तरुणाईचा उत्सव
गणेशोत्सव मंडळं दहीहंडी उत्सवात सक्रीय झाल्यानं अलिकडच्या काळात गणेशोत्सवाएवढाच दहीहंडी उत्सव राज्यभरात दणक्यात साजरा होतोय. शहरातील अनेक मोठमोठी मंडळं लाखमोलाच्या दहीहंडी लावतात. तर त्या फोडण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या मंडळांनी गोविंदा पथकं सक्रिय केलीत. पाच, सहा आणि सात थराच्या दहीहंडय़ा फोडून फारसं बक्षीस पदरात पडत नसल्यामुळं आता बहुसंख्य गोविंदा पथकं आठ-नऊ थराच्या दहीहंडय़ांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करू लागलेत. झिंग आणणारा हा उत्साह असल्यानं अवघा उत्सव तरुणाईचा होऊन गेलाय. त्यातच तो आता पूर्णपणे
कार्पोरेट झालाय.
करोडोंची उलाढाल
राज्यभरात दणक्यात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवातून करोंडोंची उलाढाल होते. एकट्या मुंबईतील उलाढाल सुमारे 100 कोटींच्या घरात आहे. त्यातही ठाण्यातून सर्वाधिक उलाढाल होते. धारावीच्या कुंभारवाडयात मुंबईतील ठिकठिकाणच्या दहीहंडी आयोजकांकडून १५ हजारांवर मडकी खरेदीची नोंदणी झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत मडके महाग झाले असून त्यासाठी आता ५० ते ५०० रुपये मोजावे लागतायत. गोविंदा मंडळांच्या मागणीनुसार हवी तशी विशेष मडकीही बनवून दिली जातात. याशिवाय अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही मोठ्या संख्येनं कामं मिळतात. सेलिब्रिटींची छबी पहायला मिळते. टी शर्ट, आदी उपयुक्त गोष्टींची उलाढालही मोठी होते.
...असा आहे मुंबईतील गोविंदा
मुंबईत जवळपास एक हजारांपेक्षा जास्त गोविंदा पथकं आहेत. शिवाय मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणीही दहीहंडी फोडण्यासाठी पथकं जातात. नायगाव, लालबाग, परळ, दादर या मराठीबहुल भागात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लागल्यात. याशिवाय उपनगरांमधूनही धूम पहायला मिळतेय. शिवसेना तसंच मनसेनं दहीहंडी फोडणा-या गोविंदांसह कार्यकर्त्यांना भगव्या रंगाच्या टी-शर्टचे वाटप केलंय. मुंबईतील कुठलीही दहीहंडी आता किमान लाखाची असते. ‘जाणता प्रतिष्ठान’नं घाटकोपरच्या ‘आर’सीटी मॉल येथे उभारलेल्या दहीहंडीचं नावंच मुळी जल्लोष आहे. १२ थर लावणा-या पथकाला ५१ लाखांच बक्षीस जाहीर करण्यात आलंय. जेवढं जास्त थर तेवढा जास्त लाखांचा थर, असं सध्याचं स्वरुप आहे.
ठाणे झालंय हॉट डेस्टिनेशन
दहीहंडी उत्सवाचं ठाणे हे हॉट डेस्टिनेशन आहे. आलिशान आयोजन, डीजेंचा दणदणाट आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यांमुळ इथल्या लाखमोलाच्या हंडय़ा झगमगत असतात. दहीहंडी उत्सवाची वाढती लोकप्रियता आणि आगामी निवडणुका या दोन्हींवर लक्ष ठेवून यंदा अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसं देणाऱ्या दहीहंड्या लावण्यात आल्यात. यंदा ठाण्यामध्ये दोन आयोजकांनी सर्वात उंच म्हणजे १० थर रचून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केलंय. त्याशिवाय सात, आठ आणि नऊ थर रचणाऱ्या गोविंदांना बक्षिसापोटी लाखांचे इनाम दिले जाते.
संघर्षची ग्लोबल दहीहंडी
ग्लोबल दहीहंडी असं स्वरूप प्राप्त झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष दहीहंडीचा उत्सव यावर्षी अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि भारतीय सीमेवरील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या कुंडलिक माने यांना समर्पित करण्यात आलाय. दहा थर लाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. नवव्या थरासाठी 15 लाख, आठव्या थरासाठी 1 लाख, सातव्या थरासाठी 25 हजार, सहाव्या थरासाठी 15 हजार बक्षीस आहे. महिला गोविंदा पथकांसाठी 7 थरांसाठी 1 लाख, सहाव्या थरांसाठी 51 हजार अशी बक्षिसांची लयलूट आहे. यावर्षीही लाखो रुपयांच्या बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली असून स्पेनचे 250 गोविंदा हे याचे आकर्षण आहे. याशिवाय ठाणे महापालिका स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या वागळे इस्टेट, याशिवाय रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहा थरांची सलामी देणा-या पथकांना तर आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’नं नऊ थर लावणा-या पथकांना लाखांची बक्षीसं जाहीर केलीत. विशेष म्हणजे, ठाण्यातील बरीच मंडळं सामाजिक बांधिकलीही जपत या उत्सवाबरोबर अनेक समाजोपयोगी कामेही करत असल्याचं चित्र पहायला मिळतंय.
गोविंदांना विमा संरक्षण
थर कोसळून गोविंदांचे मृत्यू झाल्याच्या दुदैर्वी घटनाही घडल्यात. काही गोविंदांना तर कायमचं अपंगत्वही आलंय. ही या उत्सवाची काळी बाजू गेल्या काही वर्षांपासून अधोरेखीत झालीय. त्यामुळं आता गोविंदांना संरक्षण देण्यासाठी दहीहंडी उत्सव समित्यांबरोबरच महापालिकांनीही पुढाकार घेतलाय. ठाणे महापालिकेनं गोविंदा पथकांसाठी विमा संरक्षण जाहीर केलंय. तर संघर्षनं 2 कोटी रुपयांच्या विम्याचं गोविंदांना संरक्षण दिलंय. तसंच जखमी गोविंदांवर उपचारासाठी 150 गोविंदांना रुग्णालयात मोफत उपचारासाठी सोय करण्यात आलीय. तर मुंबई महापालिकेनं दहीहंडी फोडताना मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
बाइकवरून पडून दोन गोविंदांचा मृत्यू
ठाण्यात कोपरी पुलावर जोगेश्वरीच्या जय जवान पथकातील प्रशांत सातपुते या गोविंदाचा बाइक घसरल्यानं ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. बाइक घसरून गोविंदाचा मृत्यू होण्याची दुसरी घटना मुंबईत सुमन नगर इथं घडली. संकेत मोहिते असे त्याचे नाव असून तो तिघेजण असलेल्या बाइकवर तो सर्वात मागे बसला होता. मुंबई शहर व उपनगरांत दिवसभरात ३६५ गोविंदा जखमी झाले असून त्यातील ३०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ५८ जणांवर उपचार सुरू आहेत.
Comments
- No comments found