टॉप न्यूज

धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा

शशिकांत कोरे, सातारा
शेतमालाचा भाव पडला म्हणून कधी शेतकरी, तर भाव वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असल्याच चित्र पाहायला मिळतं. याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक' अशी संकल्पना घेऊन साताऱ्यात सुरू झालेला धान्य महोत्सव कमालीचा यशस्वी झालाय. साताऱ्यातल्या अजिंक्यतारा सहकारी फळे-फुले संस्थेनं तीन वर्षांपूर्वी ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. या महोत्सवाला मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा सातारा पॅटर्न कृषी विभागातर्फे संपूर्ण राज्यभरात राबवला जातोय. 
 

साताऱ्यातल्या अजिंक्यतारा सहकारी फळे-फुले संस्थेनं तीन वर्षांपूर्वी धान्य महोत्सव ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या धान्य महोत्सवास पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. तांदूळ ज्वारी, गहू आणि इतर कडधान्याची जोरात खरेदी-विक्री झाली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी असे महोत्सव घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी कृषी विभागानं विशेष पुढाकार घेतला. त्यातून शासनाचं सहकार्य आणि सेवाभावी संस्थेचा पुढाकार असा 'सातारा पॅटर्न' तयार झाला. धान्य महोत्सवाची उलाढाल दरवर्षी वाढती राहिली. यंदा तर ती दीड कोटींवर पोहोचली आणि त्यावर यशस्वीतेची मोहोर उठली. धान्य महोत्सवाचा हा 'सातारा पॅटर्न' राज्यात राबवण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

 

tandul mohsav satra 2'सातारा पॅटर्न'

या धान्य महोत्सवाची यशोगाथा समजल्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सातारा पॅटर्नचं तोंडभरून कौतुक करून तो राज्यभरात राबवण्याची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे सरकारचं आता नवीन कृषी धोरण तयार होतंय, त्यात याचा समावेश करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

 

दोन दिवसात दीड कोटीची उलाढाल
साताऱ्यात दोन दिवसांत दीड कोटीची उलाढाल झाली. यामध्ये सातारा, जावळी, वाई, पाटण तालुक्यातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. गतवर्षी दोन कोटीची उलाढाल झाली होती. या वेळी महोत्सव केवळ दोन दिवस राहिल्यामुळं एक कोटी 58 लाख रुपयांची उलाढाल झाली, त्यामध्ये 1478 क्विंटल तांदूळ, 1487 क्विंटल गहू, 1353क्विंटल ज्वारी, 147 क्विंटल हरभरा अशा शेतीमालाची विक्री झाली.

 

tandul mohsav satra 15कृषी विभागाचा सहभाग
कृषी विभाग राज्यात जिल्हानिहाय ही संकल्पना हंगामानुसार राबवत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून शेतीमालाची आडत, हमाली आदी खर्च घेतला जात नाही, 20 एप्रिल ते 21एप्रिल या दोन दिवसात ज्वारी गहू आणि तांदूळ यांची विक्री केली गेली. त्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांशी संपर्क साधला. यामुळं दुष्काळी परस्थितीवरही शेतकऱ्यांनी मात केली. सरकारच्या पाणलोट उपक्रमाचा फायदा घेतला, तसंच पाऊस पडला असतानादेखील ज्वारी, गहू पिकं घेतली. आता ही धान्यं ग्राहकांना उपलब्ध झालीत, अशी माहिती कृषी अधीक्षक विकास पाटील यांनी दिली.

 

tandul mohsav satra 7लोकवन गहू आणि दुर्मिळ घनसाळ तांदळाला मागणी
या धान्य महोत्सवात धान्याचे दुर्मिळ वाणही विक्रीसाठी होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये दगडी ज्वारी, मालदांडी ज्वारी हे सेंद्रीय पध्दतीनं पिकवलेले धान्यप्रकार होते. ग्रामीण भागातील प्रसिध्द खपली गहू, लोकवन गहू, तपोवनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता. दिवाळीच्या काळात खास तांदूळ महोत्सव असतो. त्यावेळी भाताचे सुमारे चाळीस प्रकार खरेदीस मिळतात. ज्या शेतकऱ्यांचे तांदूळ शिल्लक असतात ते शेतकरीही या वेळी तांदूळ विक्रीसाठी सहभागी होतात. दुर्मिळ असा घनसाळ हा तांदूळही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता, तसंच मेनका, कुसळ, इंद्रायणी, भोगावती, आंबेमोहर आदी तांदूळ विक्रीस उपलब्ध होते. करंजे गावचे युवा शेतकरी राजेंद्र लाड यांनी स्वतःचा वसुंधरा हा ब्रॅण्ड तयार केलाय. त्यांनी पिकवलेल्या या ब्रॅण्डलाही चांगली मागणी होती.

 


tandul mohsav satra 9ग्राहक समाधानी

शेतकऱ्यांचा माल व्यापारी घेतो आणि ग्राहकांला जादा किमतीत विकतो याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती झालीय. त्यापेक्षा थेट शेतकऱ्यांकडून घेतलेला माल निवडक, चांगला असतो. या महोत्सवामुळं वर्षभर लागणाऱ्या ज्वारी, गहू, तांदूळ यांची खरेदी करण्याची संधी ग्राहकाला मिळते. त्यामुळं ग्राहक समाधानी आहेत, अनेकांनी पोचपावती दिल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी सांगितलं. यामुळं शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद होतो, हे जास्त महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.