टॉप न्यूज

मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी!

ब्युरो रिपोर्ट, तुळजापूर
देवीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेली तुळजापूरची आई भवानी ही तर मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी! छत्रपती शिवरायांची ही कुलदेवता, शौर्य, शक्ती प्रदान करणारी माता आहे. जगदंबेचा उदो...उदो केला की मर्दुमकी गाजवण्यासाठी अंगात बळ येतं. त्यामुळं नवरात्रात भवानीमातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापूर देशभरातील भाविकांनी गजबजून गेलंय.

bhavani1

 

तुळजापुराण...

भवानीमातेला महिषासुरमर्दिनी असं म्हणतात. त्याबद्दलची एक कथा सांगितली जाते. फार पूर्वी सत्ययुगात कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती ही पार्वती मातेची निस्सीम भक्त होती. कर्दम ऋषी तपश्चर्येला गेल्यावर अनुभूती पण तपाला बसली व आदी शक्ती पार्वतीची आराधना करू लागली. ते ठिकाण होते यामुनाचल म्हणजे हल्लीचे बालेघाट परिसर. एकदा तिथून द्रविड देशाचा (दक्षिण भारत) कुक्कुर नावाचा राक्षस राजा चालला होता. त्याने अनुभूतीला पाहिल्यावर तिचे रूप पाहून तो तिला स्वतः बरोबर चालण्या विषयी सांगू लागला. तेव्हा, अनुभूतीनं प्रतिकार करून आपण कर्दम ऋषीची पत्नी असून सध्या तपश्चर्या करीत असल्याचं सांगितलं. तेव्हा राक्षस तिला बळजबरीने नेऊ लागला. अनुभूतीने देवी पार्वतीचा धावा सुरु करताच ती भवानी प्रकट झाली व कुक्कुर राक्षसाशी युध्द करून त्याला सैन्यासह ठार केले. अनुभूतीच्या विनंतीवरून देवी भवानी बालेघाटाच्या परिसरात राहू लागली. ती त्वरेने म्हणजे वेळ न घालवता आपल्या भक्तिणीसाठी धावून आली, म्हणून ऋषीमुनी तिला "त्वरिता" म्हणू लागले. व त्या क्षेत्राला "त्वरितापूर" त्याच त्वरिताचे पुढं, तुरीता, तुरजा असे अपभ्रंश होत "तुळजा" झाले. इथे ती जगदंबा पार्वती साक्षात पूर्णरुपानं वसलेली आहे. ती चौदा भूवानांची स्वामिनी असल्यामुळं तिला "भवानी" असं म्हटलं जातं. पुढं, दक्षिणेत महिषासुर नावाचा दैत्य मातला. त्यानं, इंद्रादी देवांचा पराभव केला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व देवांनी देवी भवानीला त्वरितापूर इथं आवाहन केलं. तेव्हा ती जगदंबा प्रकट होवून, महिषासुराचा लवकरच वध होईल असे म्हणाली. ती सिंहावर आरूढ होवून बसली असता महिषासुराचा सेनापती चिकासुराची नजर तिच्यावर पडली व त्यानं महिषासुराला तिच्या सौंदर्याचं वर्णन सांगून राणी बनवण्यास योग्य असल्याचं सांगितलं. तेव्हा महिषासुरानं तिला घेऊन ये असे फार्मावता, चिकासुरनं तिच्याजवळ येऊन महिषासुराचा निरोप सांगितला. तेव्हा देवीनं "जो युद्धात मजला पराभव करील, त्याच्याशी मी विवाह करीन" असं म्हटलं. हे ऐकून महिषासुरानं आपलं सैन्य देऊन चिकासुराला पाठवलं असता, देवीच्या अंगातून "अंबिका" देवी प्रकट झाली व तिनं चिकासुराचा नाश केला. असं होता होता ९ दिवसात शुंभ निशुम्भ, रक्तबीज इत्यादी राक्षस नायक देवीच्या महाकाळी , कालरात्री, दुर्गा या अवतारांनी मारून टाकलं. दहाव्या दिवशी देवीनं महिषासुराचा स्वतः १८ भुजांचं रूप धारण करून वध केला. तेव्हापासून तुळजा भवानीला "महिषासुर मर्दिनी" असं म्हटलं जातं. हीच देवी पुढं दमल्यामुळं सप्तश्रृंग म्हणजे सात शिखरं असलेल्या पर्वतावर विश्रांतीसाठी गेली. तेव्हापासून तिला "सप्तशृंगी" म्हणू लागले.

