टॉप न्यूज

कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!

मुश्ताक खान, दापोली
आला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी 6 हजार कुणबी बांधव तहसील कार्यालयावर धडकले. राज्यभरातील कुणबी समाजाच्या अशाच स्वरूपाच्या मागण्या असून, त्यांची सरकार दरबारी उपेक्षा होतेय, असं या समाजाचं मत बनलंय. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभरात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
 

 

प्रमुख मागण्या
दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पार्किंग झोन म्हणून आरक्षित करण्यात आलेल्या 23 गुंठे जागेपैकी 10 गुंठे जागा कुणबी समाजाला देण्यात यावी, या मागणीनं जोर धरलाय. त्याचबरोबर कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करून त्याच्या एकूण बजेटमधील 70 टक्के रक्कम कुणबी समाजाच्या लाभार्थींसाठी खर्च करण्यात यावी, कुळ कायद्यानुसार अनेक दशकांपासून कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत, त्या तातडीनं कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, कुणबी समाज सरकारी सवलतींपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा, गावठाणाबाहेरील घरांसाठी स्वतंत्र 7/12 उतारा संबंधित घरमालकांच्या नावावर व्हावा आणि जाती सूचीमध्ये हिंदू मराठाऐवजी हिंदू ति. कुणबी म्हणून नोंद व्हावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

 

kunabi 12.pngरत्नागिरीत 70 टक्के कुणबी समाज
कोकणात कुणबी समाज मोठ्या संख्येनं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 70 टक्के, सिंधुदुर्गात 40 ते 50 टक्के, रायगडमध्ये 50 ते 60 टक्के, कर्जत-खालापूर 30 ते 40 टक्के, नाशिकमध्ये 10 टक्के आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 टक्के कुणबी समाज आहे. आज हा सर्व समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्या मागासच आहे. कुणबी म्हणजेच शेतकरी समाजाचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं कुणबी समाजाचे नेते रामचंद्र कोलबे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. कुणबी समाजाच्या प्रलंबित मागण्या गेल्या 10 वर्षांपासून मान्य होत नाहीयेत. राज्यभरात विखुरलेल्या कुणबी समाजाकडं लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही, त्यामुळंच कुणबी समाजोन्नती संघानं दापोलीत भव्य मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केलं, असंही त्यांनी सांगितलं.

 

kunabi 10.pngआदिवासीसदृश जीवन...
डोंगरदऱ्यात राहणारा कुणबी समाज आदिवासीसदृश जीवन जगत आहे. त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी सरकार आणि प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेणं आज आवश्यक बनलंय. समाजाचा हा संताप त्यांच्या विरोधात आहे, असं पंचायत समिती सदस्य उन्मेश राजे यांनी सांगितलं.

 


अधोगतीला सरकारच जबाबदार

समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेणं, हेच आमचं उद्दिष्ट आहे. गावागावातून, वाडीवस्त्यातून कामासाठी येणाऱ्या कुणबी समाजाला राहण्याची सोय नसते. कोकणात सर्वाधिक संख्येनं असलेल्या आमच्या समाजाची जी काही फरफट चालली आहे, त्याला केवळ सरकारच जबाबदार आहे, असा आरोप कुणबी सामाजाचे नेते जगन्नाथ गोरीवले यांनी केला.

 

kunabi 15.png...तर निवडणूक अवघड जाईल
कुणबी समाजाच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू, असं आश्वासन त्यांना पुन्हा एकदा प्रशासनाकडून देण्यात आलंय. दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती आणि त्यावर मिळत असलेल्या फक्त आश्वासनामुळं कुणबी समाज चांगलाच चिडलाय. यावेळी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सत्ताधाऱ्यांना 2014 ची निवडणूक अवघड जाईल, असा गर्भित इशाराही या समाजानं दिलाय. त्यामुळं सरकार या मागण्यांकडं आता लक्ष देतंय का?, हे पाहावं लागेल.


कुणबी कोण आहेत?
ऐतिहासिकदृष्ट्या कुणबी हा भारतातील एक पुरातन कृषिवल समुदाय आहे. उत्तर भारतात या समुदायाला प्राय: असामी, रयत असं म्हटलं जातं. ऋग्वेदात याच समुदायाला 'विश' असं म्हटलं जात असे. दक्षिण भारतात याच कृषिवल समुदायाला कुळ, कुणबावा, कुणबी, कणबी, लेवा अशी अनेक प्रचलित नावं आहेत.

 

kunabi 14.pngकुणबी समाज राजसत्तेच्या उदयाबरोबरच अस्तित्वात आला. स्थानिक नामं काहीही असोत, या समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे कृषिकर्म. कुणबी कधीही शेतीचा मालक नसे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ३५ कोटी लोकसंख्येपैकी पाच कोटी सत्तर लाख जमिनी कसणारी (म्हणजे जमिनीचे मालक नसलेले) कुळं या देशात होती. कुळ कायद्यानं या सर्वच कुळांची नावं 7/12ला लागली.

 

भारतातील सरंजामदारी व्यवस्थेनं कुणब्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं. महत्त्वाचं म्हणजे, कुणबी आणि मराठा एकच नाहीत हे एक ऐतिहासिक वास्तव असल्याचं समाजशास्त्राचे अभ्यासक सांगतात.

 

 

Comments (3)

  • samajcha arsa bantil ase vividh upkram satatyane suru thevle pahijet. samajatil sthir ghatkanni itrana barobar anyasathi pramanik prayatnya karavet.

  • कुणबी बांधवांचा विजय असो ...........
    ..

  • असेच मोर्चे काढून समाज व समाज बांधव जागृत ठेवला पाहिजे . तरच सरकारला जागे करता ऎइल .

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.