टॉप न्यूज

हनुमंतराया, आखाडे टिकव, कुस्ती जगव!

राहुल रणसुभे, मुंबई
मराठी मातीत एक काळ होता... घरात पैलवान अन् दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं. आजही गावागावात मारुतीची मंदिरं आहेत आणि तिथंच आसपास तालीमही. या तालमी आज ओस पडल्यात. जत्रांमध्ये भरणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्यांना उतरती कळा लागलीय. बदललेल्या जीवनशैलीत खुराक इतिहासजमा होऊन त्याची जागा टॉनिकनं घेतलीय. अंग मोडून मेहनतीनं व्यायाम करणं कुणालाच नकोय. त्यामुळं तालमीतील लाल मातीत कोणी उतरत नाही, शड्डू काही घुमत नाही. आरोग्याबाबत कधी नव्हे ती जागृती येत असताना तब्येत घडवणाऱ्या तालमीच ओस पडू लागल्यात. आजच्या हनुमान जयंतीला बजरंगबलीचा जयघोष करताना तब्येतीत राहण्याचा मार्ग तालमीतून जातो, हे नव्यानं सांगण्याची गरज निर्माण झालीय.

hanuman


कुस्तीची परंपरा...

कुस्तीची परंपरा ही अगदी पूर्वापार चालत आलेली. महाभारतातील कौरव-पांडवांचं मल्लयुध्द असो की, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत खेळत असलेली कुस्ती या सर्वांचे उल्लेख पुराणांमध्ये सापडतात. पुराणामध्ये ज्या सोळा विद्यांचा उल्लेख केला आहे त्यातील कुस्ती ही एक आहे. अगदी एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलाची उपासना मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळं वीरासारखे वीरसुध्दा तालमीत जाऊन सराव करत. समर्थ रामदास स्वामींनी याच काळात गावोगावी तालमी सुरू केल्या आणि हनुमानाची मंदिरं बांधून कुस्तीची उपासना सुरू केली. अशा या ऐतिहासिक कुस्तीला आज अत्यंत हलाखिचे दिवस आले असून, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांतूनही कुस्ती आज बाहेर पडली आहे. त्यामुळं आजच्या या हनुमान जयंतीच्या निमित्तानं चला बजरंगबलीला या कुस्तीला वाचवण्याचं साकडं घालूया.


images 1कुस्ती पंढरी
भारतभरात कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचं कार्य करवीर नगरीत केलं! राजर्षींनी कोल्हापुरात अनेक तालमींची निर्मिती केली. आजही या तालमीत शड्डू घुमतात. प्रत्येक तालमीत तयार होणाऱ्या पैलवानांमध्ये ईर्ष्या, स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदानं महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भरू लागली. स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही हे त्यामागचं सूत्र होतं. सुरुवातीची मैदानं मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी बाबूजमाल दर्गा आणि मंगळवार पेठेतील शिवाजी थिएटरच्या प्रांगणात भरत. शिवाय महत्त्वाच्या सणासुदीलाही कुस्त्यांची मैदानं भरवली जात. नव्या राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सभोवती कनात लावून मैदानं होत. ही सारी मोफत असल्यानं प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होई! जेव्हा महाराज १९०२मध्ये विलायतेला गेले तेव्हा त्यांनी रोमला भेट दिली. तिथली ऑलिंपिक नगरी आणि ओपन एअर थिएटर नजरेसमोरून घातले. महाराजांचे विचारचक्र सुरू झालं. कोल्हापूरला येताच लाखभर प्रेक्षकांसाठी कुस्त्यांचं मैदान बांधण्याचं ठरलं. आणि १९१२ मध्ये खासबाग मैदानाच्या बांधकामाला सुरुवात झाली. साठ फूट व्यासाचा आणि जमिनीपासून २।। फूट उंच असणारा आखाडा, प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रवेशासाठी चारही बाजूला व्दार, नैसर्गिक लाभलेली उतरण यामुळं कोल्हापूरचं खासबाग मैदान म्हणजे आशिया खंडात शोधून सापडणार नाही, असं एकमेव मैदान. पुढे राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांचं मैदान या नावानं ओळखलं जाणारं! हजारो कामगार सहा वर्षं राबत होते. या मैदानात राजर्षीच्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपावेतो गामा-गुंगपासून युवराज सत्पाल अशा अनेक नामवंत मल्लांच्या लढती झाल्या. पंजाबातून आलेल्या मल्लावर इथल्या कुस्तीगीरांनी मात केली. श्रीपत चव्हाण, मल्लाप्पा तडाखे, शिवगौंडा मुत्नाळे, शामराव मुळीक, श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, गणपतराव आंदळकर, महंमद हनीफ, दादू चौगुले, गणपत खेडकर, हरिश्चंद्र बिराजदार, युवराज पाटील इ. अनेकांची नावं घेता येतील.


Facebookसोशल नेटवर्किंगचा यशस्वी वापर
सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथील कुस्ती आणि मल्लविद्या या संस्थेचे संस्थापक आणि संचालक मिलिंद मनुगुडे हे आजच्या या परिस्थितीतही कुस्तीचं संवर्धन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी सोशल नेटवर्किंगच्या साह्यानं जगभरातील कुस्तीप्रेमींना एकत्र आणण्याचं काम केलंय. कुस्ती- मल्लविद्या या त्यांच्या फेसबुकच्या पेजवर त्यांनी तब्बल साडेबारा हजार लोकांना जोडलंय. या पेजच्या माध्यमातून कुस्तीच्या राज्य तसंच देशभराच्या पातळीवरील कुस्ती स्पर्धा, बातम्या, परिषद या सर्वांची अद्ययावत माहिती ते सर्वांपर्यंत पोहोचवत असतात.

