"उसाच्या मुख्य पिकासाठी मी 265 या जातीची निवड केली, तर आंतरपिकासाठी मार्च-एप्रिल-मे दरम्यान वादळी पाऊस येतो या दृष्टीनं ईस्टवेस्ट या फ्लॉवरच्या वाणाची लागवडीसाठी निवड केली. या फ्लॉवरच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कांदा वरून सपाट नसून अर्धदंडगोलाकार असतो. त्यामुळं जरी पाऊस पडला तरी यात पावसाचं पाणी शिरत नाही आणि साठत नाही. शिवाय वरून गोल आकार असल्यामुळं आणि याच्या दिखाऊपणामुळं याला बाजारात मागणीही अधिक आहे. शिवाय याच्या गड्डयाच्या लहान आकारामुळं याला दुसऱ्या जातीपेक्षा 10 ते 20 टक्के जास्त दर मिळतो. म्हणून मी या फ्लॉवरची आंतरपीक म्हणून निवड केली,” असं राजेंद्र देशमुख यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.
सव्वापाच फूट पट्टा पध्दत
देशमुख यांनी ट्रॅक्टरचा वापर करीत नांगरट, रोटर आदी शेती मशागतीची कामं केली. विशेष म्हणजे सव्वापाच फुटांच्या पट्टा पध्दतीनं उसाची लागण केलीय. शेणखताची कमतरता असल्यामुळं त्यात हिरवळीचं खत असावं आणि हे हिरवळीचं खत मिळण्यासाठी म्हणून त्यांनी कोबी, फ्लावर किंवा ढेलच्या हे आंतरपीक म्हणून घेण्याचं निश्चित केलं. आर्थिकदृष्ट्या चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टीनं याचा नीट अभ्यास केला आणि उन्हाळ्यात चांगलं मार्केट असलेल्या फ्लॉवरचं आंतरपीक घेण्याचं निश्चित केलं. मूळ पीक म्हणून 265 वाणाचा ऊस, तर वाफा पध्दतीनं ईस्टवेस्ट फ्लावरचं वाण वापरलं.
पंधरा टन फ्लॉवरचं उत्पादन
तीस गुंठे शेतात अठरा हजार फ्लॉवरची रोपं लावली. आता या प्रत्येक रोपास एक किलो फ्लॉवर येतोय. सुमारे दहा ते पंधरा टन फ्लॉवरचं उत्पादन अपेक्षित आहे. आताच्या होलसेल मार्केटमध्ये 10 किलोला 125 ते 150 रु. या मिळणाऱ्या दराप्रमाणं औषधं, रोपं आदींचा सुमारे 25 हजार रुपये खर्च वगळता दीड लाख रुपयांच्या दरम्यान फायदा होतोय.
त्याचवेळी प्रमुख पीक असलेल्या उसातून सव्वालाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. गुंठ्यास सव्वा टन ते दीड टन ऊस मिळतो. यावेळी उसाला 2700 रुपये दर अपेक्षित आहे. मात्र ऊस पिकाचा होणारा तीस हजार रुपये खर्च भागवण्यासाठी घेतलेल्या फ्लॉवर पिकातून यावेळी उसापेक्षा जास्त फायदा मिळवण्याची किमया राजेंद्र देशमुख यांनी केलीय.
“30 गुंठ्यांच्या क्षेत्रात मागच्या वर्षी मला प्रत्येकी दीड टनाप्रमाणं उत्पन्न मिळालं. आता आंतरपीक म्हणून जे फ्लावरचं उत्पन्न घेतलंय, त्यामुळं उसाचं वर्षाच्या उत्पन्नानुसार मला खर्चवजा जाता फ्लॉवरचं उत्पन्न हे केवळ नफ्यात होणार आहे. त्याबरोबर योग्य फवारणी, खताचं व्यवस्थित नियोजन असल्यामुळं उसाचं उत्पन्नही मागच्या वर्षीच्या अपेक्षेपेक्षा जास्त होणार आहे,” असं देशमुख 'भारत4इंडिया'शी बोलताना म्हणाले.
पाण्याची गरज
ऊस पिकासाठी दहा-पंधरा दिवसांतून पाणी द्यावं लागतं. तर उन्हाळा असल्यानं फ्लॉवरला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळं फ्लॉवर पिकासही आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावं लागतं. स्वतःची खाजगी पाण्याची सोय नसल्यामुळं सार्वजनिक पाणीपुरवठ्याद्वारे उपलब्ध पाण्याचा वापर करीत पाटपाण्यानं ऊस आणि आंतरपिकाला समतोल पाणी मिळावं यासाठी दर 10 ते 12 दिवसांनी पाणी दिलं.
कमी नत्रखतं
उसाचं पीक घेताना पाच ट्रॉली शेणखत शेतात वापरलं. नंतर मात्र खतं देताना काळजी घेतलीय. फ्लॉवरला कमी नत्र असलेली खतं द्यावी लागतात. यासाठी 102626 हे नत्र, मायक्रोन्यूट्रीय, निबोनी आदी खतं देशमुख यांनी वापरलीत. फ्लॉवरला अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो. कोरालीन हे औषध अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी वापरलंय, तर बुरशीनाशकं, कॅल्शियम बोराट टॅनिक या औषधांचा आलटूनपालटून वापर केला. फ्लावरचे गड्डे घट्ट किवा मजबूत व्हावेत, वजनदार व्हावेत यासाठी 130450050 या खताचा वापर देशमुख यांनी केलाय.
विक्रीसाठी लोकल बाजारपेठ
परिणामी या वाणाचे फ्लावर उठावदार दिसत असल्यामुळं बाजारपेठेत मागणी मोठी असते. चिपळूण. कराड, पाटण या जवळच्या बाजारपेठेत राजेद्र देशमुख हा फ्लॉवर विकतात. "मी रोज माल काढत असल्यामुळं चिपळूण, पाटण आणि कराड या लोकल बाजारपेठेत तिन्ही ठिकाणचे बाजार बघून आठवड्यातून पाच ते सहा वार मी या बाजारात माल पाठवतो,” असं राजेंद्र देशमुख यांनी सांगितलं.
Comments
- No comments found