टॉप न्यूज

आली गौराबाई, हळदीकुंकवाच्या पायी!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आली, आली गौराई, सोन्या-रुप्याच्या पावलानं... आली, आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... बाप्पांनंतर घरोघरी वाजतगाजत गौराई आली अन् अवघा मराठी मुलूख चैतन्य, आनंदानं न्हाऊन गेला. सुख, समाधान, शांती, आनंद घेऊन आलेल्या ज्येष्ठा, कनिष्ठा या माहेरवाशीणींना गोडाधोडाचा नैवेद्य करून, गाणी गाऊन त्यांची आळवणी केल्यानंतर आता त्यांना निरोप द्यायची वेळ आल्यानं सर्वांनाच हुरहूर लागून राहिलीय.

                                               

Gauri photo

गौरी आवाहन

बाप्पांच्या आगमनानंतर उत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचं आगमन व पूजन. भाद्रपदातील ज्येष्ठा-कनिष्ठा गौर ही माहेवाशीण म्हणून ओळखली जाते. शिवप्रिया पार्वती ही गौरीच्या रुपानं अवतरत असल्यानं शिवारात समृद्धी असते. निसर्ग पानाफुलांनी बहरलेला असतो. धन-धान्याची आरास असल्यानं गौराई सोन्याच्या, मोत्याच्या पावलांनी घरात प्रवेश करते असं मानलं जातं.
नदीकाठ किंवा पाण्याच्या ठिकाणाहुन गौराईला आणलं जातं. गौरी आवाहनासाठी तिच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या गाण्यांनी तिचं आवाहन केलं जातं. गणपतीसारखंच गौराईचं आगमनही ढोल ताशांच्या गजरात, मिरवणुकीनं होतं. काही ठिकाणी गंगागौर आणण्याची प्रथा आहे. पण, वाढत्या शहरीकरणामुळं प्रथेत थोडा बदल करून नदीऐवजी काहींनी अंगण, दार, तुळशीपासून गंगागौर घरात आणली. तिची गाणी गात गौरीचे सजवलेले मुखवटे परंपरेप्रमाणं घरोघरी बसले. गौराई म्हणजे साक्षात लक्ष्मी....तिचं आगमन धनवृद्धीच्या पावलांनी होतं. म्हणुनच गौरीच्या स्वागतासाठी रांगोळीनं लक्ष्मीची पावलं उमटवली गेली. त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आलं. उंबऱ्यात ठेवलेलं धान्याचं माप गौरीनं ओलांडलं.


Gauri 2

 

सुखानं सगळीकडं वास कर!

प्रथेनुसार गौरींना घरात आल्यावर वाजतगाजत सगळीकडं नेण्यात आलं. स्वयंपाकघर, झोपायची खोली, कपाट, अशा "प्रत्येक भागात तू वास कर,' अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर गौरीचे मुखवटे चढविण्यात आले. गौरीची पूजा, आरती झाली. आपल्या लाडक्या गौराईचा हा सण माहेरवासीनींचा खास उत्साहाचा सण असतो. इतर सणावारांमध्ये जास्त सहभाग न घेणाऱ्या महिला या सणात मात्र स्वत:ला झोकुन देतात. तीन दिवसांच्या या गौराईच्या मुक्कामात झिम्मा फुगडी...गौराईची वेगवेगळी गाणी म्हटली जातात, संपुर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतं.

 

आकर्षक मुखवटे
पूर्वी गौरींच्या मुखवट्यासाठी एरंडाची पानं वापरली जायची....पण आता कालानुरुप यात बदल झालाय. आता गणपतीच्या जशा सुबक मूर्ती मिळतात त्याचप्रमाणं गौरीचे सुबक मुखवटे बाजारात मिळतात. मुखवट्यांप्रमाणं गौरीच्या पुर्णाकृती मूर्तीही आता दिसू लागल्यात.


Gauri a3नैवद्य

वेगवेगळ्या कुटुंबांच्या प्रथांनुसार गौरीला वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दिला जातो. काही ठिकाणी गोडाच्या गौरी असतात, त्यांना गोडधोडाचा नैवद्य दिला जातो, तर काही ठिकाणी तिखटाच्या गौरी असतात त्यांना तिखटाचा नैवद्य दिला जातो. यात मासाहारी नैवद्याचाही समावेश असतो.

पश्चिम महाराष्ट्रात आवाहनाच्या दिवशी तिला शेपूची भाजी, मेथीची भाजी, भाकरीचा नैवैद्य दाखवून पूजा होते. मात्र पूजनाच्या दिवशी मिष्टान्न, पुरणपोळी, खीर, पेज तर काही ठिकाणी मटण-मासळीचं सुग्रास जेवण असतं. आरती पूजापाठ झाल्यावर रात्रीचा जागर घुमतो. माहेरवाशिणीचे रुसवे-फुगवे, लाडाची सरबत्ती सुरु होते. झिम्मा, फुगडी, फेर धरुन नाच-दंगा, आसू आणि हसू रात्र जागवून गौराईचं जल्लोषानं स्वागत होतं. रात्री साडेबारा वाजता आलेल्या गौराईच्या पत्री सुपात डोक्यावर घेवून घराचा कानाकोपरा दाखवून मांगल्याचं, समृद्धीचं वाण मागण्यात आलं.

 

 हुरहूर निरोपाची...!
पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात घराघरांत समृद्धीच्या पावलांनी गौराईंचं आगमन झाल्यानंतर शंकरोबांचंही आगमन झालं. दोघांचीही यथासांग पूजा झालीय.जरीच्या सुंदर साड्या, अंगभर दागिनं, गळ्यात हार, केसात वेणी अशा थाटात माहेरचं लेणं घेतल्यानंतर रात्री पारंपरिक भानोरा सोहळा घराघरांत रंगला. रात्री गौरीगीतांनी जागल्या. झिम्माफुगडीच्या फेरावर गौरीची गाणी झाली. आता एवढं कोडकौतुक करून झाल्यावर या माहेरवाशीणीला निरोप देताना डोळे पाणावणार नाहीत तर काय? तिच्या जाण्याची हुरहूर आता सगळीकडं दिसून येतेय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.