सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग
नववर्षाच्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प सोडला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील सर्व पालिका, ग्रामपंचायत, अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या मदतीनं त्यांनी मोहिमेची यशस्वी सुरुवात केली आहे. ही मोहीम दोन भागांमध्ये विभागण्यात आलीय. नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शहरं, तसंच गावांचं आरोग्य सांभाळायचं आहे. म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या आठ नगरपालिका आणि जवळपास ८४५ ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम संयुक्तरीत्या सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारीही गावोगावी भेट देऊन जातीनं कचरा साफ करणाऱ्या या मोहिमेत सहभागी होत आहेत. सर्व पालिकांना आणि ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून मजूरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी सुरू राहावी, यादृष्टीनं आता प्रयत्न सुरू झालेत.
स्वच्छतेमुळं पर्यटनाला चालना
गावांच्या आणि शहरांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायती आणि नगरपालिका काम करत आहेत, पण काही गावांना लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांची जबाबदारी काही कंपन्यांना, बँकांना आणि शैक्षणिक-धार्मिक संस्थांना देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुरूड, भाट्ये, कसोप, मांडवी, कुर्ली, गणपतीपुळे आदी समुद्रकिनारे या मोहिमेच्या माध्यमातून चकाचक करण्यात आलेत. इथं पर्यटनाला चालना मिळावी, त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागांतून येणाऱ्या पर्यटकांना सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता यावा, पर्यायानं इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचंही जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितलं.
एक्सेलसह जिंदाल, फिनोलेक्स कंपन्यांचा पुढाकार
१० किलोमीटरचा किनारा लाभलेल्या मुरूड-कर्दे या समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी एक्सेल या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. तर काही किनारे जिंदाल. फिनोलेक्स, भारती शिपयार्ड, दापोली अर्बन बँक, रत्नागिरी शिक्षण संस्था, गणपतीपुळे ट्रस्ट आदींना स्वच्छतेसाठी दत्तक देण्यात आलेत. त्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयानं संबंधित विभागांना पत्रही जारी केलं आहे.
समुद्रकिनारी दारूपाटर्यांना बंदी
पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील आल्हाददायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा, पण दारूपाटर्यां करू नयेत, असं बजावत त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात.
जिल्ह्यात आतापर्यंत याचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर ८ ते १० केसेसही दाखल करण्यात आल्यात. पर्यटकांनी बिअरबार, परमिट रूम, हॉटेल्स या अधिकृत ठिकाणीच दारू प्यावं, समुद्रकिनारी, नदीच्या कडेला, रस्त्यावर, पुलावर बसून दारू पिऊ नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे फलकही जागोजागी झळकू लागलेत.
सामूहिक शिस्तीचे धडे
सुमुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेबरोबरच कचऱ्याबाबत सामूहिक शिस्तीचे धडेही जिल्ह्यातील लोकांना दिले जातायत. कचरा घंटागाडीत आणि कचराकुंडीतच टाका. सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा फेकू नका, असं सांगितलं जातंय. एवढं करूनही कचरा टाकून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. एकूणच स्वच्छता मोहिमेचे परिणाम दिसू लागल्यानं नागरिकांमधून समाधानाची भावना आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या या मोहिमेला सर्वच लोकांनी भरुभरून प्रतिसाद दिला आहे. हा प्रयोग जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे आणि जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावरचा कचरा उचलत आहेत हे दृश्य येथील जनता प्रथमच पाहत आहे. साहजिकच उत्स्फूर्तपणं सामान्य नागरिक या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊ लागलेत. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांचं कौतुक करतानाच ही स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे, याची गरजही लोक बोलून दाखवतायत.
Comments
- No comments found