गुढीपाडव्यापासूनच शिखर शिंगणापूरची प्रसिद्ध यात्रा सुरू झाली आहे. शंभू महादेवाचं ठाणं असतानाही महाशिवरात्रीशिवाय गुढीपाडव्यापासून पुढं 12 दिवस यात्रा भरते. परंपरेप्रमाणं भवानी उत्पत्ती योगावर मध्यरात्री 12 वाजता पुराणप्रसिध्द हरिहरेश्वर मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडला. तसंच चैत्र व्दादशीला मुंगी घाटातून तेली भुतोजी बुवांच्या मानाच्या कावडीतून गडावर पाणी आलं आणि शंभू महादेवाला अभिषेक झाला. चित्तथरारक असा हा भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी यंदाही राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.
शुभशकुनाची गुढी उभारून यात्रेस प्रारंभ
शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लावलं जातं. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असं म्हणतात की, देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेलं नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा-भाकरी खाऊन आणि पायात जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला. महादेवानं राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा. या घंटांपैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग असून ती शिव-पार्वतीचं प्रतीक आहेत.
कोळी बांधवांचे मानाचे ध्वज
शंभू महादेवाचं मंदिराचं मुख्य शिखर ते बलीराजा अमृतेश्वर मंदिराच्या कळसादरम्यान ध्वज बांधण्यात येतो. दोन्ही शिखरांदरम्यानचं अवकाशातील अंतर 1500 फूट इतकं असतं. एवढा लांब ध्वज बांधला जातो. कळम तालुक्यातील अप्पेगाव, औसगाव, कोळगाव या गावातील मानाचे ध्वजी भाविक असतात. हे भाविक प्रत्येक सोमवारी शुचिर्भूत पध्दतीनं ओम नम: शिवाय असा जप करीत वर्षभर हातानं ध्वज विणला जातो. शंख शिंग तुतारीच्या निनादामध्ये कोळी समाजातील भाविक कळसाला ध्वज बांधतात, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक मोहन बडवे यांनी दिली.
मानाच्या कावड्या
शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती तेल्याभुत्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणं हे तसं कष्टाचं काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचं त्यालाच मदतीला बोलावतात आणि हाकही... हक्काचं माणूस असावं तशी म्हणजे, ''हे म्हादया, धाव, मला सांभाळ'' अशी. असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. चैत्र व्दादशीला खळद, एखतपूर, सासवड या पंचक्रोशीतील भाविक मुंगी घाटातून पाण्याच्या कावडी मंदिरापर्यंत आणतात. यामध्ये तेली भुतोजी बुवांच्या मानाची कावड असते. रात्री 12 वाजता सप्त नद्या आणि शिंगणापूर परिसरातील पुष्कर तलावातील पाण्यानं शंभू महादेवाला जलाभिषेक घातला गेला.
कावडीची प्रथा
मराठवाडा भागातील भाविक हळदी विवाह सोहळ्याच्या काळात शिखर शिंगणापूर इथं दर्शनासाठी येतात. तर पश्चिम महाराष्ट्रातील भाविक कावडी सोहळा काळात येतात. परंपरेनुसार शिंगणापूर पंचक्रोशीतील गावातून कावडी येतात. कावड बनवण्यासाठी जांभूळ, बोरीच्या झाडाचा वापर होतो. यावर नंदी आणि महादेवाची छोटी मूर्ती बसवली जाते. गड म्हणजे पितळेचे हंडे बसवले जातात. याचा आकार भाविक, मानकरी ठरवतात. नवस पूर्ण झालेले भाविक कावडीस ध्वज, नारळ, दवणा, बाज बांधतात, अशी माहिती माळेवाडीचे कावडीधारक दीपक गायकवाड, गोपीचंद गायकवाड यांनी दिली. यंदा दुष्काळी स्थिती असल्यामुळं कावडीधारकांनी गावाकडूनच पाण्याच्या टाक्या आणल्या होत्या, असं कावडीधारक माधव पोटफुडे यांनी सांगितलं. मुंगी घाटातून मानाची तेली भुतोजी बुवांची कावड सायंकाळी सात वाजता निघाली. दरम्यान, अन्य सुमारे 150 कावडी मुंगी घाटातून 'म्हादया धाव' अशा घोषणा देत चित्तथरारक कडा पार करून डोंगरावर आल्या.
250 कावडी मंदिराकडं
त्याच वेळी प्रमुख पायरी मार्गावरूनही छोट्यामोठ्या सुमारे 250 कावड मंदिराकडं गेल्या. तिथं महादेवास पाण्याची धार घातली गेली. गावापासून शिंगणापूरपर्यंत पायी प्रवास करत तर काही जण ट्रकमधून कावडी घेऊ आले होते. त्यानंतर महानैवद्यही तयार केला गेला. हा कावड सोहळा मोठा नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम यांच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कावडीधारकांच्या खांद्यांवरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडीधारक एक कावड घेऊन शिखर शिंगणापूरची वाट पूर्ण करतात. मौज म्हणून या कावडीधारकांमध्ये रस्सीखेच खेळली जाते. या कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणलं जातं. या सोहळ्यात अनेक जण कावडीचं दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवलं जातं. त्यामुळं लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो, अशी समजूत लोकांमध्ये आहे.
शिव-पार्वतीची वऱ्हाडी मंडळी
शिव वरपक्षाकडून बडवे, वाघमोडे ही मंडळी असतात तर पार्वती वधूपक्षाकडून जिराईत, खाणे, वऱ्हाडे, सालकरी, सेवादारी, मानकरी, महाराज सरकार सातारकर, चारचौघाई, पाटील, चौधरी, शेटे, साळी, माळी, कोळी, कोष्टी, गुरव, जंगम, घडशी, दांगट, नाभिक आदी प्रमुख मानकरी उपस्थित राहतात. हरिहरेश्वर मंदिरात मंगलाष्टकांच्या वेळी ज्वारीच्या रंगीत अक्षतांची उधळण करण्यात येते. यावेळी राज्यात 'भरपूर पाऊस पडू दे, सर्वत्र समृद्धी नांदू दे,' अशी प्रार्थना भाविकांकडून शंभू महादेवास करण्यात आली.
ऐतिहासिक महत्त्व
महादेवाचं हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजानं वसवलंय. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठमोठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाला अतिशय महत्त्व होतं. इथं असणाऱ्या तलावाला शिवतीर्थ म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी तो इसवी सन १६०० मध्ये बांधला.
नाही म्हणायला यंदा यात्रेवर दुष्काळाचं सावट होतंच. खाद्यपदार्थांची, खेळण्यांची दुकानं होती. मात्र, देवदेव उरकून परतीची वाट धरणंच भाविक पसंत करत होते. नेहमीच्या तुलनेत यंदा चार आणेही व्यवसाय झाला नाही, अशी खंत अनेक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.
Comments
- No comments found