टॉप न्यूज

कोकणात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

मुश्ताक खान, रत्नागिरी
सर्व पातळीवर असणाऱ्या वाढत्या भीषण महागाईनं संपूर्ण जनजीवनच त्रस्त असताना सर्वसामान्य शेतकरीही यातून सुटणं अशक्यच. या शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर उत्पादित शेतमालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मुजोर दलालांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचे मेळावे राज्यभरात विविध पातळीवर भरवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल थेट मिळावा या हेतूनं असाच नुकताच एक मेळावा कोकण कृषी विद्यापीठानं रत्नागिरीच्या शिरगाव भरवला. या तीन दिवस झालेल्या भव्य कृषी महोत्सवात तब्बल ४५ टन धान्याच्या विक्रीतून साडेबारा लाखांची उलाढालही झाली.
 

Ratnagiri Krishi Mahotsav 11.png


कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग

नुकत्याच झालेल्या या कृषी महोत्सवाचं आयोजन इथल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. कोकणातल्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आपापल्या उत्पादनांचे स्टॉल इथं लावले होते. यंदाच्या या महोत्सवात कोकणातील जवळपास 12 हजार ग्राहकांनी आवर्जून हजेरी लावली. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होणाऱ्या या महोत्सवामुळं उत्पादक आणि खरेदीदार दोघंही खूश होते. इथं उपलब्ध झालेल्या स्वस्त आणि उत्तम प्रतीच्या धान्य खरेदीचा लाभ त्यामुळं ग्राहकांना घेता आला. तर ग्राहकांना थेट विक्री केल्यामुळं शेतकऱ्यांनाही त्यांच्या धान्याला चांगला दर मिळवता आला.

 

Ratnagiri Krishi Mahotsav 5.pngग्राहकांचा उद्दंड प्रतिसाद
रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला होता, इथं लावलेल्या १०० स्टॉलधारकांना आपल्या शेतात पिकवलेल्या विविध धान्यांची थेट विक्री करता आली. तर धान्यविक्रीसोबतच काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारं आणि औषधांचीही विक्री केली. यंदाच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे नागली, तांदूळ, गहू हे धान्य. एकीकडं इथं आलेल्या ग्राहकांनी या धान्याच्या खरेदीला विशेष पसंती देतानाच दुसरीकडं कडधान्यांमध्ये पावटा, कडवा वाल आणि कुळीथालाही चांगलीच पसंती मिळाली. कोकणातील संगमेश्वर, लांजा, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, दापोली आदी विभागांतील शेतकऱ्यांनीही आपापल्या शेतातील माल इथं आणला होता. महोत्सवाच्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी अक्षरशः ग्राहकांना माल संपल्यामुळं खरेदी करता न आल्यानं रिकाम्या हाती परतावं लागलं.

 

vlcsnap-2013-05-27-18h14m43s47.pngमाल संपल्यामुळं ग्राहकांमध्ये नाराजी
कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी दुपारीच सर्व माल संपल्यामुळं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. हा महोत्सव अजून काही दिवस चालायला हवा होता असं मतंही इथं खरेदीसाठी आलेल्या, परंतु खरेदी न करता रिकाम्या हाती परतावं लागल्यामुळं त्यांनी बोलून दाखवलं. इथंच न थांबता यंदा जरी या महोत्सवाचे दिवस कमी पडले, तरी पुढच्या वेळी मात्र हा महोत्सव जास्त दिवस भरवण्यात यावा, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. इथं येणाऱ्या ग्राहकांनी आधी मालाची चिकित्सा केली आणि मगच त्याची खरेदी केली. बाजारात होणारी फसवणूक, तसंच अधिकचे दर यामुळं त्रस्त झालेल्या ग्राहकांना उत्तम प्रतीचा माल योग्य किमतीत खरेदी करता आला. तर या ग्राहक मंडळींनी इथं आलेल्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबरही घेतलेत. जेणेकरून पुढील वर्षी धान्य घेण्यासाठी त्यांना या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधणं शक्य होईल.

 

Ratnagiri Krishi Mahotsav 27.pngकृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनत
शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त विकला जावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले होते. जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव या महोत्सवामध्ये थेट सहभागी होता आलं नाही. परंतु त्यांना अप्रत्यक्षरीत्या सहभागी करून घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालाचं पॅकिंग करून, तो माल विक्रीसाठी या महोत्सवात आणण्याची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली. या अधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांमुळ काही शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मालाची विक्री करून नफा मिळवता आला.

 

Ratnagiri Krishi Mahotsav 17.pngकृषी प्रदर्शना इतरही उत्पादनं
यंदा या कृषी महोत्सवात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कृषिमालाबरोबरच इतर उत्पादनंही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. यात खेकड्यांची पैदास, मासेमारीची उपकरणं आणि आंब्यांचे विविध प्रकार यांचा अंतर्भाव होता. त्याचबरोबर विविध फळांचे प्रकारही इथं भेट देणाऱ्यांना पाहायला मिळाले. याशिवाय इथल्या स्थानिक शिरगाव भात संशोधन केंद्राला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं त्यांनी विकसित केलेल्या भाताच्या विविध जातींचं भरवलेलं प्रदर्शनही इथं आलेल्या शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना पाहायला मिळालं. पुढील वेळी भरवल्या जाणाऱ्या या महोत्सवामध्ये केवळ कोकणात पिकणाऱ्या फळांचं आणि फळभाज्यांचं प्रदर्शन न ठेवता त्यांची विक्रीही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्राहकांनी केली.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.