असा आहे कानबाई उत्सव...
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा होतो. याला फार जुनी परंपरा आहे. कुणी म्हणतं की पूर्वी खानाचं राज्य होतं. त्याला ’तुझ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगून हिंदू हा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं की हा खानदेश म्हणजे कान्हादेश! खानदेशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणून त्यांनी देवीचा उत्सव सुरू करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं.. हा उत्सव प्रामुख्यानं सोनार, शिंपी, चौधरी, माळी हा समाज मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या उत्सवासाठी लोकं घराला रंगरंगोटी करतात. घरातील भांडी, अंथरून-पाघरून, पडदे, चादरी, अभ्रे सगळं धुवून घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असं धान्य म्हणजे गहू, चण्याची डाळ घेतली जाते. तेही चक्कीवाल्याला आधी सांगून ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन धान्य दळून आणलं जातं. विशेष म्हणजे, या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर असतो. पुरण-पोळी, खीर, कटाची आमटी हे सर्व पदार्थ चण्याच्या डाळीपासून करतात आणि वर गंगाफळ / लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावून डेकोरेशन केलं जातं. कानबाईचे नारळ मुख्यतः पूर्वापार चालत आलेले असतात किंवा परनून आणलेले असतात.
कानबाई परनून आणणे...
पूर्वीच्या काळी गावचे पाटील एखाद्या खेड्यात ठरवून आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेले, भाजलेले नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरकडचे लोक त्यांना घेऊन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्त्रियांना नाना वस्त्रालंकारांनी सजवून त्यांची पूजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनानं पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वयंपाक ...नदीवरून पाणी आणण्यापासून पुरुषमंडळी करायची. तिथं त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेऊन तोच वर्षानुवर्षे पूजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचं मंदिर बांधलंय. ज्यांना नवीनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेऊन तिथल्या मूर्तीला स्पर्श करून आणतात.
असा असतो पूजेचा थाट...
तर असं हे परनून आणलेले नारळ त्या दिवशी धुवून घेतात त्यालाच नथ, डोळे, वगैरे बसवून इतरही पारंपरिक दागिने घालतात. केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेऊन त्याची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसूत्र इत्यादी चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणं, तवा हे सगळे कणकेचंच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पिठात साजूक तूप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेऊन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथंही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केलं जातं. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडं फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडं हातापायाची कानबाई असते तर काहींकडं कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
विसर्जन...
दुसऱ्या सकाळी लवकर उठून कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करून अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल-ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर घेऊन बायका नदीवर निघतात. कानबाईला नि त्या स्त्रीला नमस्कार करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. कानबाईपुढं मुलं, मुली फुगड्या खेळतात. वाजत-गाजत जातांना समोरून दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडून भेट घडवली जाते. नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचं विसर्जन होतं. नदीतलीच वाळू घेऊन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसंच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. त्यानंतर पुरणाचे दिवे मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दूध, तुप घातलेल्या ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नी पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीलासुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.
नवसपूर्तीसाठी रोटांचा नैवेद्य ...
कानुबाई नवसाला पावल्यास गव्हाचे ‘रोट’, त्यासोबत तांदळाच्या गोड खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अर्थातच देवीच्या नावानं नवस मानलेला असताना रोटांसाठी दळलेलं जाडभरडं पीठ संपत नाही तोपर्यंत घरोघरी दोन-तीन दिवस दुसरा स्वयंपाक करत नाहीत. सोबत ‘आलन-कालन’ ही विविध पालेभाज्यांचे मिश्रण केलेली भाजी बनवली जाते. सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. त्यासाठी घरातील स्त्री भल्या पहाटे, सूर्य उगवण्याआधी रोट रांधते. दरवाज्यात गायीच्या शेणाने गोलाकार सारवून, त्यावर पिठाची व कुंकवाची रांगोळी काढून दुरडी ठेवली जाते. रोटांच्यावर पुरणाचे दिवे पेटवून पूजा केली जाते. रोट संध्याकाळच्या आत संपवायचे असतात. रोट कुणीही खाऊ शकतो, पण संध्याकाळचे रोट फक्त कुटुंबातील सदस्य किंवा भाऊबंदकीतली माणसं खाऊ शकतात. सकाळचे रोट कानुबाईचे तर संध्याकाळचे रोट तानबाईचे मानले जातात. घरातल्या पुरुष मंडळींच्या संख्येनुसार रोटाचे गहू वेगळे काढले जातात. कुटुंबातून विभक्त झाल्यास त्यानुसार रोटांची वाटणी निम्मी होते. एखाद्या मुलाला मुलगा झालाच नाही तर रोट बंद पडतात. त्याचप्रमाणे बंद पडलेले रोट सुरू होण्यासाठी रोटांच्या दिवशी घरात मूल अथवा गायीला गोर्हा होईस्तोवर वाट पाहावी लागते. कानुबाईच्या विसर्जनानंतर उरलेले रोट हरबर्याच्या डाळीचे पदार्थ, दही, दूध, खीर आदींसोबत पौर्णिमेच्या आत संपवावे, असा संकेत आहे.
कृषी संस्कृतीशी नातं सांगणारा उत्सव...
कानुबाई ही प्रकृती आहे तर सूर्य हा पृथ्वी, चंद्र आदींचे मूळ आहे, म्हणून कानुबाईचे लग्न सूर्याशी लावले गेल्याची आख्यायिका आहे. खानदेशच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही कानबाईचा उत्सव होत नाही. कृषी संकृतीशी नातं अधोरेखित करणारा हा उत्सव आहे; यानिमित्ताने सर्वांना एकत्र आणून भाऊबंदीतून निर्माण होणारे हेवेदावे आणि वैरभाव विसरायला लावणारा आणि अनेक आक्रमणांनंतरही टिकून राहिलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. कानबाई हा खानदेशचे मूळ रहिवासी असलेल्या आहिरांचा मुख्य उत्सव आहे. त्यामुळं कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
त्यातील काही गाणी अशी....
''कानबाई माय, तुन्हा करसू वं 'रोट'
खपी चालनी हयाती, पिकू देवं, मन्हं पोट''
तसंच
''डोंगरले पडी गई वाट, वाट मन्ही कानबाईले|
कसाना लउ मी थाट थाट मन्ही कानबाईले''
'कानबाई न्हावाले बसली ओ माय, पीव्वा पीतांबर नेसणी ओ माय,
अंगी कंचोळी घाली ओ माय, भांग गुलाल ना भरा ओ माय,
कपाय कुंकना भरा ओ माय, डोया मा काजय झिरमिरी ओ माय''
''कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट
हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट''
...तर अशा या कानबाईच्या उत्सवानं खानदेश हे दणाणून गेलता भाऊsss!
Comments
- No comments found