स्पर्धेत 37 स्पर्धकांचा सहभाग
खरं तर कोकणात बैलगाडी स्पर्धा तशी दुर्मिळच. बैलगाडी शर्यतीचं आयोजन म्हटलं की पश्चिम महाराष्ट्राचीच मक्तेदारी. पण चिपळूणच्या अडरे या छोट्याशा गावानं पहिल्यांदाच भव्य-दिव्य स्वरुपाची बैलगाडी स्पर्धा भरवली आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून ३७ स्पर्धकांनी यात आवर्जून सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये पुण्याच्या शारदा पाटील यांच्या गाडीनं पहिला, कराडच्या वरणा हॉटेलनं दुसरा तर वेळेच्या वाघजाई प्रसन्न गाडीनं तिसरा क्रमांक पटकावत बैलगाडी शर्यतीत आम्हीही कमी नाही हे दाखवून दिलं.
स्पर्धेचा कोकणातला इतिहास
कोकणात रायगड वगळता फार ठिकाणी बैलगाडी शर्यती होत नाहीत. हल्ली हल्ली त्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. कोकणातील आरवली, रामपूर, राजापूर, पळंदे, गुहागर, डेरवण, दापोली, मिरजोळी, रत्नागिरी या भागात तुरळक प्रमाणात बैलगाडी शर्यती होतात. फार ठिकाणी होत नाहीत. अडरे गावात कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा होते. दसपटी क्रीडा मंडळ पूर्वीपासून कबड्डी स्पर्धा भरवत असत. पण काही वेगळं केलं पाहिजे म्हणून त्यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा बैलगाडी स्पर्धा आयोजित केली. कालांतरानं त्याची महती लोकांपर्यंत पोहचू लागल्यानं बैलगाडी जी आकारानं छोटी असते आणि खास शर्यतीसाठी वापरली जाते, त्याचा वापर वाढला. लोकांची तुफान गर्दी होत असे. त्याचबरोबर त्यांच्याकडे बैल असत आणि तो शर्यतीत जिंकला की त्याची किंमत वाढते हे लोकांना कळू लागलं. त्यामुळं स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढू लागली. दरम्यानच्या काळात कोर्टानंही बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी आणली. त्यानंतर बैलगाडी शर्यती दरम्यान त्रासदायक वस्तूंचा वापर करु नये, या अटीवर कोर्टानं शर्यतींना परवानगी दिली आणि मग या स्पर्धेचं आयोजन पुन्हा सुरू झालं. आजही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इथं स्पर्धा होत नाहीत. या स्पर्धांच्या निकालांवर नजर टाकली तर आजही त्यावर पश्चिम महाराष्ट्राचीच मक्तेदारी आहे. फरक फक्त एवढाच पडला की इथल्या बैलांचाही भाव वधारु लागला.
विजेता बैल 'चंदर'
या बैलगाडी स्पर्धेबरोबरच लोकांनी चंदरला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. चंदरनंच या स्पर्धेत शारदा पाटील यांना विजयी केलं. चंदर नावाच्या बैलाची किंमत आहे तब्बल ३५-४० लाख रुपये. महत्त्वाचं म्हणजे ही किंमत मालकानं नाही तर लोकांनी लावली आहे. बैल जितक्या जास्त स्पर्धांमध्ये जिंकतो तेवढीच त्याची किंमत वाढत जाते. चंदरला जेव्हा विकत घेण्यात आलं तेव्हा त्यांनी किंमत ५ लाख १० हजार रुपये. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जिथं जिथं बैलगाडी स्पर्धा आयोजित केली जाते. तिथं चंदरला आला आहे का? ही चौकशी होतेच होते.
स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांचीही गर्दी
रत्नागिरी आणि आसपासच्या जिल्ह्यातून हजारो प्रेक्षक खास ही बैलगाड्यांची स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. आयपीएल पेक्षा बैलगाडी शर्यतीला त्यांनी आपली पसंती दिली. आयपीएलची मॅच बघायला जाणं शेतकऱ्यांना आणि गरिबांना शक्य नसतं. मात्र ही बैलगाडा शर्यत मोफतच असल्यामुळं तसंच बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये अधिक थरार असल्यामुळं ती बघायला गर्दी प्रेक्षकांची होते, अशा प्रतिक्रिया इथं हमखास ऐकायला मिळत होत्या. तरुणांबरोबरच लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धांनीही इथं हजेरी लावली होती. काही प्रेक्षक तर आपल्याला स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी झाडावर तळ ठोकून बसली होती.
भरपूर बक्षिसांचं वितरण
या स्पर्धेत भरघोस बक्षिसांचंही वितरण झालं. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला २० हजार १३ रुपये रोख आणि चषक देण्यात आलं. तर दुसऱ्या क्रमांकाला १२ हजार १३ रुपये रोख आणि चषक त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाच्या बैलगाडीला ८ हजार १३ रुपये रोख आणि चषक प्रदान करण्यात आला. यात १३ हा आकडाही गंमतीशीर रित्या टाकण्यात आला आहे. ही स्पर्धा २०१३ साली घेण्यात आली म्हणून बक्षिसाच्या प्रत्येक रक्कमेत १३नं शेवट झाला. स्पर्धकांनीही या स्पर्धेचा मनापासून आनंद घेत कोकणात आणखी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत अशा प्रतिक्रिया जाता जाता नोंदवल्या.
Comments
- No comments found