टॉप न्यूज

तरुणांना विवेकाचं भान देणारी रथयात्रा!

ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई
स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 'उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत लढत राहा', अशा प्रकारच्या प्रेरणादायी विचारांमुळं स्वामी विवेकानंद आजही तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनून राहिलेत, याची प्रचीती या रथयात्रेला मिळणाऱ्या तरुण-तरुणींच्या प्रतिसादावरुन पाहायला मिळते. जिथं, जिथं ही रथयात्रा जाते तिथं, तिथं तरुणाईचा गराडा पडलेला असतो. अगदी देशाची आर्थिक राजधानी असेलेली मुंबईही त्याला अपवाद नव्हती.
 

Image00010600 दिवसांची रथयात्रा

स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचावेत, यासाठी पुण्यातील रामकृष्ण मठानं या रथयात्रेचं आयोजन केलंय. विवेकानंदांच्या 150व्या जयंतीदिनी म्हणजेच 12 जानेवारीपासून ही रथयात्रा सुरू झालीय. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झालेली ही रथयात्रा 600 दिवस चालणार असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात, तसंच छोट्या शहरांमधून जाणार आहे. रथयात्रेबरोबर विवेकानंदांनी लिहिलेली, तसंच त्यांच्या तेजोमय इतिहासावर, साहित्यावर इतर मान्यवरांनी लिहिलेली शेकडो पुस्तकं आहेत. रामकृष्ण मठातर्फे प्रकाशित झालेली ही पुस्तकं अल्प दरात म्हणजेच ना नफा, ना तोटा तत्त्वावर विकली जातायत. प्रत्येक ठिकाणी तरुणाई पैसे देऊन मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करते. मुंबईतही असंच सुखद चित्र पाहायला मिळालं, अशी माहिती रामकृष्ण मठाचे प्रतिनिधी संदीप महाराज यांनी 'भारत4 इंडिया'शी बोलताना दिली.

 


Image00009...असा आहे रथ

स्वयंचलित चारचाकी वाहनावर रथ बनवण्यात आलाय. पाच अबलख घोड्यांचा हा रथ मनोवेधक आहे. याशिवाय या रथात स्वामी विवेकानंद यांची पूर्णाकृती मूर्ती उभारण्यात आलीय. स्वामीजींच्या विचारांचं सारथ्य करणारा हा रथ आहे, यामध्ये कुठेच कसर ठेवण्यात आलेली नाही. रथाचं सारथ्य करण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तीच्या पोषाखापासून ते रथावर डौलानं फडकणाऱ्या भगव्या पताकापर्यंत सर्व बारीकसारीक सजावट करताना याची काळजी घेण्यात आलीय. रथावरती लाऊडस्पीकर असून त्यावर स्वामीजींची भाषणं, तसंच गीतांच्या ध्वनीफिती लावल्या जातात. याशिवाय तरुणांना आकृष्ट करण्यासाठी विवेकानंद यांच्या साहित्याची माहितीही लाऊडस्पीकरवरून दिली जाते. विशेष म्हणजे, हे सर्व इतक्या शिस्तीत होत असतं की, ते दृश्यही मोठं विलोभनीय असतं.


Image00022तरुणाईला आवाहन
स्वामीजींचे विचार तरुणांना प्रेरणादायी आहेत. तरुणाईकडूनच भारतभूमीचं पुनरुत्थान होऊ शकतं, याची शंभर टक्के खात्री स्वामीजींना होती. आज भारत जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा देश झालाय. या तरुणाईमुळंच देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा ठाकलाय. त्यामुळं विवेकानंदांच्या विचारांची आज सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळं या रथयात्रेतून आम्ही तरुणाईला या, पाहा, विकत घ्या, वाचा आणि देशकार्यासाठी स्वत:ला सिद्ध करा, असं आवाहन करत असतो. तरुणाई हेच आमचं प्रमुख लक्ष्य असल्यानं आम्ही तालुक्याच्या ठिकाणी रथयात्रेच्या मुक्कामासाठी शक्यतो कॉलेज कॅम्पसची निवड करतो. मात्र, मुंबईत आम्ही उपनगरीय स्टेशन्सवर विश्राम घेतला आणि त्याला तरुणाईनं अपेक्षेप्रमाणं प्रतिसाद दिला, असंही संदीप महाराज यांनी सांगितलं.

 

रथयात्रा महाराष्ट्र पिंजून काढणार
ही रथयात्रा 600 दिवस एवढा प्रदीर्घ काळ चालणार आहे. या दिवसांमध्ये ती राज्यातील सर्व प्रमुख शहरं, तालुक्यांची ठिकाणं एवढंच कशाला अगदी कॉलेजेस असणाऱ्या मोठ्या गावांमधून जाणार आहे. मुंबईतील मुक्काम आटोपल्यानंतर मराठवाड्य़ातून नंतर विदर्भात जाणार आहे. दुष्काळग्रस्त भागात जाताना तरुणांना आम्ही दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी विशेष योगदान देण्याचं आवाहन करणार आहोत. याशिवाय ते काय करू शकतात, याची माहितीही देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही संदीप महाराज यांनी सांगितलं.

 

Image00002विवेकानंदांचं शिकागो परिषदेतील भाषण
११ सप्टेंबर, १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट इथं सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडं नर्व्हस असूनही त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावानं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला, जो दोन मिनिटं अखंड चालू होता."जिनं जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीनं, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचं स्वागत करतो," या शब्दात त्यांनी आपलं व्याख्यान पुढे चालू केलं. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचं प्रतिनिधित्व करताना, वेदांतावर आणि भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिलं. जगातील सर्व धर्मांचं सारतत्त्व एकच आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मनं जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचं प्राणतत्त्वच विशद केलं. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचं लक्ष वेधून घेतलं. या वृत्तपत्रांनी स्वामींचं वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असं केलं. 'न्यूयॉर्क क्रिटिक'नं त्यांच्याबद्दल लिहिलं आहे की, "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच, परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गारसुद्धा त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर, तसंच खाजगी व्याख्यानं दिली. अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.


Image00021विवेकानंदांच्या विचारांचं सार
स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केलं.

  • त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचं वचन त्यांनी शिरोधार्य मानलं.
  • प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणं हे आपलं ध्येय आहे.
  • कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे.
  • उठा, जागे व्हा, आणि आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.


'देश के प्यारे, जगत के दुलारे, मातृभूमी के सुपुत्र न्यारे, पधारे विवेकानंद हमारे, स्वामी चरण प्रणाम तुम्हारे' असं अभिमानास्पद सुमधुर गीत कानी पडलं तर समजा स्वामी विवेकानंद यांची रथयात्रा आली. विशेष म्हणजे, विवेकानंदांचं साहित्य खरेदी करण्यासाठी या रथाजवळ गर्दी करणारी तरुणाई पाहिली की, आजची पिढी वाचते याचीही खात्री पटते. विवेकानंदांचं साहित्य वाचण्यासारखं आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच ते खरेदी करण्यासाठी तरुणाच्या अक्षरक्षः उड्या पडतायत, एवढं नक्की!

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.