 

tbhavani5मंदिराचा इतिहास...
भवानीमातेचं मंदिर किती पुरातन आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. हे मंदिर सुरुवातीला चार कुटुंबांच्या खासगी मालकीचं होतं. माणिकराव कदम पाटील, रोचकरी, मलबा आणि गणपतराव कदम यांचे पूर्वज ही ती चार कुटुंबं. या मूळ मालकांच्या देवीच्या दैनंदिन पूजेकडं होणाऱ्या दुर्लक्षामुळं क्षीरसागर, हंगरगेकर, भोसले या घराण्यांनाही पूजेचा मान दिला गेला. मंदिरातील भक्तांची वाढती संख्या, मिळणारे प्रचंड उत्पन्न यामुळं ही पूजा करण्यासाठी या मूळ मालकांनी मग १६ कुटुंबांची ‘पाळकरी’ (पाळीपाळीने पूजा करणारे) म्हणून नेमणूक केली. त्यांना पाळ्या वाटून देण्यात आल्या होत्या. मिळणाऱ्या उत्पन्नातून पाळकऱ्यांना किती हिस्सा द्यायचा याचा संपूर्ण अधिकार या मानकऱ्यांना म्हणा किंवा मूळ सेवेकरांना होता. या पद्धतीनं पाळकऱ्यांनी अनेक वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. पण नंतर हक्क सांगायला सुरुवात केल्यानं भांडणं सुरू झाली. पाळकऱ्यांना उत्पन्न घेण्याचा अधिकार असला तरी मूळ मूर्तीला हात लावण्याचा अधिकार नव्हता, तर तो कदमांनाच होता. त्यामुळं पाळकर कोर्टात गेले. त्यानंतर त्यांना मूर्तीला हात लावण्याचा अधिकार आला. शिवाय त्यांचे हिस्सेही कोर्टानं ठरवून दिले.
मूळ पाळकऱ्यांच्या व्यतिरिक्त वाकोजीबुवा इत्यादी महंतही मानकरी होते. विशेष म्हणजे, वाकोजीबुवा महंतांची गादी तर अविवाहिताची आहे. त्यामुळं दत्तक घेऊनच त्यांचा उत्तराधिकारी ठरतो.

 

नेपाळमध्येही मंदिर...
श्रीतुळजाभवानीची मंदिरं नेपाळमधील काठमांडू आणि भाटगांव (सध्याचे भक्तपूर) इथंही आहेत. ज्येष्ठ समीक्षक, संशोधक व साहित्यिक डॉ. रा. चि. ढेरे यांच्या श्रीतुळजाभवानी या अभ्यासग्रंथात त्याचा उल्लेख आहे. मिथिलेचा राजा हरिसिंहदेव यांनी इ.स. १३२४ ते मध्ये उभारले. कर्नारवंशीय हरिसिंहाची कुलस्वामिनी तुळजाभवानी होती. तिच्या दृष्टांतानुसार तो नेपाळमध्ये गेला. देवीचं मंदिर प्रथम भाटगांव (भक्तपूर) इथं उभारलं. नेपाळमधील कर्नारवंशीय राजघराण्याची सत्ता संपल्यावर मल्ल, गोरख या पुढच्या राजवंशीयांनीही श्रीतुळजाभवानीचा स्वीकार कुलस्वामिनी म्हणूनच केला. त्यानुसार भक्तपूर, काठमांडू आणि देवपारण येथील तिची ठाणी या राजकुलांच्या श्रद्धेचा विषय होती.

 

