायगाव इथं वामनदादांना बाबासाहेबांचं पहिल्यांदा दर्शन झालं. त्यानंतर चाळीसगाव, मनमाड, टिळकनगर इथं बाबासाहेबांच्या स्टेजवर दादांनी गायनही केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर वामनदादांच्या लेखणीला अनेक अंगांनी धार चढली. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. वामनदादा पूर्णत: आंबेडकरमय झाले होते. त्यांचे गायनाचे कार्यक्रम गावोगाव झाले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमानं, कार्यक्रमातील प्रत्येक गीतानं लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी बांधलं. आपल्या गीतांनी ते घराघरातील माणसांच्या मनापर्यंत पोचले. वामनदादांना लोकांनी आपल्या सुखदु:खाचा आणि स्वप्नांचा शब्द मानलं, गायक मानलं, महागीतकार मानलं, त्यांच्या हजारो गीतांमधून पसरलेल्या भीमायनाचा लाडला शिल्पकार मानलं.
पुरस्कार आणि सत्कार
विदर्भात जवळजवळ दरवर्षी आंबेडकरी साहित्य संमेलन भरतं. पहिलं आंबेडकरी साहित्य संमेलन वर्धा शहरात १९९३ मध्ये भरलं होतं. महाकवी वामनराव कर्डक त्याचे संमेलनाध्यक्ष होते. आंबेडकरी जनतेनं दादांवर अथांग प्रेम केलं. त्यांच्यावरील प्रेम गावागावात, त्यातील घराघरात वामनदादांची वाट पाहत होतं. अनेक गावांमध्ये त्यांना प्रबुद्ध कविरत्न, महाकवी वामनदादा अशा उपाधी देण्यात आल्या. असंख्य ठिकाणी सन्मानपत्रं आणि सत्कारही झाले.
- दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप.
- राज्य सरकारचा दलित मित्र पुरस्कार.
- महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर तीन वर्षं सदस्य.
- महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर सदस्य.
- औरंगाबाद इथं पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).
- प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचं प्रकाशन (१९८७)
- मधुकर भोळे संपादित वामनदादा कर्डक गौरव ग्रंथाचं प्रकाशन (२००१)
- प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीतरचना’ लेखसंग्रहाचं प्रकाशन.
- नाशिक, बुलडाणा इथं नाणेतुला.
- परभणी इथं प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांच्यासोबत वहीतुला, नंतर या वहयांचं गरीब मुलांना वाटप करण्यात आलं.
- साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्न’ ही गौरववृत्ती.
- युगांतर प्रतिष्ठानतर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (१९९७)
- भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेडचा ‘संत नामदेव पुरस्कार’
- बौद्ध कलावंत संगीत अकादमी मुंबईचा ‘भीमस्मृती पुरस्कार’
- भोपाळ इथं ताम्रपट प्रदान
- भुसावळ इथं चांदीचं मानपत्र प्रदान
- वसमतनगर जी. हिंगोली इथं ‘स्वरार्हत संगीत संगीती’च्या वतीनं नागरी सत्कार आणि गायन, संयोजक संजय मोहड.
- मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’
वामनदादांनी लिहिलेली पुस्तकं आणि गीतं
पुस्तकं
‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३
‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६
‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७
‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६
ध्वनिफिती
भीमज्योत
जयभीम गीतं
चित्रपट गीतं
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (सांगते ऐका)
चल गं हरणे तुरुतुरु (पंचारती)
असे हे वामनदादा १५ मे २००४ ला नाशिक इथं दुपारी सव्वादोन वाजता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी हा महागीतकार काळाच्या पडद्यापुढं मात्र आपल्या हजारो गीतांचा समुद्र ठेवून गेला.
असा भीम होता...
उपाशी जगाचा पसा भीम होता
असा भीम होता, असा भीम होता.
नव्या माणसाचे नवे भक्त सारे
उफाळून उठले नवे रक्त सारे
अशा माणसांच्या नसा भीम होता.
गुलामी जगाची झुगारत होता
पुढे हात सारे उगारत होता
अशा काळजाचा ठसा भीम होता.
महाकवी वामनदादा कर्डक
Comments
- No comments found