टॉप न्यूज

बाप्पा मोरया रे... चरणी ठेवितो माथा!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणपती बाप्पांचं आज जल्लोषात आगमन झालं. घरोघरी यथासांग बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपतीही नेहमीप्रमाणं मोठ्या थाटामाटात मिरवणुकीनं आले.  बाप्पा आल्यानं अबालवृद्धांना आनंद झाला असून 'आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे' असं चित्र पहायला मिळतंय. पहिल्याच दिवशी बाप्पांचे मोदक खाऊन सर्वांचीच तोंडं गोड झालीत. आता इथूनपुढचे दहा दिवस मोरयाचा गजर आसमंतात भरून राहणार असून हीsss धमाल असणारंय.


Ganpati 01


a1सडा रांगोळी, तोरणंही...

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत गेल्या वर्षी सगळ्यांनी बाप्पांना निरोप दिला. त्यानंतर वर्षभर आपण सर्वांनी ज्याची आतुरतेनं वाट पाहिली, तो दिवस आज आला. सकाळपासून घराघरात गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. गृहिणींनी घरापुढं सडा-रांगोळी केली. दाराला तोरणं लावली. त्यानंतर पारंपरिक वेष करुन, नटूनथटून न चुकता गांधी टोपी चढवून कुटुंबकबिल्यासह सर्वचजण घराबाहेर पडले आणि मोरयाचा एकच गजर करीत बाप्पांना घरी आणलं. ज्यांनी यंदा चारचाकी, दुचाकी घेतलीय ती लोकं आवर्जुन नव्या वाहनांमधूनच बाप्पांना घरी जाताना दिसत होती.

 

सार्वजनिक मंडळांचा एकच जल्लोष
सकाळी गणपती बसल्यानंतर घरोघरी मोदकाचं गोडधोड जेवण झालं. त्यानंतर सर्वजण सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी लोकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचं आगमण यंदाही झोकात झालं. बहुतांश मंडळांच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा झाली होती. तर मानाच्या तसंच लोकप्रिय मंडळांचे गणपती विधीवत पूजाअर्चा करुन सकाळीच बसले. मुंबईतील लालबागच्या राजाची सकाळीच प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर दर्शनासाठी रांग सुरू झालीय. ही दर्शनरांग आता दहाही दिवस वाढत जाणार आहे. बरेच भक्त पहिल्याच दिवशी राजाचं दर्शन घेतात. यंदाही त्यांनी ही परंपरा पाळल्याचं चित्र पहायला मिळालं. मुंबईतील इतर मोठ्या मंडळांचे गणपतीही विधीवत पूजापाठ करुन सकाळीच बसले.sumit ganpatiपुण्यातही जल्लोष

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही विघ्नहर्त्या गणरायाचं उत्साही वातावरणात आगमन झालं. मानाच्या सर्व गणपतींबरोबरच लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती मंडळाच्या बाप्पांचीही दुपारी बाराच्या सुमारास प्रतिष्ठापना झाली. पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाच्या गणेशाची चांदीच्या पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठापना झाली. बॅंड, ढोलपथक; तसंच अबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. मानाच्या दुसऱया तांबडी जोगेश्‍वरी मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापनाही परंपरेप्रमाणं झाली. प्रथेनुसार मिरवणुकीत नगारावादन, बॅंड, लेझीम पथक व मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची तसंच मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाची मिरवणुकही झोकात झाली. मानाचा पाचवा केसरी वाड्याच्या गणपतीची सजविलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धार्मिक परंपरेप्रमाणं प्राणप्रतिष्ठापना झाली. अखिल मंडई मंडळाची मिरवणुकही धुमधडाक्यात झाली. भाऊ रंगारी गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक प्रथेनुसार निघाली. त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची प्रतिष्ठापनाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधीवत धार्मिक पद्धतीनं झाली.a2गणराज रंगी नाचतो...

मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि आवडीच्या वाटतात, त्या सर्व गोष्टींमध्ये रमणारा देव म्हणजे गणपती. गणपती हा गोडधोड खाणारा आहे. त्याला "लाडू मोदक अन्ने परिपूर्ण पात्रे' प्रसन्न करतात. तो मोजकेच का होईना, पण अंगावर दागिने घालतो. पण असे असले तरी तो सुखासीनतेत रमणारा देव नाही. वेळप्रसंग घडला तर तो हातातील शस्त्रांचा उपयोग करायला मागेपुढे पाहात नाही. तो देवांचा सेनापतीही आहे. असे सांगतात की, 21 शिपायांचा एक गट असे, पुन्हा या 21 गटांचा एक मोठा गट असे 21 मोठे गट अशा पद्धतीनं गणपतीनं आपलं सैन्य उभारलं आणि सैन्याच्या अशा स्वरुपाची रचना आजही केली जाते. गणपती सेनापती म्हणून इतका श्रेष्ठ आहे की तो रणांगणात कधीही हरलेला नाही. तो निरंतर अजेय आहे. असे असूनही तो केवळ लढणारा शिपाई गडी नाही. त्याला नृत्य, नाट्य, गायन अशा कलांमध्ये विशेष रस आहे. "गणराज रंगी नाचतो' असं आपण कौतुकानं म्हणतो. सिद्धि - बुद्धि अशा दोन पत्नी निरंतर त्याच्यासोबत असतात. वादविवादात, लढाईत जिंकायचेच अशा निष्ठेनं तो वावरतो. आपण लढाईत कमी पडू अशी शंका आली तर कपटाचा डाव मांडण्यासही तो मागंपुढं पाहात नाही. गणेशाचं हे स्वरूप म्हणूनच विलोभनीय वाटतं आणि त्यामुळंच गेली काही हजार वर्ष आपण मनोभावे त्याचं पूजन करीत आलोय. आताही तेच होतंय. त्यामुळंच इथूनपुढचे दहा दिवस अवघा माहोल गणपतीमय झालेला असेल. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.