टॉप न्यूज

भीमराव माझा रुपया बंदा...!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा लढा दलित, वंचितांच्या घराघरात पोहोचला तो भीमगीतांमुळं. भीमगीतांचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांच्यानंतर भीमगीतांचा हा ठेवा पुढं नेण्याचं काम आजची तरुणाई करतेय. औरंगाबादचा मेघानंद जाधव त्यापैकीच एक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं निर्माण केलेला 'भीमगीत रजनी' हा कार्यक्रम महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही तुफान चालतो. त्यानं लिहिलेली अनेक भीमगीतं लोकप्रिय झाली आहेत. 'भीमराव माझा, रुपया बंदा, आहे कोटी कोटीत' हे आज सर्वांच्या ओठावर असणारं गाणं मेघानंदनंच लिहिलंय. त्याच्या गाण्यांना मिळणारी लोकप्रियता पाहता भीमगीतांचा ठेवा समर्थपणे पुढं जाईल, अशी खात्री पटते.
 


22222मेघानंदचे वडील बाबूराव जाधव हे वामनदादा कर्डकांचे पट्टशिष्य. त्यामुळं अप्रत्यक्षपणं वामनदादांचाच वारसा मेघानंद पुढं चालवतोय, अशी त्याच्या कुटुंबीयाची धारणा आहे. आतापर्यंत शंभरावर गीतं लिहून मेघानंद आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करून समाज प्रबोधनाचं कार्य करतोय.

 

घरातच मिळालं संगीताचं बाळकडू
वयाच्या 15 व्या वर्षी पहिलं गीत लिहिणाऱ्या मेघानंदला खुद्द वामनदादा कर्डक यांचाच सहवास लाभला. लहानपणापासूनच घरात संगीत आणि गायकीचा वारसा मेघानंदला मिळाला. मेघानंदचे वडील बाबूराव आणि काका विजयानंद जाधव हे दोघंही वामनदादांचे पक्के पट्टशिष्य होते. घरात वामनदादांसोबत दोघा भावांच्या नेहमी गायनाच्या मैफिली रंगत, त्यामुळं घरातूनच मेघानंदला संगीताचं बाळकडू मिळालं. वामनदादांच्या तालमीत वाढलेल्या मेघानंदची गीतांमधील आवड पाहून वामनदादांनी आपल्या शिष्यास म्हणजे बाबूराव जाधव यांस मेघानंदच्या आवडीकडं विशेष लक्ष द्यायला सांगितलं. म्हणतात ना लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते वामनदादांनी तेव्हाच ओळखलं होतं.


घरची परिस्थिती हलाखीची
वामनदादांच्या तालमीत घडलेल्या मेघानंदच्या घरी अठराविश्वं दारिद्य, आर्थिक चणचण तर पाचवीला पुजलेली. त्यामुळं शिक्षणही अगदी मोजकं. अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मेघानंदची गाणी ऐकली की त्याचं शिक्षण इतकं कमी असेल, असं वाटत नाही. मात्र आहे त्या परिस्थितीवर मात करत मेघानंद जाधव यानं मराठवाड्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या गीतांनी भुरळ घातली. गेली २० वर्षं मेघानंदच्या घरात वीज नव्हती. तरीही तो खिडकीतून येणाऱ्या रस्त्यावरील विजेच्या उजेडात कवितेचं लिखाण करे. मेघानंदच्या पहिल्या कॅसेट रेकॉर्डिंगच्या वेळेस मेघानंदच्या पायात चप्पलदेखील नव्हती. दररोज २० किलोमीटर पायी प्रवास करून त्यानं पहिल्या कॅसेटचं रेकॉर्डिंग केल्याचं सांगताना त्याच्या आईचा गळा दाटून येतो.

 

वामनदादांच्या प्रेरणेतूनच कवितेचा प्रवास
गौतम बुद्ध, शाहू, फुले आणि आंबेडकरी विचारवंतांचा प्रभाव असणाऱ्या मेघानंदच्या कवितेतून सामाजिक, तसंच सांस्कृतिक आशयघन स्पष्टपणं पाहता येतो. आपल्या कवितेचा प्रवास हा वामनदादांच्या प्रेरणेतूनच झाल्याचं मेघानंद म्हणतो. आपल्या जडणघडणीत वडील बाबूराव आणि काका गीतकार विजयानंद यांचा फार मोलाचा वाटा असल्याचंही मेघानंद सांगतो. आतापर्यंत त्यानं शंभरावर गीतं लिहिलीत. तो आपल्या कवितेच्या उगमाचं रहस्य सांगताना अगदी हरखून जातो. एका मित्राच्या हॉटेलमधल्या किचनमध्ये आणि दुसऱ्या मित्राच्या लोकलबुथमध्ये जास्तीत जास्त कविता सूचतात, असं तो सांगतो.

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकगीत गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांनी मेघानंद याच्या कवितेला आपला आवाज दिलाय. महाराष्ट्रात वामनदादांनंतर भीमगीतांचा जागर सुरू ठेवणारा कलंदर कलाकार म्हणून आज सर्व जण मेघानंद जाधवकडं पाहत आहेत. वामनदादांनंतरचा दुसरा वामनदादा महाराष्ट्रात मेघानंदच्या रूपानं दिसेल, असं मला मनापासून वाटतंय, असा विश्वास मेघानंदचे मित्र असलेले एमजीएम कॉलेजचे प्राध्यापक रमाकांत भालेराव यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केलाय. मेघानंदसारख्या हाडाच्या भीमसैनिकांमुळं भीमगीतांचा ठेवा पुढं सुरूच राहील, एवढं नक्की!

Comments (3)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.