गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधण्याची लगबग
सोन्यासारख्या खरेदीला महूर्त नाही, म्हणजे काय? दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेचा अर्धा मुहूर्त धरून साडेतीन मुहू्र्त येतात. याशिवाय गुरुपुष्यामृत हा सोनं खरेदीसाठी चांगला मुहूर्त समजला जातो. या मुहूर्तावर सोनं खरेदी केलं तर सोनं वाढतं, असा विश्वास आहे. त्यामुळं साहजिकच मुहूर्ताच्या दिवशी सराफ बाजारपेठांत सोनं खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. त्यातच दर चांगलेच कमी झाल्यानं म्हणजेच 26 हजारच्या घरात आल्यानं आजचा मुहूर्त साधण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आता लग्नसराई सुरू झालीय. दर कमी झालेत. गुरुपुष्यामृत योग आहे. मग सोनं खरेदीसाठी आणखी काय लागतं? त्यामुळंच आज खरेदीसाठी नेहमीपेक्षा मोठी गर्दी आहे, असं मुंबईच्या सराफी बाजारपेठेतील पुखराज शहा यांनी सांगितलं.
सोने की चिडीया
एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता. त्यामुळं भारतवर्षाला ‘सोने की चिडीया’ असंही म्हटलं जात असे. महंमद गझनीनं सतरा वेळा सौराष्ट्राच्या सोमनाथला लुटून जहाजं भरभरून सोनं नेलं. इंग्रजांनी तर खोऱ्यानं ओढलं. तरीही आज भारतात जे सोनं शिल्लक राहिलंय ते डोळं दिपवणारं असंच आहे.
१८०१ पर्यंत दर शंभर वर्षांत भारतात सरासरी ३५ ते ४० टन सोनं आयात केलं जात होतं, मात्र १८०१ ते १९०१ या शंभर वर्षांत सुमारे ३७०० टन सोन्याची आयात करण्यात आली. याशिवाय इतर मार्गानी येणारं सोनं वेगळंच. देशवासीयांचं हे सोन्याचं प्रेम आजही थक्क करणारं आहे. दर 34 हजारांवर गेला तरीही सर्वाधिक सोन्याची मागणी असणाऱ्या देशात भारताचा अग्रक्रम होता. भारत ही जगातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. मात्र, सोन्यातील गुंतवणूक देशाच्या उपयोगात येत नाही. विकासासाठी तिचा काहीच हातभार लागत नाही. त्यातच भारतासारख्या सोन्याच्या प्रमुख उपभोक्ता देशाला आपल्या मागणीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत आहे, ही एक चिंतेची बाब असल्याचं अर्थशास्त्रज्ञ सांगतात.
15 हजार टन साठा
सुमारे दहा वर्षांपूर्वी भारताची सोन्याची साठवण ही देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १/३ एवढी होती. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते जगातील सोन्याच्या सुमारे १० टक्के म्हणजेच जवळजवळ १५,००० टन सोनं भारतात आहे. २००८ मध्ये भारतातील सोन्याचा वापर ६७५ टन होता. सोन्याच्या उपभोगामध्ये चीन हा भारताचा नजीकचा स्पर्धक समजला जातो. जगातील सर्व सुवर्ण खाणींमधून आतापावेतो १ लाख ४५ हजार टन सोनं काढण्यात आलंय. अजून अधिकात अधिक १ लाख टन सोनं खाणीमधून काढणं शक्य आहे. मात्र त्यानंतर पुढील ५० वर्षांत सोन्याचे नैसर्गिक साठे संपुष्टात येतील. सध्या जगात दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे सोन्याचे प्रमुख उत्पादक देश असून तेथील खाणीमध्ये अजूनही सोन्याचे साठे शिल्लक आहेत. सध्या भारतात कोलार इथं ‘कोलार गोल्ड फिल्ड’, तसंच कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात ‘हत्ती गोल्ड फिल्ड’, तर आंध्र प्रदेशात आनंदपूर जिल्ह्यात ‘रामगिरी गोल्ड फिल्ड’ अशा तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. १ एप्रिल २००५ रोजी देशात ३९०.२१ दशलक्ष टन सोन्याचे साठे असावेत असा अंदाज आहे.
सोन्याची किंमत कोण, कशी ठरवतात?
कोणत्याही वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते, असा अर्थशास्त्राचा साधासोपा नियम आहे. तो सोन्यालाही लागू आहे. १९ व्या शतकापर्यंत सोनं हे वस्तुविनिमयाचं साधन होतं आणि अमेरिकन डॉलरचं मूल्यही सोन्याच्या किमतीशी सलग्न होतं. मात्र १२ सप्टेंबर, १९८९ पासून आजतागायत सोन्याची किंमत ‘लंडन गोल्ड फिक्स’मध्ये ठरत आली आहे. ‘लंडन गोल्ड पूल’चे पाच सदस्य असतात जे दिवसातून दोन वेळा, सकाळी १०.३० वा. आणि दुपारी ३.०० वा. सुवर्ण किंमत त्यावेळच्या मागणी आणि पुरवठ्यातून निश्चित करीत असतात. भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता इथं सुवर्णाचे हजर बाजार (Spot Market) आहेत, जे लंडनमधील किमतीशी संबंधित असतात. भारतात स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कॉर्पोरेशन बँक आणि बँक ऑफ नोव्हा स्कॉयिया यासारख्या १० ते १२ बँका सोनं आयातीत अग्रेसर आहेत.
दर आणखी घसरतील...
12 एप्रिल रोजी गोल्ड ईटीएफ कंपन्या आणि फंड हाऊसेसनी 140 टन सोनं विकलं. त्यामुळं भाव घसरला. लंडन तसंच अमेरिकेच्या बाजारात आलेली तूट भरून काढण्यासाठी त्यांनी सोन्याची विक्री केली. परिणामी भाव आणखी खाली आले. या पंधरवड्यातच सोनं सुमारे प्रती तोळा पाच हजार रुपयांनी खाली आलंय. सध्या सरासरी 25 हजारांच्या आसपास दर आहेत. दराचा हा आलेख आणखी खाली म्हणजेच 20 ते 22 हजारांवर येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Comments
- No comments found