दर्शनरांग वाढते आहे...
आषाढी वारीसाठी माऊलीं आणि तुकोबांसह राज्यभरातून आलेल्या सुमारे ३०० पालख्या काल दाखल झाल्यानंतर पंढरपूरला अक्षरक्ष: भक्तांचा महापूर आला. पहाटे चार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशीला यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ नियमितपणे वारी करणारे जालना जिल्ह्यातील जाफराबादचे नामदेव वैद्य आणि गंगूबाई वैद्य हे दांपत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. महापूजेनंतर आषाढीची सुरू झालेली दर्शनरांग वाढतेच आहे. गोपाळपूरच्याही पुढे गेलेल्या दर्शनरांगेत सुमारे दहा ते बारा तासानंतर भक्तांना दर्शन मिळते आहे. याशिवाय मुखदर्शनाचीही मोठी रांग असून तिथं मात्र दीड ते दोन तासांत मुखदर्शन मिळतं आहे. याशिवाय यंदा ऑनलाईन दर्शनाचीही मोठी नोंदणी झाली असून ३० हजाराहून अधिक भाविक त्याचा लाभ घेतील, असा दावा मंदिर प्रशासनं केलाय.
संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे...
बा विठ्ठला ! राज्य प्रगतीपथावर जाऊ दे. राज्यातील जनतेला सुख, शांती, समाधानाचे दिवस येऊ दे. त्याचबरोबर राज्यावर येणा-या संकटाचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दे! अशी प्रार्थना विठ्ठल चरणी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
महापूजेनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले, की गतवर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट होते. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाची स्थिती चांगली आहे.राज्यातील जलाशय भरतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर पंढरपूर विकास आराखड्यातील कामे वेगाने सुरु असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या वारीसाठी येणा-या भविकाला जास्तीत-जास्त सुविधा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे पालकमंत्री श्री.सोपल यांनी सांगितले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने अध्यक्ष आण्णा डांगे यांनी मुख्यमंत्र्याचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार केला.
मजुरी करणाऱ्या दाम्पत्याला महापूजेचा मान
यंदा जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नामदेवराव देऊबा वैद्य (वय-70) व सौ.गंगूबाई नामदेवराव वैद्य (वय -65) यांना मुख्यमंत्री चव्हाण यांच्या समवेत शासकीय महापूजेचा मान मिळाला. श्री वैद्य यांचा व्यवसाय शेती व मजूरीचा आहे.त्यांना 2 मुले व 2 मुली तसेच सुना व नातवंडे असून गेल्या 25 वर्षापासून ते वारीस येत आहेत. यापुर्वी त्यांच्या घरात कोणाचीही वारीची परंपरा नव्हती.मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा सत्कार करुन, एस.टी तर्फे देण्यात येणारा मोफत प्रवास सवलतीचा वार्षिक पास त्यांना प्रदान केला. तसेच मनोज भेंडे यांच्यातर्फे 15 हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील कृष्णा कडू यांच्यातर्फे 11 हजार रुपयांचा धनादेश या मानाच्या वारक-यांना प्रदान करण्यात आला.
चंद्रभागेमध्ये स्नान आणिक दर्शन विठोबाचे...
पालखी तीव्र दुष्काळाचा मुकाबला केल्यानंतर पावसानं चांगलीच कृपादृष्टी दाखवलीय. त्यामुळं यंदा पीकपाणी चांगलं येईल, याची खुषी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहेच. याशिवाय उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागा दुथडी भरुन वाहत असून वारकऱ्यांना मनोभावे चंद्रभागेत स्नान करता येतंय. त्यामुळंच मंदिर परिसरापेक्षाही वारकऱ्यांची सर्वात जास्त गर्दी चंद्रभागेच्या वाळंवंटी पहायला मिळतेय. स्नान उरकून कोणी दर्शनबारीत शिरतोय तर कोणी तिथूनच कळसदर्शन घेऊन विठ्ठलाचं मनोमन दर्शन घेत असल्याचं चित्र पहायला मिळतंय.
सोलापूर जिल्ह्यात प्रशासन सज्ज
पालखी सोहळ्याचा सोमवारीच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झालाय. जिल्ह्यात वारक:यांना पाण्याची कसलीही अडचण भासणार नाही. नीरा आणि उजनी कालव्यांना पाणी सोडले असून चंद्रभागेतही पाणी सोडले आहे. जेणेकरून वारक:यांना मनसोक्तपणे चंद्रभागेत स्नान करता येईल. याशिवाय 75 टॅँकर आहेत. विविध मार्गावरची ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्यात आलीत. पालखी तळावर पाऊस आल्यास चिखल होऊ नये म्हणून वाळू किंवा कचखडी टाकून तळ चांगले केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. याशिवाय पालखीच्या बंदोबस्तासाठी 350 पोलीस, 100 राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, एक बॉम्ब स्कॉड, तीन घातपात विरोधी पथके, 20 कमांडोंचे पथक तैनात आहे.
Comments
- No comments found