bhavani7अशी आहे मूर्ती...
धाकटय़ा तुळजापूरचा एक शेतकरी रामा विठोबा माळी यांच्या शेतात त्याचा नोकर अलाउद्दीन शेख नांगरत असताना सायंकाळच्या वेळी नांगर शेतात जागेवरच रुतला. त्यामुळे नोकरानं तो रुतलेला फाळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला एक दगडी शिळा दिसली. प्रत्यक्षात ती महिषासुरमर्दनिी श्रीतुळजाभवानीची मूर्ती होती. तो दिवस शके व १८६१चा माघ कृष्ण पक्ष ७ गुरुवार होता. म्हणजे इ.स. १९३९. ही मूर्ती अष्टभुजा असून एका अखंड शिळेवर कोरलेली आहे. साधारणपणे ३ फूट उंचीच्या या मूर्तीच्या पायथ्याच्या खालील बाजूला एक कणीस कोरलेलं आहे. मूर्तीच्या उजवीकडं सूर्य व डावीकडं चंद्र कोरलेला आहे. मस्तकावर शंकराची पिंड व देवीच्या मुकुटावर नरसिंहमुखी शिल्प आहे. मूर्तीच्या कानातील व नाकातील नथ घालण्यासाठी योग्य त्या ठिकाणी मूळचेच छिद्र आहे. गळ्यात पाच प्रकारचे तत्कालीन दागिने कोरलेले आहेत. मूर्तीच्या पायावर व आठही हातांवर नक्षीदार दागिने कोरलेले असून उजव्या बाजूला मार्कंडेय ऋषी हात जोडून उभे आहेत, तर डाव्या बाजूला महिषासुराच्या (रेडय़ाच्या) मुखाखाली एक शिर दिसतं. देवी महिषासुराच्या (रेडय़ाचा) पाठीत त्रिशूल खुपसून वध करीत असून उजव्या चार हातांत तलवार, बाण, चक्र व त्रिशूल तर डाव्या हातांत शंख, धनुष्य, ढाल व परडी किंवा दानपत्र आहे. तिच्या पायथ्याशी जो शिलालेख कोरलेला आहे त्यात ‘चंद्रात्र गोत्रि हरि गोविंद माहाजन आधीस्टा १८’ असे शब्द आहेत. या शिलालेखाच्या डाव्या व उजव्या बाजूला सिंह कोरलेले आहेत.

 

छत्रपती शिवरायांची कुलस्वामीनी...
भवानीमाता ही शिवरायांची कुलस्वामीनी. महाराजांवर ज्या, ज्या वेळी संकट आलं त्या, त्या वेळी आई भवानी धावून गेली. आई भवानीच्या आर्शीवार्दानंच स्वराज्याची स्थापना झाली, अशी शिवरायांची श्रद्धा होती. अफझलखानानं स्वारी केली त्यावेळी त्यानं मंदिरांचा आणि मूर्तींचा नाश केला. मात्र, देवीची मूर्ती कदम पुजाऱ्यांनी लपवून ठेवली आणि दुसरी दुय्यम मूर्ती पुढं केली. ती दुय्यम मूर्ती अफझलखानानं खंडीत केली आणि मूळ मूर्ती वाचली. तेव्हापासून कर्दम ऋषी आणि अनुभूतीचे वंशज असलेल्या कदम पुजाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सनद दिली. देवीला राजेंनी राज्याभिषेका अगोदर अमूल्य दागिने, जड जवाहीर व दहा हजार होण खर्च लागू केला. पुढं छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक झाल्यावर सोन्या-चांदीचे शिक्के मंदिराच्या गाभार्यात ठोकले व दर महा १०००० होण खर्च दिला.

 

तुळजापूरचे भोपी...
तुळजापूरच्या पुजाऱ्यांना भोपी म्हणतात. आपल्या घराण्यातील कोणतीही व्यक्ती एकदा तुळजापूरला येऊन गेलेली असेल तर त्याची संपूर्ण माहिती म्हणजे वंशावळ या भोप्यांच्या चोपडीत लिहिलेली असे. ते सगळे एकमेकांशी संगनमत करून ज्याच्याचोपडीत त्या यात्रेकरूचे नाव असेल त्या भोप्याकडे वा पुजारी ब्राह्मण असल्यास त्याच्याकडे त्या यात्रेकरूला हवाली करत. त्यानंतर ते यात्रेकरू त्या पुजाऱ्याकडे, त्यांच्या मोठमोठय़ा वाडय़ात राहणे, पूजा, अभिषेक, भोजन याच्या व्यवस्थेसाठी उतरत. त्यातही ज्यांची नावे कोणत्याच चोपडीत नसतील त्यांना ‘खंडून’ म्हणत. अशांचा लिलाव पुजाऱ्यात आपसात करून त्यात जादा बोली देणाऱ्याकडे त्या यात्रेकरूला स्वाधीन केले जाई व नंतर तो त्याचा कायम यात्रेकरू असे. या चोपडय़ा आधी मोडी भाषेत होत्या. काही जणांनी त्या नंतर मराठीत केल्या. आता तर त्यातही आधुनिकता आली. आता ही नावे कॉम्प्युटरवर फीड केली जातात.

