टॉप न्यूज

कांद्याचं तेवढं बोला राव...!

ब्युरो रिपोर्ट
मुंबई/नाशिक – महागाईत सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढलेत. मात्र, कांद्यानं उचल खायला सुरवात केली, की शहरीवर्गाच्या डोळ्यात पाणी यायला सुरवात झालीय. प्रति किलो दहा रुपयांवरुन कांदा आता ५० ते ६० रुपयांवर पोहोचलाय. नवीन आवक सुरू होत नाही तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे, सर्वसामान्य ग्राहक किलोभर कांद्याला ५० रुपयांवर रोकडा मोजत असला तरी शेतकऱ्यांना २५ ते ३० रुपयेच मिळतायत. सध्याचा श्रावण हा व्रतकैवल्याचा महिना असल्यानं कांदा खाण्याचं प्रमाणं खूपच कमी होतं. तरी ही परिस्थिती आहे.


onions1दुष्काळाचा फटका
भीषण दुष्काळामुळं राज्यात कांद्याचं उत्पादन कमी झालंय. परिणामी सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी होवू लागलीय. चाळींमधील कांद्याचा साठा संपू लागलाय. यामुळं मागील एक महिन्यांपासून बाजारभाव वाढू लागलेत. त्यातच काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाला दोन पैसे मिळू द्या वो...अशी भूमिकाही बरेचजण घेतायत. त्यातूनच मल्टीप्लेक्समध्ये एका चित्रपटासाठी शंभराची नोट मोडणाऱ्यांनी उगीच खळखळ करु नये, असं आवाहनही केलं जातंय. सर्वच खाद्यपर्दार्थांचे भाव वाढत असताना कांद्याचं तेवढं बोला राव...अशी परिस्थिती की निर्माण केली जातेय, असा प्रश्नही काहीजण विचारतायंत.  

निर्यात थांबविणार नाही - पवार

कांद्याची निर्यात थांबविणार नाही. भाव पडतात तेव्हा शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी येते. दुष्काळात टँकरने पाणी आणून शेती जगवली. त्यामुळे आता बाजारात कांदा आहे. भाव वाढल्याने शेतकर्‍यांना थोडा फायदा होऊ द्या. त्यामुळे त्यांच्यावरील खर्चाचे ओझे कमी होईल, असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.

मागणीच्या तुलनेत निम्मीच आवक
एप्रिल ते जूनदरम्यान सरासरी दीड हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. त्याचवेळी दुसरीकडे टिकाऊ व चवीला तिखट असे वैशिष्ट्य असलेल्या गावठी कांद्याची सध्या सर्वत्र चणचण भासत आहे. हॉटेल व घरच्या जेवणातूनही कांदा गायब होत आहे. एकूणच देशभरात आवकेच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात मागणी आहे. देशभरात रोज ७० हजार टन कांदा सध्या विक्रीसाठी येत आहे. या फरकामुळंच कांद्याचे दर प्रतिक्विंटल चार हजारांवर गेल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कांद्याचं आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणीही यंदा कांद्याचं पीक सरासरीपेक्षा पन्नास टक्के कमी झालंय. त्याचा थेट परिणाम गेले दोन महिने बाजारात दिसतोय. वाढती मागणी आणि त्याच्या निम्म्याहून कमी झालेली आवक यामुळं कांद्याच्या दराचा आलेख हा चढताच आहे. महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, गुजरातमध्येही गावठी कांदा संपल्यातच जमा आहे. नवा लाल कांदा यायला अजुन जवळपास दीड-दोन महिने वेळ आहे. त्यामुळं आवक कमीच आहे. त्यातच शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सलग सुट्टी आल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव, नांदगाव, येवला या बाजारसमित्या बंद आहेत. त्यामुळंही कांद्याच्या आवकीवर परिणाम झालाय. सोमवारपासुन सर्व बाजारसमित्यांचं काम सुरु होईल, पण जोपर्यंत नविन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

 

वाशी मार्केटला दर ५० रुपयांवरonion3
वाशी एपीएमसीमधील होलसेल मार्केटमध्ये शनिवारी कांद्यानं प्रति किलो ४५ रुपयांचा दर गाठल्यानं किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ५५ रुपये प्रति किलो झालाय. वाशी एपीएमसीमध्ये शनिवारी फक्त 75 गाड्या कांद्याची आवक झाली.

पुण्यात भाव ४० रुपयांवर
पुण्यातही कांद्याची आवक कमी झाल्यानं शुक्रवारी मार्केट यार्डात कांद्याला तीन वर्षांतील उच्चांकी म्हणजेच दहा किलोसाठी ४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तीन वर्षांपूर्वी प्रति दहा किलो ७०० रुपये भाव मिळाला होता. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्केट यार्डात गेल्या आठवडाभर नियमितपणे ७० ते ८० ट्रक कांद्याची आवक होत होती. काल केवळ ३० ट्रक झाल्याने कांद्याला उच्चांकी भाव मिळाला.
...........................onion 5

चार दिवसांत गावठी कांद्याची झालेली आवक व बाजारभाव
दिनांक कांद्याची आवक दर
(क्विंटलमध्ये) (क्विंटलचे)
सोमवार (ता. 5) : 18 हजार 647 किमान 2100, कमाल 3249, सरासरी 2550
बुधवार (ता. 7) : ऑगस्ट 9 हजार929 किमान 2401, कमाल 3174, सरासरी 2951 रुपये
गुरुवार (ता. 8) : 7 हजार 768 किमान 2500, कमाल 3698, सरासरी 3351 रुपये
शुक्रवार (ता. 9) : 5 हजार क्विंटल किमान 3451, कमाल 4000, सरासरी 3751 रुपये

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.