टॉप न्यूज

शारदीय सुखसोहळ्यांची नवरात्र सुरू!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झालाय. घराघरात घट स्थापन झालेत. आता इथून पुढचे नऊ दिवस आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे... आपल्या कृषिप्रधान देशातील बहुतांश चालीरीती शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. नवरात्रोत्सव हा सणही त्यापैकीच एक! ही पूजा शक्तिदेवीची. शारदीय सुखसोहळ्यांची. घरात निसर्ग फुलवण्याची...निसर्ग रसरसून अनुभवण्याची!!!

 

निसर्गही झालाय सज्ज... 

यंदा जनता दुष्काळानं होरपळली. उभी पिकं जळाली. पशुधन रोडावलं. या सगळ्याला न डगमगता तोंड देत असताना वेळेआधी पाऊसधारा कोसळायला लागल्या. उभ्या मऱ्हाटी प्रांतात मृगाची धार ५ जूनलाच बरसली आणि चैतन्याची एक लाट उसळली. तिथपासून सुरू झालेल्या दमदार पाऊसधारांनी आता कुठंसा दम टाकलाय. नदीनाले शांत झालेत. निरभ्र आभाळात चंद्रसूर्यांच्या घरचं तारांगण चमचमू लागलंय. वनराई फुललीय. रानात पिकं भरारलीत. पाखरं गाऊ लागलीत. अवघं भोवताल जणू भाग्यदेवतेच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. ...आणि अशा हर्षभरीत वातावरणात दरवर्षीप्रमाणं नवरात्रोत्सव आलाय.

 4 devya

 

निर्माणाच्या प्रक्रियेपुढं नतमस्तक होण्याचं प्रतीक...
नवरात्रोत्सवात भारतातील सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी होणारं घटपूजन हे निर्माणाच्या प्रक्रियेपुढं नतमस्तक होण्याचं प्रतीक आहे. स्त्रीच्या देहात असलेला गर्भरूपी घट आणि घटस्थापनेच्या पूजेतील घटरूपी गर्भ यांचा अनन्य, आदिम आदिबंध पूजणं म्हणजे सृजनाची पूजा! अंकुरण्याची नैसर्गिक आणि नाजूक प्रक्रिया आपल्या आत घडवणारी स्त्री ममतेचा सागर असते. परंतु त्याचबरोबर अधर्माचा बिमोड करण्यासाठी हातात शस्त्रास्त्र, आयुधे घेतलेली स्त्री-आदिशक्ती दुष्टांचा संहार करण्यासाठी समर्थ आणि सक्षम असते. तिनं धारण केलेलं चंडीकेचं उग्र, भयंकर रूप दुष्ट-दुर्जनांना पळताभुई थोडी करून सोडतं. स्त्रीशक्तीची ही दोन्ही, अगदी विरुद्ध रूपं म्हणजे स्त्रीची बलस्थानं होत. या बलस्थानांची जाणीव आणि जागृती म्हणजेच स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रोत्सवातील बांधली जाणारी तिची पूजा होय.

navratri-ghatasthapana01

अशी होते घटस्थापना...
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची सुरुवात होते, घटस्थापनेपासून. कुलस्वामिनीची स्थापना करून त्याचबरोबर घटस्थापना तसंच घटाभोवती माती पसरून त्यात सप्त धान्ये (सालासह भात, ज्वारी, बाजरी, गहू, कांग, जवस, चणे) पेरली जातात. कुलस्वामिनीचा टाक तसंच श्रीफळ ठेवलेला घट यांच्यावर झेंडूची फुलं, तिळाची फुलं अथवा नागवेलीची पानं यांच्या माळा नवरात्रीचे नऊ दिवस बांधल्या जातात. माळाच का? एखादं पुष्प का नाही? याला तसा शास्त्रीय आधार काही नाही. फक्त टाक लहान असून एक-एक फूल जरी नऊ दिवस वाहिलं तरी टाकाचं दर्शन होणार नाही, म्हणून माळा बांधण्याची पद्धत अस्तित्वात आली असावी. तसंच ज्या विभागात जी फुलं मुबलक त्या फुलांच्या माळा करण्याची पद्धत आली असावी. अखंड दीपप्रज्वलन हेसुद्धा आलंच.

 

नंदादीप...
हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसंच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचं युद्ध चालू असतं. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेलं असतं (ऑक्टोबर हिट) व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगानं सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी श्रद्धा आहे. याचं प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजलं जातं. घरात घटपूजन केल्यानं वास्तूमध्येही दुर्गादेवीचं मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचं निर्दालन होतं, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे.

 

For Headlineमहाराष्ट्रीतील साडेतीन पीठं...
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठं (गाद्या) आहेत. त्यांचा क्रमच लावावयाचा झाल्यास, सर्वप्रथम येते कोल्हापूरची अंबाबाई अर्थातच श्रीमहालक्ष्मी. कोल्हापूरचं पीठ हे पूर्णपीठ मानलं जातं. त्यानंतर राजसपणाचं प्रतीक म्हणजेच तुळजापूरची भवानी. हे दुसरं पूर्ण पीठ. माहुरची महामाया रेणुका ही परशुरामाची माता तसंच जमदग्नींची पत्नी असून तिचं स्थान हे तिसरं पूर्ण पीठ. नाशिकची (वणीची) सप्तशृंगी जगदंबा यांना अर्धपीठ समजलं जातं. नवरात्रीच्या काळात या शक्तिपीठांसह विविध देवींच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. रानावनातील कामं आटोपलेली असतात. शेतकरी निवांत झालेला असतो. त्यामुळं आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचा शारदीय नवरात्रोत्सव झोकात साजरा होता. धनधान्याची रास घरी आल्यावर इथून पुढचे काही दिवस बळीराजासाठी मोठ्या हौसमौजेत जगण्याचेच तर असतात! असं काय करता... आता दसरा नाही का येणार! दिवाळी नाही का आली तोंडावर! तुळशीचं लगीन लागेपर्यंत ही सणांची मांदियाळी अशीच सुरू राहणार.

 

...असं म्हणतात की, सणांमुळं उत्साह निर्माण होतो. हौसमौज करावीशी वाटते. जाता जाता मानवी मनावर आपोआप संस्कार घडून जातात. वातावरण प्रसन्न राहतं. आपल्या कृषिप्रधान देशाला दुसरं काय हवंय!!!

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.