 

मराठा पुजारी...
इथं पुजारी मराठा समाजाचेच असल्याने त्यांच्याच चालीरीतीचा प्रभाव आहे. इतरांनाही तेवढंच स्थान आहे. ब्राह्मण पुजारी नसल्यामुळं देवळात ब्राह्मणी पद्धतीचं सोवळंओवळं नाही, हेही या देवळाचं वेगळेपण आहे. याशिवाय तुळजापूरातील रोटीबोटी व्यवहार गावातल्या गावातच होतो. त्यामुळं कुठल्याही पुजाऱ्याकडं जेवलात तरी तुम्हाला चवं एकचं मिळेल. हेदेखील इथलं वैशिष्ट्य. देवीसाठी जो नवैद्य भोपी करतात त्यात देवीसाठी पुरणपोळी, दूध आणि तिने वध केलेल्या महिषासुरासाठी मटण व दारूचा नवेद्य थेट देवीपर्यंत नेण्याची व दाखविण्याची प्रथा आहे. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी ही पद्धत नसावी, असं मानलं जातं. कारण तसे संदर्भ सापडत नाहीत. ज्या महिषासुराचा वध देवीने केला म्हणून तिचे नाव महिषासुरमर्दनिी आहे, त्या दैत्यालाही नवेद्य दाखवला जातो, हे अजबच म्हणायला हवं.

 

gondhal2आईचा गोंधळ...
इथं कवडय़ांच्या माळा घालणं, बांगडय़ा भरणं, जोगवा मागणं, दिवटीला तेल घालणं याही प्रथा आहेत. याशिवाय तुळजाभवानी ही अनेकांची कुलदेवता असल्यानं गोंधळ हे इथलं खास वैशिष्ट्य. गोंधळी गीतं, त्यातील गण, गौळण हे सगळं लोकसाहित्याचा एक आगळावेगळा प्रकारच आहे. गोंधळाच्या पूर्वरंगात गण, गवळण, आवाहन व नमन असतं तर उत्तररंगात आवाहन, गायन, सादरीकरण, आरती व भार उचलणं हे प्रकार असतात. श्रीगणेशाच्या स्तवनानंतर विविध देवतांना आवाहन केल्यानंतर सुरू झालेला गोंधळ आरतीने समाप्त होतो. गोंधळ सुरू करण्यापूर्वी देवीची परडी भरण्याची पद्धत आहे. यामध्ये देवीच्या परडीत मीठ, पीठ, तेल इत्यादी घालून सवाष्ण स्त्रीच्या हस्ते पूजा केली जाते.

 

नवरात्रापूर्वीचा 'दसरा'...
नवरात्रीचे दहा दिवस पायात वहाण न घालता, अनवाणी चालण्याचा नवस करणारेही खूप असतात. नवरात्रात तुळजापूरमध्येच नव्हे तर आजही जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी लोक गादी वापरत नाहीत. शिवाय ज्या ज्या वेळी देवीची शयननिद्रा असते त्या काळातही गादी वापरली जात नाही. घराघरांत या नवरात्रापूर्वी ‘दसरा काढण्याचा’ प्रकार असतो. पूर्वीच्या काळात एकतर मातीची घरं असत, फरशी नसे व घरातही फारसा उजेड नसे. धूळ भरपूर असल्यानं साहजिकच ती घरात कपडय़ांवरही साचत असे. त्यामुळे वर्षांत एकदा तरी सगळे कपडे, भांडीकुंडी स्वच्छ धुऊन ठेवण्याची प्रथा असावी. त्यानिमित्त दसरा काढण्याची पद्धत सुरू झाली असावी, असं मानलं जातं.

 

अजाबळीची नवरात्र...
नवरात्रीत देवीला अजाबळी म्हणून बकरं कापलं जातं. बकरं देण्याचा मान सिंदफळच्या एका गृहस्थाचा असतो. वर्षभर त्यांनी सांभाळलेले बकरं अजाबळीच्या दिवशी वाजतगाजत मंदिरात आणलं जातं व रीतसर पूजेनंतर ते कापलं जातं. केवळ अजाबळीच्याच बकऱ्याचं हे विशेष नाही, कोणताही बळीचा बकरा कापण्यासाठी एक विशिष्ट पद्धत इथं अवलंबली जाते. त्यानुसार इतर वेळीदेखील बकऱ्याचा जो नवेद्य असतो ते बकरे कापण्यापूर्वी त्याची ‘झडती देणे’ महत्त्वाचे आहे. बळी दिल्या जाणाऱ्या बकऱ्याची परवानगी मागण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकलं जातं. त्यानंतर त्या बकऱ्यानं पूर्ण अंग जर झटकलं तरच त्यानं ‘झडती’ म्हणजे परवानगी दिली, असं समजून ते कापले जाते. त्याने जर ही झडती दिली नाही तर लोक असं बकरं परत देऊन दुसरं बदलून आणतात.
...तर शौर्य, शक्ती प्रदान करणाऱ्या या जगदंबेचे आशीर्वाद घेण्यासाठी नवरात्रीत तुळजापूरात तुडुंब गर्दी झालीय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.