टॉप न्यूज

...अखेर जादूटोणाविरोधी कायदा येणार

ब्युरो रिपोर्ट, मुंबई/पुणे
जादूटोणाविरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्यावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर एकमत झालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर समाजाच्या सर्व स्तरातून उमटणाऱ्या भावना लक्षात घेऊन सरकारनं गेली १४ वर्षं प्रलंबीत असणारं हे विधेयक मंजूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुरोगामी संघटनांनी स्वागत केलं असून ...आता मारेकऱ्यांचा शोध घेऊन या भ्याड हत्येमागील शक्तींना समाजासमोर आणा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांना काही धागेदोरे मिळाले असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

 

dabholkar rally 6

 आणि सरकारला जाग आली...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं उभा महाराष्ट्र सुन्न झालाय. या भ्याड कृत्याचा राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीव्र निषेध होत असतानाच राज्य सरकारनं प्रलंबित जादूटोणा विधेयक तातडीनं मंजूर करावं, तीच खरी दाभोलकरांना श्रद्धांजली ठरील, अशी भावना समाजातील अनेक मान्यवरांनी बोलून दाखवली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या काल (बुधवार) झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी जादूटोणाविरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याची मागणी मंत्रिमंडळाकडं केली. त्याला मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. हा वटहुकूम काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याशी चर्चा करणार आहेत. वटहुकूम आल्यानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून किंवा हिवाळी अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करून घेऊन त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

 

कायद्यासाठी दिला लढा... 

Naredra Dabholkar bharat4india

 पुरोगामी विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची (दि. २१) पुण्यात अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. दाभोलकर मॉर्नींग वॉकहून परतत असताना सकाळी साडेसातच्या सुमारास बालगंधर्व पुलाजवळ मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा तरुण हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. डॉ. दाभोलकर गेली १४ वर्ष जादुटोणा विरोधी विधेयक मंजूर करावं म्हणून लढा देत होते. कायदा झाला तर ढोंगी बुवा-बाबांवर वचक बसेल, अशी त्यांना खात्री होती. त्यामुळ अनेक सनातनी प्रवृत्तीच्या व्यक्ती, संघटना यांचा रोष पत्करुन राज्यभरातील अंनिसच्या कार्यकर्त्यांना घेऊन ते लढत होते. अलिकडच्या काळात अनेक संघटनांनी त्याला धमक्याही दिल्या होत्या. त्यामुळं यातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय वर्तविला जात आहे. दरम्यान, महात्मा गांधींची हत्या ज्यांनी केली त्याच शक्ती दाभोलकरांच्या हत्येमागं असल्याचं सूचक व्यक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटंलय.  

 

Narendra dabholkar2 copy

असा झाला विधेयकाचा प्रवास

- अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अशासकीय विधेयक ७ जुलै १९९५ मध्ये विधानसभेत मांडण्यात आलं.
- १३ एप्रिल २00५ रोजी शासकीय विधेयक आलं. मात्र विरोधामुळं स्थगित.
- १६ डिसेंबर २00५ रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत पारित होऊ शकलं नाही.
- नंतर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडं गेलं, पुढे विधेयक व्यपगत झालं.
- २0११ मध्ये नव्यानं विधेयक मांडलं गेलं पण त्यावर चर्चाही झाली नाही. विरोधाचे सूर कायम राहिले.
- चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात ते सुधारणांसह मांडण्याची तयारी सरकारनं केली. हे विधेयक या अधिवेशनात आणले जाईल, असा मनोदय सरकारच्या वतीनं व्यक्त करण्यात आला.
- तथापि, विधेयक अधिवेशनात आलंच नाही. वारकर्‍यांशी चर्चा करूनच विधेयक आणलं जाईल, असं स्पष्ट करीत सरकारनं माघार घेतली
- अखेर डॉ. दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर उमटलेल्या शोकसंतप्त प्रतिक्रीया लक्षात घेऊन काल (दि. 21) मंत्रिमंडळानं वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला.

 

असं आहे विधेयक.....
या विधेयकात नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीतजास्त ७ वर्षे कारावास आणि ५0 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. विधेयकातील कलमं अशी आहेत....

१) भूत उतरविण्याच्या बहाण्यानं एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणं, त्याचा विविध प्रकारे छळ करणं, चटके देणं, मूत्रविष्ठा खायला लावणं अशी कृत्ये गुन्हा ठरतील.(भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.
२) एखाद्या व्यक्तीनं चमत्काराचा प्रयोग करून फसविणं, ठकवणं, आर्थिक प्राप्ती करणं गुन्हा ठरेल.
३) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात,
अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करणं हा गुन्हा.
४) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावानं अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणं किंवा नरबळी देणं.
५) अतींद्रिय शक्ती असल्याचं भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणं व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणं, फसविणं, ठकविणं हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणं हा गुन्हा नाही.
६) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असं जाहीर करणं.
७) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणं, नग्नावस्थेत धिंड काढणं, रोजच्या व्यवहारांवर
बंदी घालणं.
८) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणं, मृत्यूची भीती घालणं, भुताच्या कोपामुळं शारीरिक इजा झाली, असं सांगणं.
९) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून
रोखणं किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणं.
१0) बोटानं शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणं. गर्भवती महिलांच्या गर्भाचं लिंग बदलण्याचा दावा करणं.
११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचं सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असं सांगून लैंगिक संबंध ठेवणं. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्‍वासन देत लैंगिक संबंध ठेवणं.
१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचं भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणं.

 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं कार्य

बाबा आढाव यांच्या "एक गाव- एक विहीर" या चळवळीत दाभोलकरांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर श्याम मानव यांच्या १९८३ मध्ये स्थापन झालेल्या "अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती"मध्ये त्यांनी कार्य सुरू केलं. १९८९ मध्ये त्यापासून वेगळं होऊन त्यांनी "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या "साधना" या साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून संपादक होते.

 

dabholkar rally 4साहित्य

 • अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन
 • अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन
 • ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन
 • झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
 • ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन
 • तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन
 • प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) - राजहंस प्रकाशन
 • भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन
 • विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन
 • विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन
 • श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन 

Comments

 • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.