टॉप न्यूज

पालखी सोहळा गहिवरला बंधूभेटीनं!

ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
पांडुरंगाचं नावं घेत अखंड दोन आठवडे चालणारे लाखो वारकरी पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आल्यानं आनंदी झाले आहेत. 'तुका म्हणे धावा । पुढे पंढरी विसावा', असं म्हणत कालचा धावा झाला तरी आजही वारीतील पावलं धावतचं होती. पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला हा वैष्णवांचा थवा आज टप्पा इथं झालेल्या संत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांच्या बंधुभेटीनं आणखीनच गहिवरुन गेला. आता, उद्या वाखरीत तुकोबारायांसह सर्वच पालख्या एकत्र येणार आहेत. त्यामुळं आपल्या सग्यासोयर्यांची गळाभेट घेता येणार, या कल्पनेनं विविध पालख्यांसमवेत अवघ्या मराठी मुलखातून चारी दिशांनी पंढरपूरकडं येत असलेल्या वारकर्यांच्या मेळ्याला जो आनंद झालाय, तो शब्दात सांगता येणार नाही. टिपेला पोहोचलेल्या टाळमृदंगाच्या आवाजात इथल्या अवघ्या आसमंतात एकच गोष्ट कानी पडतेय, ती म्हणजे विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल!!!

images vari1रिंगण आणि नंदाचा ओढ्यातील स्नान
माऊलींची पालखी वेळापूरहून रामप्रहरी भंडीशेगावकडं मार्गस्थ झाली. कालचा धावा वारकर्यांना हत्तीचं बळं देऊन गेल्याचं दिसत होतं. पांडुरंगाचं नाव घेत आणि 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम' असा जयघोष करीत वारकरी झपाझप पावलं टाकत होते. प्रत्येक पावलागणिक विठुरायाचे दर्शन घडण्याचा काळ क्षणाक्षणानं कमी होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आनंदातच पोटपूजा कधी झाली अन् ठाकूरबाची समाधी इथं मेळा कधी आला, ते कळलंही नाही. इथं परंपरेप्रमाणं माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण होतं. चोपदार आणि प्रमुख मंडळींनी तासाभरात रिंगण लावलं. चोपदारांनी इशारा केला आणि माऊलींचा अश्व वायुवेगानं धावला. अवघ्या वैष्णवांच्या मेळ्याला आनंदाचं भरतं आलं. मग माऊली...माऊली असा जयघोष करीत कुणी फेर धरला, कुणी झीम्मा घातला, कुणी फुगडी घातली. त्यानंतर वैष्णवांचा मेळा धावला तोंडले-बोंडले या गावाच्या दिशेनं. दरम्यान 'नंदाचा ओढा' इथं पालखीनं विसावा घेतला. या ओढ्यात वारकर्यांनी स्नान केलं. पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेत स्नान करण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व वारीत या नंदाचा ओढातील स्नानाला आहे. या स्थानाचा महीमा असा सांगितला जातो, की ज्ञानेश्र्वर माऊली स्वतः या ओढ्याच्या पाण्यानं आपल्या भावंडांस आंघोळ घालीत असत. साहजिकचं स्नानासाठी ह्ही गर्दी झाली होती. खळाळून वाहणाऱ्या या ओढ्यातील या आंघोळीनं ताजंतवानं झाल्यानंतर प्रथेप्रमाणं पालखी तोंडले गावापर्यंत खांद्यावरून आणण्यात आली. तोंडले-बोंडले मुक्कामात दहीभाताचा काला झाला.
काल्याचा नैवेद्य घेऊन पालखी भंडीशेगावकडं मार्गस्थ झाली.

ज्ञानेश्वर माऊली - सोपानकाकांची हृद भेट
तोंडले-बोंडलेतील दहीभाताच्या काल्याचा नैवेद्य घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर वारकर्यांना वेध लागले बंधुभेटीचे. त्यामुळं तोंडल्यावरुन सुटलेला हा मेळा थेट थांबला तो पिराची कुरोलीत. हा प्रवास देहभान हरपरणारा असाच होता. चालताना दूर अवकाशात फडकणार्या भगव्या पताका दिसू लागल्या. दूरवरुन कानी टाळचिपळ्यांची किनकिन ऐकू येऊ लागली. जसजशी पावलं पडत होती तसतशी सोपानकाकांच्या पालखीची चाहूल जवळ-जवळ येत होती. मग 'ज्ञानेश्वर माऊली, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम'चा जयघोष करीत वारकरी सोपानकाकांचा धावा करीतच धावले. ...आणि पिराची कुरोली कधी आलं ते वारकर्यांना कळलंसुद्धा नाही. सासवडहून निघालेली सोपानकाकांची पालखी माऊलींना इथंच भेटते. परंपरेप्रमाणं दोन्ही पालखीतील प्रमुख, चोपदार, मानकरी यांनी दोन्ही पालख्यांचे रथ एकत्र आणले. त्यावेळी 'माऊली...माऊली' आणि 'विठ्ठल...विठ्ठल' असा एकच जयघोष झाला. दोन्ही पालखीतून आलेल्या मंडळींनी गळाभेट घेतली. त्यानंतर दोन्ही पालख्या एक झाल्या. बंधुभेटीचा हा हृद सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोकं उपस्थित होती. त्यानंतर सोपानकाकांच बोट धरून माऊलींच्या पालखीनं पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. भंडीशेगावला मुक्कामी आल्यानंतर सर्वांनाच वेध लागले होते ते उद्या वाखरीत होणार्या इतर सर्व पालख्यांच्या भेटीचे. तुकोबांची पालखी पिराची कुरोली इथं मुक्कामी आली आहे.

images vari3आता उरले दोनच दिवस
माऊलींच्या पालखीचं उद्या (१७ जुलै) वाखरीजवळ दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण, तर १८ जुलैला विसवावीजवळ तिसरं उभं रिंगण होणार आहे. तर तुकोबांच्या पालखीचं उद्या (१७ जुलै) बाजीराव विहीर इथं दुसरं उभं रिंगण तर वाखरी इथं तिसरं उभं रिंगण होणार आहे. वारी जवळ येऊ लागल्यानं पंढरीतील गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारक-यांची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळातर्फे सुमारे ६०० जादा गाडया सोडण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातून २००, मुंबई विभागातून ५०, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणांहून सुमारे ३०० जादा गाडया सोडण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात प्रशासन सज्ज
पालखी सोहळ्याचा सोमवारीच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झालाय. जिल्ह्यात वारक:यांना पाण्याची कसलीही अडचण भासणार नाही. नीरा आणि उजनी कालव्यांना पाणी सोडले असून चंद्रभागेतही पाणी सोडले आहे. जेणेकरून वारक:यांना मनसोक्तपणे चंद्रभागेत स्नान करता येईल. याशिवाय 75 टॅँकर आहेत. विविध मार्गावरची ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात आलीत. images vari2 पालखी तळावर पाऊस आल्यास चिखल होऊ नये म्हणून वाळू किंवा कचखडी टाकून तळ चांगले केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. याशिवाय पालखीच्या बंदोबस्तासाठी 350 पोलीस, 100 राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, एक बॉम्ब स्कॉड, तीन घातपात विरोधी पथके, 20 कमांडोंचे पथक तैनात आहे. 
दरम्यान, पंढरपुरात प्रवेश करतेवेळी वारक:यांच्या वाहनांना अडवणूक केली जात असल्याच्या कारणावरून वारक:यांनी आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर दिंडीचा अधिकृत पास असणा:या वाहनांना पंढरपुरात विनासायास प्रवेश दिला जाईल; मात्र अनधिकृत वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांनी सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.