टॉप न्यूज

भीमगीतांच्या मार्केटमध्ये विचारांचा ठेवा!

सागर चव्हाण, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! भारतीय घटनेचे शिल्पकार! महामानव! दलित, वंचित समाजाला गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी प्राप्त करून दिला. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असं त्यांनी म्हटलं खरं, पण...पिढ्यान् पिढ्या अक्षर ओळख नसलेल्या समाजाच्या दारापर्यंत ही शिकवण नेणं हे एक आव्हानच होतं. अक्षर ओळख नसली तरी या समाजाकडं गाणं होतं. ते हेरूनच वामनदादा कर्डकांसारख्या समाजधुरीणांनी भीमगीतांची निर्मिती केली आणि बघता बघता त्यांच्या विचारांचा वणवा पेटला. त्यामुळं ही भीमगीतं म्हणजे आंबेडकरी विचारांचा ज्वलंत ठेवा आहे. त्यामुळंच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला प्रत्येक जण हा ठेवा गाठीशी बांधूनच परतत असतो. त्यातूनच आज या भीमगीतांचं मोठं मार्केट झालंय.
 

नित्यनवी भीमगीतांची होते रेलचेल
शाहीर वामनदादा कर्डक यांच्यापासून सुरू झालेली ही भीमगीतांची परंपरा आजच्या तरुणाईनंही कायम ठेवलीय. आंबेडकरी जलसा यशस्वीपणं पुढं चालवण्याचं आव्हानं तरुणाईनं पेललंय. काळानुरूप भीमगीतांच्या रचनेत आणि संगीतात बदल झाला असला तरी समतेच्या विचारांचा अंगार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळंच दादरच्या चैत्यभूमीवर लागलेल्या विविध स्टॉल्सवर भीमगीतांच्या सीडींची रेलचेल कायम आहे. बाबासाहेबांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी एकत्र येणाऱ्या आंबेडकरी जनतेसाठी दरवेळी नवनवीन भीमगीतांच्या सीडी येतात. या सीडींमध्ये केवळ गाणीच नाहीत, तर त्या जगण्याचं बळ आणि ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्यामुळं चैत्यभूमीवर येणारा प्रत्येक जण न चुकता सीडी घेऊन जातो. त्यातून करोडोंची उलाढाल होत असते.

 

Image00011

बाबासाहेबांच्या विचारांचं सार..
अगदी सुरुवातीपासून ते आजही बाजारात नव्यानं दाखल झालेल्या भीमगीतांच्या सीडींमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं सार आहे. बाबासाहेबांचं चरित्र मांडताना आता बदललेल्या परिस्थितीत काय आणि कसं करायला हवं, याची नेमकी शिकवण, ही भीमगीतं देतात. बाबासाहेबांच्या चरित्रातील प्रत्येक गोष्टींची दखल या भीमगीतांनी घेतलीय. अगदी बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या खडतर संघर्षापासून ते त्यांनी उभारलेल्या समतेच्या लढ्यातील प्रत्येक घटनेची नोंद भीमगीतांनी घेतलीय. या भीमगीतांमध्ये काय नाही? आमचे बाबासाहेब भीमगीतांमधूनच आम्हाला भेटले, असं का म्हणतात याची प्रचीती भीमगीतांमधून येते.

 

Image00015एक शाम भीमजी के नाम...
बाबांसाहेबांच्या चरित्रावर आणि विचारांवर बेतलेली ही भीमगीतं आजही तेवढ्याच रसरशीतपणं पुढं येताना दिसतात. यावेळी आलेली 'एक शाम भीमजी के नाम', 'एका घरात या रे', 'लाल दिव्याच्या गाडीला, 'योगदान भीमाचं', ही भीमगीतांची टायटल्स त्याचीच साक्ष देतात. या चैत्यभूमीवर वेणू पटेकर या सुमारे तीस वर्षांपासून सीडी विकण्याचा स्टॉल लावतात. हा व्यवसाय करून आपण आंबेडकरी चळवळीला बळच देत असतो, अशी त्यांची धारणा आहे. 'भारत4इंडिया'शी बोलताना त्यांनी या व्यवसायातून दोन पैसेही मिळतात आणि मनाला समाधानही मिळतं, असं सांगितलं. आम्ही गिऱ्हाईकाशी पैशांबाबत जास्त घासाघीस करत नाही. आलंच तसं कोणी तर कमी पैशातही (ना नफा ना तोटा) आम्ही सीडी देतो, असं सांगितलं.

 

Image0000930 ते 32 स्टॉल...
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळणाऱ्या गर्दीच्या महापुरात तेथील स्टॉल सर्वांचं लक्ष वेधतात. बाबासाहेबांवरील पुस्तकांचे जसे स्टॉल असतात, तसंच या सीडींचेही. याशिवाय झेंडे, बिल्ले, बाबासाहेबांची छायाचित्रं असणारे विविध पेन, गळ्यात घालायची लॉकेट, स्टॅच्यू, कीचेन्स, अशा नानाविध गोष्टी इथं आहेत. यंदाही चैत्यभूमीवर सीडींचे 30 ते 32 स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉलवरून सीडींची सुमारे 35 हजारांची उलाढाल होते. सर्वाधिक खप हा 6 डिसेंबरला होतो, असं विक्रेत्यांनी सांगितलं. आजही आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, भीमशाहीर माधव वाढवे, विष्णू शिंदे, नीरा भगत, सुषमा देवी, अंजली भारती,
वैशाली शिंदे या भीमगीत गायकांची चलती आहे. त्यांनी गायलेल्या भीमगीतांना सर्वाधिक मागणी असल्याचंही विक्रेत्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, इतर दिवशीही वर्षभर या भीमगीतांना कमीजास्त प्रमाणात मागणी असतेच.

 

थो़डक्यात काय, तर समतेची लढाई सुरू आहे तोपर्यंत भीमगीतांचा नारा गुंजतच राहणार एवढं नक्की!

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.