टॉप न्यूज

...तमाशा बदलला आंबेडकरी जलशात

सुखदा खांडगे, मुंबई
भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हूँ…अशी लाखामध्ये देखणी माझ्या भीमरावाची लेखणी…अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये डॉ. आंबेडकरांची महती दिसून येते. बाबासाहेबांचा समतेचा लढा या गाण्यांतून लोकांसमोर आला. त्यांच्या कीर्तीचा महिमा सांगणारी ही गीतपरंपरा सुरू झाली १९३२ पासून. बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये भरणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी बोलावण्यात आलं. आणि इथं त्यांच्या कार्याला मदतीचा हात मिळाला. शाहीर पत्रकाराची भूमिका करू लागले. तमाशा सोडून भाऊ फक्कड बाबासाहेबांची माहिती सांगणारे पोवाडे गाऊ लागले. त्याचंच रूपांतर आंबेडकरी जलशामध्ये झालं.
 


महाराष्ट्र व्यापला
बाबासाहेबांच्या कार्यानं प्रेरित झालेले शाहीर आपल्या तमाशाचं रूपांतर जलशामध्ये करू लागले. तमाशातील मूळ स्वरूप असलेल्या गण, गवळण यांची जागा बाबासाहेबांच्या महतीनं घेतली.

photo2बाबासाहेबांच्या लढ्यानं संपूर्ण महाराष्ट्राला झपाटून टाकलं आणि त्यांचे सहकारी त्यांनाच देव मानू लागले. तमाशामधील मावशी हे पात्र मार्मिक भाष्य करत असतं. हे लक्षात घेऊन अगदी तशीच भूमिका जलशामध्ये सुरू झाली. जलशामधील मावशी सूत्रधाराचं काम करत असताना लोकांना हसतखेळत बाबासाहेबांच्या कार्याची माहिती द्यायची. "भीमाच्या विचारांचा साक्षात्कार मला झाला, आणि मी सगळ्या देवांची पूजा सोडून फक्त भीमांनाच पूजणार" असे टोले मारून ती लोकांसमोर जागृती करायची.

 

शाहीरांचा पुढाकार

photoचंद्रकांत निरभवणे, तिरोबा बनसोड, वामनदादा कर्डक अशा अनेक शाहिरांनी आंबेडकरांच्या कार्याचा प्रसार केला. तमाशामध्ये जसा वग आणि बतावणी असते, त्याचप्रमाणं भीमाच्या लढ्याचं वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या बतावणी आणि वग या जलशांमध्ये ते सादर करायचे.

 

आंबेडकरी कव्वाली आली...

१९४८ नंतर साधारण जलसे लोप पावत गेले आणि त्याऐवजी आल्या त्या आंबेडकरी कव्वाली, अशी माहिती प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सांगितली. त्या काळातील गायक सदाशिव शिंदे, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे यांनी आंबेडकरी कव्वाली रचल्या आणि त्या सादर केल्या. आजही सुषमा देवी, दिनकर शिंदे, मीराबाई उमप, दिपाली शिंदे अशा अनेक कलाकारांनी आंबेडकरी कव्वालीची परंपरा सुरू ठेवली आहे. दिनकर शिंदे यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये आंबेडकरी कव्वाली गाणारी जवळजवळ १०० कलापथकं आहेत. या सगळ्यांमधील नव्या पिढीचा समावेश वाखाणण्याजोगा आहे. दिनकर शिंदे यांच्या मुलानं म्हणजे समर्थक शिंदे यानं अलीकडच्या काळात भीमाचं गाणं रचलं आणि गायलंय. ते म्हणजे...

 

photo5'शूद्र म्हणूनी चाढ काढी आजवर पिढी न् पिढी रं... नष्ट करायला नीच रूढी रं… भीमराय शिकलाय एबीसीडी रं…'


शिंदे यांनी सांगितलं की, आंबेडकरांची ही गाणी शिकण्यासाठी नव्या पिढीमध्ये उत्स्फूर्तपणे आवड निर्माण होतेय. आजही अनेक मुलं भीमगीतं शिकण्यासाठी येतात. मला या गाण्यांची आवड निर्माण झाली ती माझे बाबा प्रल्हाद शिंदे यांच्यामुळं. आता मी हीच परंपरा पुढं सुरू ठेवत आहे. माझा मुलगाही त्याच ताकदीनं या क्षेत्रामध्ये काम करीत आहे, असंही शिंदे म्हणाले.

 

वामनदादा कर्डक... 

paint4ना भाला, ना बर्ची, न ढाल पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे…

कायदा भीमाचा, फोटो गांधींचा शोभतोय का नोटावर?

किती शोभला असता भीमराव, टाय आणि कोटावर

जरी संकटाची काळरात होती, तरी भीमराया तुझी साथ होती…


यासारखी वामनदादा कर्डक यांची गाणी आजही सगळ्याच आंबेडकरी कार्यक्रमांतून गायली जातात. आता या कव्वालीचं स्वरूपसुद्धा बदलत गेलंय. आता सवाल-जवाब होतात. दोन समूह एकत्र रंगमंचावर बसून कव्वालीची फेक होते.

 

रेश्मा सोनावणेचाही पुढाकार

'बघतोय रिक्षावाला...' हे लोकप्रिय गाणं गाणारी आणि सध्याची आघाडीची आंबेडकरी कव्वाली गायक रेश्मा सोनावणे आपल्या गायन प्रकाराची माहिती देताना 'भारत4इंडिया'शी बोलताना म्हणाली, ''माझी गायनाची सुरुवात आंबेडकरी कव्वाली गायनानं झाली. ही आंबेडकरी कव्वाली गायन कला हळूहळू लुप्त होईल असं म्हटलं जात होतं, परंतु आताच्या तरुण पिढीत हा गायनाचा प्रकार अधिकाधिक लोकप्रिय होतोय. आणि हीच नवीन पिढी हा वारसा अधिक पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज मला अवघ्या महाराष्ट्रातून ही गाणी गाण्यासाठी बोलावणं येतं.”

अशाच वेगवेगळ्या माध्यमांतून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचतायत आणि त्यांच्या विचारांचा अंगार पेटवतायत.

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.