हापूसला खुणावतंय जग
आंबाप्रेमींना कोकणातील अस्सल हापूस रास्त दरात उपलब्ध व्हावा, या उद्देशानं गेल्या काही वर्षांपासून देशभरात आंबा महोत्सवांचं आयोजन केलं जातं. राज्य सरकारच्या पणन मंडळांच्या पुढाकारानं पुण्या-मुंबईत धुमधडाक्यात होणाऱ्या या आंबा महोत्सवासाठी पर्यटनासाठी भारतात आलेल्या विदेशी नागरिकांना आवर्जून आमंत्रित करण्यात येत होतं. त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न असायचा... आंबा कसा खाल्ला जातो? काटा-चमच्यानं खाणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन या महोत्सवात सुरुवातीला आंबा कसा खायचा, याचं प्रशिक्षणही दिलं जात होतं. एकदा का जिभेला चव लागली की चटक लागल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास त्यामागं होता. तो किती सार्थ होता, हे आता पाहायला मिळतंय. आजच्या मितीला हापूसच्या आंतरराष्ट्रीय मार्केटिंगला चांगलं यश मिळत असून अमेरिका, इंग्लंडसह जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, दुबई, सिंगापूर, हाँगकाँग इथं हापूस चांगलाच खपतो.
असा झाला लंडनमध्ये हापूस महोत्सव
लंडन महापौरांच्या वतीनं दरवर्षी ट्रफलगार चौकात बैसाखी महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाच्या या उत्सवात खास हापूस आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकताच ४, ५ आणि ६ मे रोजी लिस्टर इथं हा आंबा महोत्सव झाला. लंडनच्या उपमहापौर व्हिक्टोरिया बोरविक यांनी या महोत्सवाला भेट दिली. हापूसच्या अप्रतिम चवीची मोहिनी आपल्यालाही पडली असून त्याला लंडनमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या महोत्सवाच्या निमित्तानं लंडनमधील प्रसिद्ध कॅटर्स 'मधूज'च्या माध्यमातून २० हजार लोकांना मँगो लस्सीचं वाटप करण्यात आलं. हापूसचा फ्लेवर असलेली लस्सी लंडनवासीयांनी मिटक्या मारीत चाखली. या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी पणन विभाग यांचं विशेष सहकार्य लाभल्याचं कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी सांगितलं. राजा-राणी ट्रॅव्हल्सचे अभिजीत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार भाई जगताप, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, 'खाना खजाना' कार्यक्रमातील प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, माजी आमदार बाळ माने आणि १५ आंबा उत्पादक शेतकरी यात सहभागी झाले होते.
आखाताला पडली भुरळ
हापूसनं यंदा न्यूझीलंड देशातील नागरिकांचीही चव भागवली आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये चार हजार डझन हापूस आंबा निर्यात झालाय. कोकणातील हापूस आणि आखाती देश हे एक अतूट नातं आहे. त्यामुळं दुबईत या आंब्याला चांगली मागणी आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्यानं हापूस आंब्याची चव चाखल्याशिवाय इथले भारतीय राहत नाहीत. गेली अनेक वर्षं अमेरिका, युरोप, आखाती देशांतील खवय्याची हौस भागवल्यानंतर आता हापूस थेट न्यूझीलंड या बेटावर पोहोचलाय. आतापर्यंत दहा कंटेनर पाठवण्यात आलेत. याशिवाय अशोक डोंगरे या मराठमोळ्या निर्यातदारानं नुकताच दुबईच्या राजाला शंभर डझन आंबा पाठवला आहे. हे गिफ्ट दुबई, चेन्नई इथं मॉल व्यवसाय करणाऱ्या एका भारतीयानं दिलं.
गुजरात, चेन्नई, कर्नाटकचा हापूस बाजारात
राज्यातील बाजारपेठेत हापूसबरोबरच देशातील इतर प्रांतांमधून येणाऱ्या आंब्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे. यात गुजरात काटियावाड भागातील केसर आंबा हापूस आंब्याला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय चेन्नई, कर्नाटक इथल्या हापूसची आवक बाजारात वाढली आहे. याशिवाय आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील बदामी, लालबाग, तोतापुरी या आंब्यांनीही बाजारपेठ फुलून गेलीय.
गावरान वाणांचाही बोलबाला...
बाजारात राज्यातील गावरान वाणाची म्हणजेच केशर, रायवळ, गोटी आंबा यांचीही आवक बाजारात दिसते आहे. छोट्यामोठ्या शहरांमधून, तसंच गावांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारातून हे गावरान आंबे विकायला येत असल्याचं पाहायला मिळतंय. फळाचा आकार, चव यानुसार त्याचा भाव ठरत असून सध्या 50 रुपयांपासून ते 150 रुपये डझन या दरानं त्याची विक्री होतेय.
Comments
- No comments found