टॉप न्यूज

लग्नाचे पैसे दिले जित्राबांच्या चाऱ्याला!

शशिकांत कोरे, सातारा
राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हौसमौज बाजूला ठेवून चार जोडप्यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह उरकला. एवढंच नव्हे तर वाचलेल्या पैशातून जनावरांच्या छावण्यांना चार ट्रक चारा पाठवून दिला. फलटण तालुक्यातील गोखळीच्या जोडप्यांचा हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय बनून राहिलाय. यापासून तरुणाईनं प्रेरणा घेऊन समाजातील दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी कायम पुढाकार घ्यावा, या उद्देशानं राष्ट्रीय समाज पक्षानं यासाठी पुढाकार घेतला होता.
 

 

सामाजिक परिवर्तनाचं पाऊल

एप्रिल-मेमध्ये सर्वत्र लगीनघाई उडालेली असते. पण या आनंदाच्या क्षणालाही आज राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटाचं गालबोट लागलेलं दिसतं. हा दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबवल्या जात आहेत. सामाजिक संस्थांद्वारे, लोकांच्या माध्यमातून जागृतीही केली जातेय. अशा या कठीण प्रसंगी विवाहात काटकसर करुन त्यातून वाचलेला पैसा दुष्काळग्रस्तांसाठी खर्च करण्याचा निश्चय गोखळीतील चार युवकांनी केला. त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनीही लगेच होकार दिला. विवाह नोंदणी रजिस्टरमध्ये सही केली त्याच वेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेर चाऱ्याचे ट्रक तयार ठेवले होते. विवाह झाल्याचं जाहीर केल्यानंतर पेढे वाटण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांनी पहिल्यांदा हे चाऱ्याचे ट्रक रवाना केले.

 

CharaVivah 2मुक्या जित्राबांसाठी चार घास

रखरखतं ऊन, दुपारी बाराची वेळ, सहाय्यक निबंधकांचं कार्यालय वधूवर आणि सोबत आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी खचाखच भरलेलं. तेवढ्यात बंजरंगनी हाक दिली, 'चाऱ्याचं ट्रक आलं रं.' सगळे जण एकमेकाकडे बघू लागले. तेव़ढ्यात सहाय्यक निबंधकास नवरदेवानं सांगितलं, "आमच्या लग्नातला खर्च वाचवून, आम्ही मुक्या जित्राबांसाठी चार घास देतोय.”

"आम्ही आज लहानाचं मोठं या जित्राबांचं दूध पिऊनच झालो. परमेश्वरानं बक्कळ पैसा दिलाय. म्हटलं तर गावातलं सगळ्यात मोठं लग्न थाटात होईल. लग्नात कितीही मानपान केला तरी नावं ही ठेवलीच जातात. त्यापेक्षा खर्चात बचत करून दुष्काळात ऊन्हातानात होरपळणाऱ्या जित्राबांना चार ट्रक कडबा देतोय,” असं मनोगत नवरदेव रजनीकांत बजरंग खटके यांनी व्यक्त केलं.

CharaVivah 8एकाच दिवशी चार जोडप्यांची लग्नं सहाय्यक निबंधक दिलीप पाटील यांनी लावली आहेत. त्यांनीसुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं. लग्नसराईत दररोज दहा-बारा लग्न होतात. वर्षाकाठी हजार-बाराशेपर्यंत आकडा जातो, असं सांगितलं.

 

नोंदणी विवाह

नोंदणी विवाह करण्यासाठी वधूवराचे रहिवासी दाखले, तीन फोटो, साक्षीदार, नोदणी फॉर्म इत्यादी गोष्टी आवश्याक आहेत. या पध्दतीनं लग्न करण्यासाठी केवळ दोनशे रुपये शासकीय खर्च येतो.

 

CharaVivah 13बजरंगाची कमाल

चाऱ्याचा ट्रक घेऊन आलेला बजरंग हा वरबाप. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. बजरंग खटके यांनी आपलं मनोगत मांडताना स्पष्ट केलं, की गोखळी गावातील युवकांनीच निर्णय घेतला की लग्न नोदणी पध्दतीनं करायचं. माझ्या मुलांना, घरच्या मंडळींनाही विचार पटला. दोन ट्रक चारा पाठवला, आता कडबा मिळाल्यास आणखी दोन ट्रक देणार आहे. गावातील मुलांना पुस्तकं, ग्रंथ आदीसाठी गावच्या स्वामी विवेकानंद वाचनालयासही ५१ हजार रुपयांची देणगी दिलीय. याशिवाय लग्न वऱ्हाडावर खर्च होणारं पेट्रोल, डिझेल वाचवून राष्ट्रीय संपत्तीही वाचवलीय.

 

CharaVivah 10

अनोखी जोडपी

श्रीकांत खटके हा वर एमएससी अॅग्री असून औरंगाबाद इथं पोलीस सब-इन्स्पेक्टर आहे, तर त्यांची नववधू त्रिवेणी मोकाशी ही वकील आहे. "समाजात स्त्री-भ्रूणहत्या ही मुलीच्या खर्चाला घाबरून होते, पण नोंदणी पध्दतीनं विवाह केल्यास ही समस्या दूर होऊ शकेल,” असं मत श्रीकांत खटके यांनी व्यक्त केलं. "सामाजिक जबाबदारी पेलत नवं दाम्पत्य जीवन सुरू करतोय याचा आनंद वाटतोय,” असं सागर खटके या वरानं सांगितलं. एकूणच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोखळी गावानं नोदणी पध्दतीचा विवाह करण्याचा निर्णय घेत लग्नावर होणाऱ्या वारेमाप खर्चावर टाच तर आणलीच, याशिवाय या बचतीतून समाजहित साधण्याचा संदेश देत राज्यातील गावांसमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केलाय.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.