दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हा अॅनिमेटेड चित्रपट तयार झालाय. हजारो कलाकारांचे हात त्यासाठी राबलेत. चित्रपटाच्या अॅनिमेशनचं तंत्र, त्याला उठावदार बनवण्यासाठी घेतलेली मेहनत, 30 मुख्य कॅरेक्टर, 2.75 लाख स्केचेस, 9000 बॅग्राऊंड या सर्वांमुळं हा चित्रपट आपणाला
थेट शिवकालीन इतिहासात घेऊन जातो.
ऐतिहासिक अॅनिमेटेड चित्रपट
'प्रभो शिवाजी राजा' हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील अॅनिमेटेड चित्रपट आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास यामुळं पुन्हा एकदा नवीन तंत्रात नवीन पिढीपुढं येत आहे. शिवरायांच्या समग्र इतिहासाचा वेध यामध्ये घेण्यात आलाय. अगदी शिवनेरीवर झालेल्या जन्मापासून ते स्वराज्य स्थापन करून रायगडावर राज्याभिषेक करण्यापर्यंतचा देदिप्यमान इतिहास चित्रपटातून मांडण्यात आलाय. या चित्रपटात शिवकालीन गडकिल्ले, तानाजी, बाजीप्रभू यांसारखे शूरवीर मावळे भेटतात. शिवरायांना घडवणाऱ्या शूरवीर जिजाऊ माँसाहेब भेटतात. हर, हर महादेवच्या घोषणा देत प्राणाचीही पर्वा न करता मराठे शत्रूवर कसे तुटून पडत होते, असं सर्व यात पाहायला मिळतं आणि आपला ऊर अभिमानानं भरून येतो. या चित्रपटात शिवरायांच्या न्यायदान पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आलाय. शिवरायांना 'रयतेचा राजा' असं का म्हटलं जातं, हे यातून समजतं.
सचिन खेडेकर, सुदेश भोसले यांचा आवाज
या चित्रपटाची निर्मिती इन्फिनिटी व्हिज्युअल अॅण्ड एमईएफएसी यांनी केली असून यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्यांचा मानस आहे. या चित्रपटातील पात्रांसाठी प्रसिध्द मराठी चित्रपट कलाकार सचिन खेडेकर आणि सुदेश भोसले यांनी आपला आवाज दिला आहे. या चित्रपटात शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर भर देण्यात आला आहे. उदा. तत्कालीन मुघल साम्राज्य, शिवरायांचा जन्म, त्यांच्या जीवनावरील महत्त्वांच्या घटनांचा प्रभाव, स्वराज्याची स्थापना, महत्त्वाच्या लढाया आणि महाराजांचा राज्याभिषेक इत्यादी गोष्टींना स्थान देण्यात आलं आहे. या चित्रपटामधील गीतं सुप्रसिध्द हिंदी चित्रपट गायक आणि संगीतकार शंकर महादेवन आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायली आहेत.
संशोधनानंतर बनलाय चित्रपट
या चित्रपटासाठी शिवरायांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलं. यामध्ये शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे आणि जेष्ठ इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांचीही मदत घेण्यात आली.
या चित्रपटाबाबत सांगताना निर्माते नीलेश मुळे म्हणाले की, अॅनिमेशनच्या माध्यमातून शिवरायांचं चरित्र लोकांसमोर ठेवण्याचा हा एक आगळावेगळा प्रयोग आहे. चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमला या चित्रपटाच्या संशोधनातून याची भव्यता आणि मांडणी करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय. या चित्रपटातील प्रत्येक सीनची आखणी करण्याआधी महाराष्ट्र तसंच देशभरात अनेक संशोधन दौरे करण्यात आले. यामध्ये शिवरायांचे किल्ले, एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेल्यावर तिथल्या लॅण्डस्केप, छायाचित्र, रेखाटनं या सर्वांचा अभ्यास करून या सर्वांना संगणकावर चित्रित करण्याचं अवघड काम टीमनं केलंय.
200 पानांची स्टोरी बोर्डिंग
या चित्रपटाच्या स्टोरी बोर्डिंगसाठी प्रत्येक शॉटबाय शॉट अशी 200 पानांची स्टोरी बोर्डिंग करण्यात आलीय. स्टोरी बोर्ड आणि आवाज हे सर्वोत्कृष्ट संपादकांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेत. या चित्रपटात वापरण्यात आलेलं शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर हे त्यांच्या मूळ चित्राच्या आधारावर बनवण्यात आलंय. हे चित्र एका डच कलाकारानं बनवलं होतं. या चित्राच्या विश्वासार्हतेबाबत प्रसिद्ध शिल्पकार सदाशिवभाऊ साठे यांनीही संमतीची मोहोर उमटवलीय. चित्रपट पाहताना आपण एक खरं जगच पाहतोय, असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. या चित्रपटानं सर्व जाती-धर्माच्या, भाषांच्या, समाजाच्या सर्व सीमा पार करून फक्त भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवावी, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जे कष्ट उपसलेत त्यावरून ही अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही मुळे यांनी बोलून दाखवला.
शास्त्रीय संगीत, विद्युत वाद्यांचा वापर
या चित्रपटाला भारत बालवली यांनी संगीत दिलं असून याच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू घाणेकर यांनी उचलली आहे. यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा सुरेख मेळ घालण्यात आलाय. चित्रपटाच्या संगीताबाबत बोलताना नंदू म्हणाले की, आम्ही शिवाजीराजांवर ज्यांनी कविता लिहिली ते कवी भूषण यांचाही अभ्यास केला आहे, तसंच त्यांच्या कवितेतील महत्त्वाचे भाग संगीतात वापरले आहेत.
Comments
- No comments found