टॉप न्यूज

...उदे, उदे गं अंबाबाई!

ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
पुराणात उल्लेखलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी हे या पीठांपैकी एक! या आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रीत होणारा जागर कोण वर्णवा! तो पाहण्यासाठी आणि अंबामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातील भाविकांची पावले करवीरनगरीत वळतायत. नवरात्रीत देशभरांतून सुमारे 12 लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज आहे. अंबाबाईमुळंच कोल्हापूरची नवरात्र आणि शाही दसरा आज जगभरात आकर्षणाचा विषय झालाय.

 

maha-3
महलक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुड मंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळं देवी अनेकांच्या मते पार्वतीचं रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचं वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागं दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.


ambabai 1इतिहास 

महालक्ष्मीचं मंदिर कोणी बांधलं हे निश्‍चित सांगता येत नसलं मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या  काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचं महात्म्य प्रस्थापित झाल्याचं दिसतं. राष्ट्रकुट नॄपती प्रथम अमोघवर्ष यानं काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजानं बांधलं असावं. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावलं होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचं बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळातील आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूर पंचक्रोशीत मिळणाऱ्या काळया दगडात झालीय. देवळाचं शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधलं, असं म्हणतात. हे देवालय आकारानं एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाड पंथी  वास्तुशिल्प पद्धतीनं या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजवली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असंही म्हणतात. देवळात वारा येण्यासाठी गवाक्षं नाहीत. पूर्वेकडं असलेल्या मोठ्या घुमटाखाली महलक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तर आणि दक्षिणेकडं असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप  लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरुड मंडप म्हणतात.

 


touristmaha2bigसूर्यकिरणोत्सव...
हे भव्य मंदिर त्रिकूट देवालय असून यात महाकाली उत्तराभिमुख, महालक्ष्मी पश्चिमाभिमुख व महासरस्वती दक्षिणाभिमुख आहे. स्थापत्यदृष्टय़ा तीनही मंदिरे वेगवेगळी आहेत. महालक्ष्मी मंदिर सप्तरथ, मेरुमंडोवर पद्धतीची रचना असलेले, बाह्यंगांवरील देवकोष्ठांवरील शिखरे नागर शैलीची आहेत. महाकाली देवालय पंचरथ, देवकोष्ठांवरील शिखरांची रचना वेसर पद्धतीची आहे. महासरस्वती देवालय साधे दगडी बांधकाम असलेले आहे. ही तीनही मंदिरे सांधार आहेत. महालक्ष्मी मंदिराची बांधणी करताना दिशासाधनाचा अवलंब केलेला दिसून येतो. त्यामुळं कार्तिक आणि माघ महिन्यात इथं किरणोत्सव होतो. या दिवशी सूर्यकिरणं महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ते महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरण पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात आणि तिथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. देवळाची बांधणीच अशातऱ्हेने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणं देवीच्या अंगावर पडतात.

 


mahalakshmiआद्यशक्ती अंबाबाई...

महालक्ष्मीला आद्यशक्ती मानून तिच्यापासून सर्व देवदेवतांची निर्मिती झाली. विश्वाची निर्मिती व तिचं पालनपोषण व संहार करणारी तीच आद्यशक्ती आहे. गीतेतील तत्त्वाप्रमाणे ज्या ज्या वेळी भूतलावर असुरांचे साम्राज्य वाढेल त्या त्या वेळी ही देवता वेगवेगळे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरेल, विविध रूपांत ती पुजली जाईल अशा प्रकारची संकल्पना रूढ झाली. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीनही देवतांचे वास्तव्य असलेले मंदिर म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर होय.

 

 

 


ताम्रपट व शिलालेखांतील उल्लेख...
कोल्हापूर हे स्थान इ.स. तिसऱ्या शतकापासून मानवी वसाहतीचं केंद्र असल्याचं कोल्हापूरजवळील ब्रह्मपुरी येथील उत्खननावरून सिद्ध झालंय. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव व काही काळानंतर मराठे या राजवंशांची सत्ता या स्थानावर होती. महालक्ष्मीशी एकरूप होऊन शिलाहार वंशीयांनी स्वत:स ‘श्रीमहालक्ष्मीलब्धवरप्रसादादिस’ असे म्हणवून घेतले. सुलतानी आक्रमणाच्या वेळी जरी महालक्ष्मीस वनवास पत्करावा लागला तरी मराठी साम्राज्यात तिला आपले गतवैभव प्राप्त झाले व आजतागायत ती आपले स्थान भूषवीत आहे. पुराणांत व ग्रंथांत जसे महालक्ष्मीचे उल्लेख आलेत तसेच ताम्रपट व शिलालेखांमधूनही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे उल्लेख सापडतात. थोडक्यात पुराणकाळापासून अंबाबाईची महती असून ती आजही कायम आहे.

 

महालक्ष्मीचा डोळं दिपवणारा खजिना...
कोल्हापूरची महालक्ष्मी हे परंपरेनं श्रीमंत देवस्थान आहे. अलिकडं देवीच्या खजिन्याचं मूल्यांकन करण्यात आलं. अक्षरक्ष डोळं दिपवणारा हा खजिना आहे, हे त्यावरून लक्षात येतं. रत्नजडित किरीट, श्री यंत्र हार, तोडे, तन्मणी, कवड्यांची माळ, ठुशी, मोतीहार, जडावाची कवचकुंडले व पान, मोहरांची माळ, असे दागिने खजिन्यात आहेत. 98 चाफेकळी हार असाच विशेष दागीना आहे. चाफेकळी ज्या पद्धतीची असते. त्या पद्धतीने हा हार बनविलेला आहे. 98 सोन्यांच्या चाफ्याच्या कळ्या तयार करून त्या गुंफून हा हार बनविण्यात आलेला आहे. या कळ्यांची बनावट अत्यंत नाजूक आहे. चाफ्याच्या फुलांच्या कळ्यांनाच हारामध्ये गुंफले आहे, असे हार पाहताना वाटते. हे व यासारखे विशेष हार नवरात्रीत घालून देवीची सालंकृत महापूजा बांधली जाते. याशिवाय सोन्याचा किरीट, हिऱ्याची नथ, मोतीसतरा, सोन्याचे नऊ दागिने, ठुशी, 2 कुंडले, मोरपक्षी, चंद्रहार 16 पदरी, आकडेसमोरी 6, म्हाळुंग, बोरमाळ 74 मणी, 49 मोहरांची माळ, हे नित्य वापरातील दागनेही आहेतच. देवीच्या रोजच्या पूजेवेळी 26 हून अधिक दागिने वापरले जातात. त्यांची देखभाल पिढीजात चालत आलेल्या हवालदार घराण्याकडं असून श्रीपूजक खजिनदारांकडून दागिने घेऊन पूजेनुसार देवीस घातले जातात.

 

नवरात्रीतील नऊही दिवस देवीची विविध रुपात पूजा बांधली जाते. सालंकृत पूजा बांधल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेताना देवीला आदिमाया, आदिशक्ती का म्हणतात, याचा प्रत्यय येतो. त्यासाठीच तर आता करवीरनगरी भाविकांनी फुलून गेलीय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.