टॉप न्यूज

सर्कस मूळची कृष्णाकाठची!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आज 20 एप्रिल. जागतिक सर्कस दिन! सर्कस पाहिली नाही किंवा माहीत नाही, असा मराठी माणूस विरळाच. आता जमाना बदलला, तरी मराठी माणसाला सर्कशीची ओढ कायम आहे. मुळात भारतीय सर्कस बहरली ती कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव-म्हैसाळ परिसरात. कालानुरूप सर्कशीच्या व्यवसायाला घरघर लागली. भारतात आज कशाबशा १६ सर्कस शेवटचा श्वास घेतायत. जागतिक सर्कस दिनानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी काही कार्यक्रम झाले. कृष्णाकाठाला त्याची कसलीच खबरबात नाही. कृष्णाकाठचं कुंडल आता पहिलं उरलं नाही... याचीच ही साक्ष.

 

circus

 

मुंबईत झाले प्रयोग आणि रॅलीही
काळाच्या प्रवाहात मनोरंजनाची साधनंही बदलत गेली. त्यामुळं एकेकाळी फॉर्मात असणाऱ्या सर्कशीला हळूहळू घरघर लागली. तिच्या पुनरुज्जीवनासाठी काहीतरी केलं पाहिजे, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'वर्ल्ड सर्कस फेडरेशन' स्थापन झालीय. त्यांच्यावतीनं एप्रिलमधील तिसरा शनिवार हा 'जागतिक सर्कस डे' म्हणून साजरा होतो. हे चौथं वर्ष असलं तरी यंदा भारतात पहिल्यांदाच हा दिन काही प्रमाणात साजरा झाला. रॅम्बो सर्कसचे दिलीप सुजीत यांचा फेडरेशन बनवण्यात मोठा सहभाग होता. त्यांनीच मुंबईत पृथ्वी थिएटर इथं विशेष चार खेळांचं आयोजन केलं. याशिवाय मुंबईत कलाकारांसह रॅलीही काढली.

 

circus aLL1पारंपरिक खेळ
सर्कस हा पारंपरिक खेळ आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत सर्कशीत केल्या जाणाऱ्या काही कसरती, तसंच घोड्यांवरील कवायती, पशुपक्ष्यांचे खेळ होत होते. भारतातही डोंबाऱ्याचे खेळ आजही प्रचलित आहेत. मात्र, आज दिसणाऱ्या आधुनिक सर्कशीचा उदय आणि विकास अठराव्या शतकात झाला. इंग्लिश अश्वारोहणपटू फिलीप अ‍ॅस्टली (१७४२-१८१४) हा आधुनिक सर्कसचा जनक मानला जातो. रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती आणि घोड्यांवरील खेळ करून दाखवणारा तो पहिला खेळाडू होय.

 

भारतातील सर्कस
भारतात सर्कशीची परंपरा १८७९ पासून सुरू झाली. देवल, कार्लेकर आणि ‘परशुराम लायन’ या त्या काळातल्या भारतातल्या सर्वांत मोठ्या तीन सर्कस होत्या. 'परशुराम लायन सर्कस' ही परशुराम माळी यांनी १८९०च्या सुमारास तासगावला सुरू केली. लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना ‘द लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली आणि त्यावरून त्यांच्या सर्कसला ते नाव पडलं. या सर्कसमध्ये वाघ, सिंह, हत्ती, घोडे इत्यादी जनावरांचा मोठा भरणा होता. परशुराम लायन सर्कस १९५५ला मिरज इथं बंद पडली. कार्लेकर सर्कसमधील शेलार यांनी स्वत:ची ‘शेलार्स रॉयल सर्कस’ १९१० मध्ये सुरू केली. ताराबाई शिंदे (सु. १८७५-१९८५) ही भारतातील पहिली महिला सर्कसपटू मल्ल होती. कार्लेकर ग्रॅण्ड सर्कसमध्ये शक्तिप्रदर्शनाची आणि साहसाची कामं ती करीत असे, तसंच वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इत्यादी करीत असे. तिनं स्वतःची ‘ताराबाई सर्कस’ स्थापन केली होती. नारायणराव वालावलकर यांनी ‘दि ग्रेट’ भागीदारीत सुरू केली. ती भारतात आणि परदेशांतही प्रेक्षणीय खेळ करून दाखवत असे.

 

सर्कस बहरली कृष्णाकाठी 

महाराष्ट्राच्या ज्या भागात सर्कस जन्मली, वाढली आणि फोफावली तो भाग म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव, म्हैसाळ हा परिसर. तासगाव ही तर महाराष्ट्रातील सर्कस व्यवसायाची प्रमुख बाजारपेठच होती. तासगावच्या एकूण पंधरा एक सर्कस होत्या. त्यापैकी परशुराम सर्कस ही सर्वांत मोठी. जी. ए. सर्कस, भोसले सर्कस, पाटील-कुलकर्णी सर्कस या अन्य काही उल्लेखनीय सर्कस. म्हैसाळ हीदेखील सर्कसची जन्मभूमी. सुप्रसिद्ध देवल सर्कस आणि द ग्रेट बाँबे सर्कस या म्हैसाळच्या नावाजलेल्या सर्कस होत. याखेरीज वडगाव (जि. नगर) येथील मोरे ग्रॅण्ड सर्कस, पटवर्धन सर्कस, सँडो सर्कस, लेडीज सँडो सर्कस या काही उल्लेखनीय सर्कस होत. शंकरराव थोरात यांनी वडगाव इथं स्थापन केलेली ‘ग्रॅण्ड इंडियन सर्कस’ हीदेखील त्या काळात नावाजलेली होती. शेलार सर्कसमध्ये आपल्या कादकिर्दीची सुरुवात केलेले दामू गंगाराम धोत्रे (१९०२-७३) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पशुशिक्षक होते. अमेरिकेतील ‘रिंगलिंग बदर्स’ या प्रख्यात सर्कसमध्ये त्यांनी पशुशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे पशूंचे खेळ करून जागतिक कीर्ती मिळवली. वन्य श्वापदांबरोबरच्या आपल्या रोमहर्षक आणि साहसी अनुभवांचं कथन त्यांनी 'वाघसिंह माझे सखे-सोबती' या पुस्तकात केलं आहे.

 

महाराष्ट्रानंतर मोर्चा केरळकडे
महाराष्ट्रातील सर्कस जसजशा बंद पडू लागल्या, तसतसं सर्कस व्यवसायाचं केंद्र केरळकडे सरकू लागलं. केरळमध्ये तेल्ल्चेरी इथं सर्कस व्यवसायाची बाजारपेठ उभी राहिली. तिथून अनेक कलावंत, कसरतपटू सर्कस व्यवसायात शिरले. दामोदरन यांनी स्थापन केलेली सुप्रसिद्ध ‘कमला थ्री रिंग सर्कस’, ‘जेमिनी’, ‘ग्रेट बाँबे’, पी. त्यागराज यांची ‘ग्रेट प्रभात सर्कस’, ‘न्यू प्रकाश’, ‘रेमन’ इत्यादी केरळी (मलबारी) सर्कस भारतभरात लोकप्रिय झाल्या होत्या. आंध्र प्रदेशातील प्रा. राममूर्ती यांची सर्कसही फार नावाजलेली होती. हळूहळू सर्कशींची काळ गेला. आता भारतभरात कशाबशा 16 सर्कस आहेत.

 

दुनिया एक सर्कस है!
सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना 'दुनिया एक सर्कस है' हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला 'दुनिया एक सर्कस है', हे पक्कं ठाऊक आहे बरं! 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.