टॉप न्यूज

पुढच्या वर्षी लवकर या...!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दहा दिवस मोरयाचा गजर आसमंतात भरुन राहिलाय. आता, आजचा दिवस आहे बाप्पांना निरोप देण्याचा. मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू झाल्यात. 'मोरया रे, बाप्पा मोरया रे' अशा गजरात 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी कार्यकर्ते बाप्पाला करतायत. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांनीही 'कडक' तयारी केलीय.

 

मराठमोळ्या संस्कृतीचा मानबिंदू img 0980

गणपती विसर्जन मिरवणूक हा मराठमोळ्या संस्कृतीचा मानबिंदू झालाय. मुंबई, पुण्यातील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. मुंबईतल्या मानाच्या तसंच लोकप्रिय गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी नेहमीप्रमाणं मोठी गर्दी आहे. तर पुण्यामध्ये अगदी मराठमोळ्या पद्धतीनं विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झालाय. विविध धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती, सामाजिक आशयावर भाष्य करणारे देखावे, रथ आणि याच्या जोडीला नेत्रदिपक विद्युत रोषणाई ही यावेळीही राज्यभरातील विसर्जन मिरवणुकींची वैशिष्ट्य राहणार आहेत. विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली असून नेहमीप्रमाण कडक बंदोबस्त आहे.

 

पुण्यात चांदीच्या पालख्या
पुण्यातील विसर्जन मिरवणूक मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता सुरु झाली. मानाच्या सर्व गणपतींची मिरवणूक सकाळीच सुरू होऊन सायंकाळी पाचपर्यंत संपेल, असं नियोजन करण्यात आलंय. कसबा, केसरी ट्रस्टच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पारंपरिक धार्मिक पद्धतीनं निघाली. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली असून प्रभात बॅंड, रमणबाग ढोल-ताशा, नगारा वादन हे आकर्षण आहे. मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्‍वरी मंडळाची मिरवणुकही चांदीच्या पालखीतून निघालीय. नगारा, अश्‍वपथक, ढोल-ताशा, लेझीम अशी पथके मिरवणुकीत सहभागी झालीत. पारंपरिक वेशातील महिलांचे फुगडी, झिम्मा आदी खेळ हे याचं वैशिष्ट आहे. मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळानं यंदा फुलांचं राजसिंहासन तयार केलंय. मिरवणुकीपुढं शालेय विद्यार्थी विविध क्रीडा प्रकार सादर करतायत. मानाचा चौथ्या तुळशीबाग गणपतीची विसर्जन मिरवणूक नानाविध रंगाच्या आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून निघालीय. ठिकठिकाणी स्त्री अत्याचारावर आधारित पथनाट्य सादर केली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी वाडा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पालखीतून सुरू झालीय.lalbaugमुंबईतही झोकात मिरवणुका 

विविध सुबक आणि मोठ्या मूर्ती हे मुंबईतील गणेशोत्सवाचं वैशिष्ट. याशिवाय झोकात निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. नेहमीप्रमाणं सर्वाधिक गर्दी आहे ती लालबागच्या राजाला. तोबा गर्दीमुळं ज्यांना दहा दिवसांत दर्शन घेता येत नाही असे लाखो भक्तगण विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावून राजाचं दर्शन घेतायत. ‘गणेशगल्ली’चा राजाला निरोप देण्यासाठीही मोठी गर्दी आहे. गिरगावच्या केशवजी नाईकांच्या चाळीतला गणपती हा मुंबईतला सर्वात पहिला सार्वजनिक गणपती. यंदा मंडळाचं १२१वं वर्ष असून ढोलताशे या पारंपरिक वाद्यांचा गजरात त्यांची विसर्जन मिरवणूक निघालीय. माटुंग्याचा ‘जीएसबी’ गणपती, टिळकनगरचं सह्याद्री क्रीडा मंडळ तसंच काळाचौकी गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकही नेहमीप्रमाणं लक्षवेधी ठरत आहे.

 


मुंबई पालिकेची जय्यत तयारी
immersion
विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं जय्यत तयारी केलीय. गिरगांव चौपाटी येथील समुद्रकिनार्‍यावर अतिरिक्त २ तराफे, २ बोटी १५ जीवरक्षकांसह तैनात करण्यात आल्यात. याशिवाय सूचना देणारे २0 फलक संपूर्ण चौपाटीवर लावण्यात आलेत. समुद्राच्या दिशेने अतिरिक्त ३0 प्रखरझोत दिव्यांची व्यवस्था केली आहे. अद्ययावत व सर्व सुखसोयींनी युक्त अशा अतिरिक्त २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. सर्व महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून, त्यात महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी २४ तास असतील. याशिवाय सुमारे २४0 जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात आलीय. याशिवाय मोटारबोटी, प्रथमोचार पेटी, तात्पुरती शौचालये यांचीही व्यवस्था करण्यात आलीय. तसंच सर्च लाइटची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करण्यासाठी फ्लड लाइटची व्यवस्थाही आहे. निर्माल्यासाठी ठिकठिकाणी मोठमोठे कलश ठेवण्यात आलेत. विशेष म्हणजे, अनंत चतुर्दशी दिवशी समुद्रास मोठी भरती आणि ओहोटी असून, या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलय.

 

सायंकाळपर्यंत विसर्जन करा

बुधवारी (ता. १८) अनंत चतुर्दशी आहे. ही तिथी सायंकाळी ६.४० मिनिटांपर्यंत आहे. ज्यांच्या घरी दहा दिवसांसाठी गणपतीची स्थापना झाली आहे त्यांनी या वेळेपर्यंत विसर्जन करावे. ज्यांना शक्‍य होणार नाही त्यांनी त्यानंतर उत्तरपूजा करून रात्रीपर्यंत विसर्जन केले तरी चालेल, असा सल्ला पंचागकर्त्यांनी दिलाय.

ganpati-13 2

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.