टॉप न्यूज

कळवंडे धरण बांधलंय कशासाठी?

मुश्ताक खान, चिपळूण, रत्नागिरी
राज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं मुंबईतील आझाद मैदानात दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. थोडक्यात, पाण्याअभावी सर्वांच्याच तोंडचं पाणी पळाल्याचं चित्र असताना कोकणातील कळवंडे धरणातील एकूण साठ्यापैकी केवळ १० टक्के पाण्याचाच वापर होतोय. पाणी असूनही तांत्रिक आणि सामाजिक कारणांमुळं पाणी मिळत नसल्यानं या धरणाचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत.
 

 

दोन दशलक्ष घन मीटर पाणी वापराविना

चिपळूण तालुक्यात हा कळवंडे लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. येथील पाणीसाठ्यातून १३५ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असं नियोजन आहे. परंतु लाभक्षेत्रातील वरच्या पट्ट्यातील धरणातील पाण्याचा केवळ दहा टक्केच वापर होतो. हा अपवाद वगळता उर्वरित ९० टक्के पाण्याचा वापरच होत नाही. साहजिकच धरणात दोन दशलक्ष घन मीटर पाणी असूनसुध्दा नसल्यासारखंच आहे. याबाबत विचारणा केल्यास पाटबंधारे अधिकारी तांत्रिक आणि सामाजिक कारण पुढं करतात.

 

kalvane dharan 1१० टक्केच पाणी वापरात

लाभक्षेत्रात धरणाच्या खालच्या भागात राहणारे शेतकरी धरणातील पाण्याचा वापर करत नाहीत, आणि धरणाच्या वरील भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी हवं असूनही ते उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. कळवंडे परिसरात वरील भागात राहणारे शेतकरी पाण्याची मागणी करताहेत, पण सरकारी नियमानुसार धरणातून त्यांना फक्त १० टक्के पाणी उचलण्याची परवानगी आहे. जे शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत त्यांना पाणी मिळत नाही आणि ज्यांना पाणी वापरण्याची मुभा आहे त्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नाही, अशी इथली परिस्थिती आहे. एकंदरीत दोन्ही दृष्टीनं हा विषय शेतकऱ्यांच्या तोट्याचाच बनत चाललाय. त्यामुळं सरकारनं याचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी शेतकरी करतायत.

kalvane dharan 4कोकण कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन

कोकणातील बहुतेक धरणांची परिस्थिती अशीच आहे. धरणांमध्ये पाणी भरपूर आहे, पण सिंचनासाठी त्याचा वापर अत्यल्प आहे. या पाण्याचा परिपूर्ण वापर करता यावा यासाठी डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठानं आराखडा तयार करून तो महाराष्ट्र सरकारला सादर केला आहे. धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे प्रत्येक लाभधारकाच्या शेतात पाणीपुरवठा करण्यात यावा. त्याचबरोबर कमी दाबाची ठिबक सिंचन योजना राबवून भाजीपाला, कडधान्य किंवा तेलबिया पिकवाव्यात. यामुळं पाण्याची आणि पैशाचीही बचत होईल, असं कोकण कृषी विद्यापीठातील जलतज्ज्ञ प्रा. दिलीप महाले यांनी सांगितलं.

 

kalvane dharan 8ठिबकमुळं ३५-४० टक्के पाणीबचत

कोकण कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या पीक पद्धतीनं पाण्याचा पुरेपूर वापर करता येऊ शकतो. लाभक्षेत्रात भाजीपाला, कडधान्यांना आणि तेलबियाणांना ठिबक सिंचनच्या सहाय्यानं पाणीपुरवठा केल्यामुळं जवळपास ३५-४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत करता येऊ शकते. बचत करण्यात आलेल्या या ३५-४० टक्के पाण्याचं वाटप वरील पट्ट्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना करता येऊ शकतं. म्हणजेच खालच्या भागातल्या शेतकऱ्यांना १३५ हेक्टर शेतीला आणि वरच्या भागातल्या ७०-८० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा होऊ शकतो, असंही महाले यांनी सांगितलं.


kalvane dharan 13मत्स्य उत्पादनाचाही पर्याय

पिकांबरोबरच या धरणामध्ये मत्स्य उत्पादन घेतलं तर लाभार्थ्यांना आपसूकच एक उत्पन्नाचं साधन उपलब्ध होऊ शकतं. इथं एक हॅचरीही निर्माण करण्याचा मानस आहे. त्यातून मत्स्य बीज निर्माण करता येईल. मत्स्य बीजांना सध्या प्रचंड मागणी आहे. अशा प्रकारे एक सशक्त उत्पन्नाचं साधनही लाभधारक शेतकऱ्यांना मिळू शकतं, असंही महाले यांनी सुचवलंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.