टॉप न्यूज

उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी

ब्युरो रिपोर्ट, मुंबई, पुणे, नाशिक
उन्हाचा पारा चढत असताना शेतातील माळवं जगवण्यासाठी बळीराजाला जीवाचं रान करावं लागतंय. परंतु ते करुन भाजीपाला राखलेल्या शेतकऱ्यांची सध्या चांदी होताना पाहायला मिळतेय. लग्नसराईमुळं वाढती मागणी असतानाही बाजारपेठेत पुरेसा भाजीपालाच नसल्यानं भाव गगनाला भिडलेत. साहजिकच ज्यांनी भाजीपाला केलाय त्या बव्हंशी बागायत पट्ट्यातील शेतकऱ्याला मनासारखा पैसा मिळू लागलाय. वांगी, कोबी, काकडी, टोमॅटो, भेंडी यांना चांगला भाव आहे. तर आलं, कोथिंबीर, मिरची काही विचारू नका. कोथिंबीर जुडी 60 रुपयांवर तर मिरची 20  ते 60 रुपये प्रतिकिलो झालीय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेल्या मध्यमवर्गीयांच्या खिशाला यामुळं चाट बसत असून भाजीपाला आवाक्यात येण्यासाठी त्यांना पावसाळा सुरू होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

 

उन्हाळी भाजीपाल्यातून होतेय चांदीVegetables 1

साधारणपणे वैशाख पेटला की दरवर्षीच भाजीपाल्याचे भाव वाढतात. ज्यांच्याकडं हक्काचं पाणी आहे, असे बागायती शेतकरी हा हंगाम हाताशी घावेल, अशा पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातल्या त्यात नाशिक, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील बागायत पट्ट्यातील शेतकरी त्यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील परभणीसारखा जिल्हा तसंच विदर्भातील काही जिल्हे आणि खान्देशातील जळगावच्या पट्ट्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाला करतात. या दिवसांत बाहेर सूर्य आग ओकत असल्यानं भाजीपाला नेहमीप्रमाणं पुण्या-मुंबईच्या मोठ्या बाजारात पाठवणं जिकरीचं होऊन जातं. त्यामुळं बहूतांश शेतकरी भाजीपाल्याला फार तर जिल्ह्याची बाजारपेठ दाखवणंच पसंद करतात. नाहीतर तिथंही त्यांना दर चांगलाच मिळतो. परिणामी पुण्या-मुंबईत भाजीपाल्याचे दर भडकतात. सध्या तशीच परिस्थिती उद्भलीय, अशी माहिती वाशीतील भाजीपाल्याचे ठोक विक्रेते फकरुद्दीन बागायतदार यांनी दिली.

 

Vegetables 2हवं हक्काचं पाणी आणि मनुष्यबळही!

वैशाखात उन्हाचा चटका तीव्र झालेला असतो. त्यामुळं या दिवसात भाजीपाल्याचं उत्पादन कमीच असतं. ज्यांच्याकडं मुख्य म्हणजे हक्काचं पाणी असतं तेच शेतकरी उन्हाळी भाजीपाला घेतात. सध्या पाण्याखालोखाल रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. 250 ते 300 रुपये रोजगार देऊनही कामाला माणूस मिळत नाही. त्यामुळं पाण्याबरोबरच मनुष्यबळ असणारे शेतकरीच उन्हाळी भाजीपाला पिकवतात, असं साताऱ्याजवळील नागठाणे येथील सूर्यकांत साळुंखे या प्रगतशील शेतकऱ्यानं सांगितलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याचे भाव चांगलेच भडकलेत. गेल्यावर्षी लग्न तिथी कमी होत्या. यंदा तिथी असल्यानं लग्नसराईची धामधून जोरात आहे. त्यामुळं भाजीपाल्याची मागणी वाढलीय. तालुका, जिल्ह्यातील मोठे कॅटरर्स बांधावर जाऊन अगोदरच भाजीपाल्याचं बुकींग करुन ठेवतात. त्यांच्या ठरलेल्या वेळेत शेतकरी माल पोहोच करतात, असंही आता सुरू झालं, अशीही माहिती त्यांनी दिली.

 


green vegetables
नाशिकही भाव खातंय

नाशिक येथील बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिलीय. लग्नसराईमुळं शिमला मिरची, काकडी, वांग्यांना मागणी वाढल्यानं दरांमध्ये तेजी आहे. शिमला मिरचीची सरासरी आवक 200 क्विंटल झाली. शिमला मिरचीच्या प्रति 20 किलोच्या क्रेटला 250 ते 350 तर सरासरी 300 रुपये दर मिळाला. काकडीची सरासरी 90 क्विंटल आवक होती. काकडीच्या प्रति 20 किलोच्या क्रेटला 100 ते 300 तर सरासरी 200 रुपये दर होते. वांग्याची सरासरी 200 क्विंटल आवक झाली. वांग्याच्या गावरान आणि संकरित वाणांच्या प्रति 16 किलोच्या क्रेटला 100 ते 250 तर सरासरी 150 रुपये दर होता. मिरची, वांगी आणि काकडीच्या दरात प्रति 20 किलोच्या क्रेटमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यांत बहूतांश प्रमाणात शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड केली जात असल्यानं उन्हाळ्यातही चांगलं उत्पादन निघतं, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. यंदा बाजारात मिरचीची आवक कमी आणि मागणी जास्त झाल्यामुळं वाढत्या तेजीचा मिरची उत्पादकांना लाभ झाला. मिरचीला मुंबईसह कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, इंदूर या राज्याबाहेरील बाजारपेठांतूनही चांगली मागणी आहे.


पुण्यातही मिरची, कोथिंबीर भडकली

पुण्यातल्या गुलटेकडी मार्केटयार्डातही भाजीपाल्यांचे भाव भडकलेत. दर रविवारी इथं आवक होत असते. गत रविवारी (ता. 12) सुमारे 150 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. हिरवी मिरची आणि घेवड्याची आवक घटल्यानं दरात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.पालेभाज्यांचे दर (शेकडा) -

कोथिंबीर - 500-2000,
मेथी 500-1000,
शेपू 500-700,
कांदापात 500-1000,
चाकवत 300-500,
करडई 300-400,
पुदिना 200-300,
अंबाडी 400-500,
मुळे 800-1000,
राजगिरा 300-500,
चुका 300-500,
चवळई 300-500,
पालक 400-500.

Gingerkothimbirwangi

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.