कुस्ती - मल्लविद्या या फेसबुक पेजवर जाण्यासाठी इथं फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करा.


1130774951.0Z5tx9IO.Kusti60कुस्तीला उतरती कळा
आजच्या कुस्ती आखाड्यांविषयी त्यांनी 'भारत4इंडिया'शी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर ठिकाणी कुस्तीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आज राज्यभरात जवळपास 350 ते 400 कुस्ती आखाडे आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या केवळ तीन शहरांतच यातील 50 टक्के आखाडे आहेत. पुणे, सोलापूर या भागात 20 टक्के, तर इतर उर्वरित महाराष्ट्रात 30 टक्के आखाडे आहेत. परंतु विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील आखाडे सध्या ओस पडलेत. कारण आज चित्रपट, जाहिराती आदींमुळं तरुणांचा कल हा तालमीपेक्षा जिमकडं जास्त दिसून येतो. कुस्ती हा मेहनतीचा, थोडा कसरतीचा व सरावाचाही भाग असल्यानं विद्यार्थ्यांना ते टिकवून ठेवणं जमत नाही. तसंच फास्टफूडच्या जमान्यातील आजच्या तरुणाईची तूप खाल्लं की रूप यावं, अशी अपेक्षा असते. शॉर्टकट इथपण आहेच. त्यामुळंच खुराक लावून तालमीत मेहनत करण्यापेक्षा औषधं खाऊन आणि जिममध्ये व्यायाम करून तब्येत कमावण्याकडं त्यांचा कल असतो.

 

kusti22प्रसिद्धी होत नाही
कुस्तीचं महत्त्व काय आहे, याची पाहिजे तशी प्रसिध्दी होत नाही. त्यामुळंही कुस्तीचा प्रचार आणि प्रसार ज्याप्रमाणं व्हायला हवा तसा होताना दिसून येत नाही. खरं पहायचं झालं तर कुस्ती ही भारताची सर्वात प्राचीन विद्या मानली जाते. अगदी रामायण, महाभारतापासून याचे उल्लेख आणि संदर्भ आपल्याला सापडतात. तर ती पुढे चालत शिवरायांच्या काळातून पुढे येत अगदी स्वातंत्रपूर्वकाळातही कुस्तीला चांगला प्रतिसाद मिळत होता. खरं पाहता आताच्या धकाधकीच्या जीवनात तब्येत नीट राखण्याला कमालीचं महत्त्व आहे. त्यासाठी खरं तर कुस्ती हाच एकमेव पर्याय उरलाय. सध्याचा आहार आणि हवामान पाहता जर आपलं शरीर टिकवायचं असेल तर योग्य आहाराबरोबर कुस्तीचा सरावंही अत्यंत आवश्यक आहे, असंही मनुगुडे यांनी सांगितलं.


मुंबईतही आहेत आखाडे
मुंबईसारख्या मेट्रो शहरात कुस्तीचे आखाडे आहेत. माटुंगा रेल्वे, कुर्ला, कल्याण, डोंबिवली या भागांत तुरळक का असेना आजही शड्डूचे आवाज घुमतात. कुस्तीचे आखाडे आहेत. परंतु, त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईचा पसारा आणि लोकसंख्या पाहता तालमी, आखाडे यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असं मत स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे असिस्टंट डायरेक्टर आणि महाराष्ट्र विभागाचे इनचार्ज व्ही. भांडारकर यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केलं.


स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाचं योगदान
जागतिक स्तरावर कुस्तीचा इतिहास पाहता ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत कुस्तीसाठी महाराष्ट्राचाच सहभाग जास्तीत जास्त राहिला आहे. देशाला पहिलं ऑलिम्पिकचं वैयक्तिक पदक १९५२ ला हेलसिंकी इथं झालेल्या स्पर्धेत कराडच्या खाशाबा जाधव यांनी कुस्तीतच मिळवून दिलं. त्यानंतर भारतातील कुस्तीपटूंनी आणखी तीन ऑलिम्पिक पदकं जिंकून या खेळातील आपला दरारा वाढवला होता. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारनं कांस्यपदक जिंकून ५६ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती केली. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारनं रौप्य, तर योगेश्‍वर दत्तनं कांस्यपदक जिंकलं. हे सर्व असूनही 1970 नंतर कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर कळा लागली. 70 नंतर आत्ता मागील दोन ऑलिम्पिकमध्ये नरसिंग यादव आणि योगेश्वर दत्त या खेळाडूंनी पुन्हा आपल्या राज्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवलं आहे. या दोघांपासून प्रेरणा घेत अनेक नवोदित कुस्तीपटूंनी आगामी ऑलिम्पिकच्या पार्श्‍वभूमीवर दंड थोपटले आहेत. जोपर्यंत प्रशिक्षक उच्च दर्जाचे मार्गदर्शन करणार नाहीत तोपर्यंत विद्यार्थी तरी कसे घडतील? आटपाडी, कोपरगाव अशा अनेक गावांमध्ये असलेल्या आमच्या आखाड्यांमध्ये जवळपास 300-400 विद्यार्थी प्रशिक्षण घेतायत. मातीतल्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी आमची स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया ही नेहमी प्रयत्नशील असते, असंही भांडारकर यांनी सांगितलं.

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.