टॉप न्यूज

एक नमन गवरा, पारबती हर बोला!

ब्युरो रिपोर्ट
कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. दसरा दिवळीसारखाच शेतकरी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढतात. यांत्रिकीकरणामुळं बैलांची शेतातील कामं कमी झाल्यानं दावणीला त्यांची संख्या घटलीय खरी, पण त्यांचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. 'एक नमन गवरा, पारबती हर बोला' असा गजर करीत आज म्हणजेच पोळ्याला त्यांचं धुमधडाक्यात कौडकौतुक होतं. 
 

पोळा हा प्रामुख्यानं खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात झोकात साजरा होतो. साजरा करण्याच्या प्रत्येक ठिकाणच्या तऱ्हाही न्याऱ्या असतात.

 


Image 1खानदेशचा पोळा

खानदेशात परंपरेनं हा सण साजरा होतो. पोळ्याच्या दोन दिवस आधी खांदेपूजा होते. यामध्ये बैलांचे खांदे तेल, तूप लावून मळण्यात येतात. शिंग व खुरं तासण्यात येतात. नाभिकांकडून बैलांच्या शेपटीचे गोंडे सजवण्यात येतात. शिगांना रंग लावण्यात येतो. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ (वेसन) बैलांच्या नाकात घालण्यात येते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घण्टी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर मखमली झुल, माथोटी, दोर असे नाना गोष्टी वापरून सजवलेल्या बैलांची संध्याकाळी मिरवणूक काढण्यात येते. गावातल्या पाटलाचा बैल वेशीपर्यंत वाजत-गाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात. त्यालाच ‘पोळा फुटणं’ असं म्हणतात. हा पोळा फुटल्यावर घरमालकांनी परंपरेप्रमाणं पुरणपोळीचं जेवण करून उपवास सोडण्याची प्रथा आहे.

 

अशी होते पूजा...
बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरण्यात येतो. रूईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात. सजवलेल्या बैलांना घरांसमोर आणून शेतीच्या साधनांची, अवजारांची पूजा करण्यात येते. खाटेवर दुसरं ठेवून विविध कडधान्ये, डाळींच्या मूठ मूठ राशी ठेवण्यात येतात. या राशींना ‘शिधा’ असंही म्हटलं जातं. बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल, असा समज आहे. त्यानंतर कारभारणीनं बैलांचं औक्षण करुन पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो.

 

DSCF4068वराडसीमचा प्रसिद्ध पोळा!
खानदेशात जळगाव तालुक्यातील ‘वराडसीम’ या गावाचा पोळा प्रसिद्ध आहे. त्या गावातल्या जुन्या भव्य ऐतिहासिक दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवला जातो. शेकडो वर्षांपासूनची परंपरा यासणाला आहे. ती दरवर्षी पाळली जाते. घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचं पूजन होतं. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक काढण्यात येते. त्यालाच ‘बाशिंग्या बैल’ असंही म्हणतात. संध्याकाळी ‘तोरण तोडण्या’ची स्पर्धाही होते.tanha polaविदर्भातही जल्लोष

विदर्भातही मोठ्या जल्लोषात पोळा साजरा करण्यात येतो. इथं तान्हा पोळा ही परंपरा आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा होतो. लहान मुलं लाकडांनी सजवलेले बैल तान्हा पोळ्यात ठेवतात. लाकडी बैलाची आईनं पूजा केल्यानंतर वडील बोजारा देतात. नंतर लाकडी बैलाला तान्हा पोळ्यात ठेवतात. तान्हा पोळा फुटला की, चिमुकले बोजारा मागत घरोघरी फिरतात. यातून एक, दोन किंवा पाच रुपये चिल्लर मिळते. यासाठी नागपूरसह विदर्भातील अन्य प्रमुख बाजापेठ लाकडी बैलांनी खच्चून भरल्या होत्या. आंबा किंवा पाराच्या लाकडापासून हे लाकडाचे बैल बनविण्यात येतात.

 

विदर्भातील पोळ्याची वैशिष्ट्य

अंजनगाव सुर्जी : पोळ्याच्या पर्वावर सुर्जीत द्वारकेची यात्रा भरते. सुर्जीतील देवनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक मारोती मंदिरासमोर ही द्वारकेची यात्रा पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी भरते.

 

शेंदूरजना घाट : पोळ्याच्या सणाला होणार्‍या पूजेमध्ये वाकाच्या दोराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पळसाच्या सालीपासून हा वाकदोर तयार केला जातो. बाजारामध्ये जरी नायलॉनपासून बनलेले रंगीबेरंगी वाकदोर विक्रीस उपलब्ध असले तरी पळसाच्या मुळापासून बनलेल्या वाकदोरांचीच परंपरा आजही कायम आहे. पळसाच्या झाडाच्या खोलवर रुजलेल्या मुळ्या बाहेर काढून त्यांना शेकोटीवर भाजले जाते. नंतर बारीक कुटले जाते. त्यापासून तंतू तयार होतात. त्या तंतूपासून लांब दोरी तयार केली जाते. अशा अनेक दोर्‍यांपासून वाकदोर तयार होतो. त्याच्या गोंड्याला रंग सुध्दा दिला जातो. पोळ्याच्या दोन महिने आधीपासूनच वाकदोर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते.

 

मोर्शी : मोर्शी शहरात पूर्वीपासून चार ठिकाणी पोळा भरतो. पूर्वी सर्वात मोठा आणि मानाचा पोळा तारामाता मंदिर ते जुना मारोती मंदिर तसेच सुलतानपुरा परिसरात भरत होता. मखराच्या बैलाच्या पूजनानंतर पोळा फुटत असे. मात्र, सध्या 'मखराचा बैल' ही संकल्पना लयास गेली आहे. पूर्वी मोर्शीशहरात पोलीस पाटलाचे पद होते. त्यावेळी बळवंतराव पाटील हे पोलीस पाटील होते. ते मखराचा बैल घेऊन येत, सजावट करून त्याच्या शिंगाला पेटते टेंभेही बांधले जात. हा पोळा फुटल्यानंतरच शहरातील इतर पोळे फुटत, मात्र, सध्या ही परंपरा खंडित झाली आहे. राममंदिर परिसरात पोळा भरतो.

 
DSC 0309

'एक नमन गवरा'चा गजर

वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पारबतीच्या लुगड्याले छप्पण गाठी
एक नमन गवरा, पारबती हर बोला, हर हर महादेव!!!


काळ्या वावरात कुंद्याच्या खटी,
रामराव म्हणते पावसाने बुडाली शेती
गुन्या म्हणते लाव छातीले माती
एक नमन गवरा पारबती हर बोला, हर हर महादेव!

 

 

 

 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.