टॉप न्यूज

सह्याद्रीच्या सातमाळेतील महिषासुरमर्दिनी

ब्युरो रिपोर्ट, नाशिक
नाशिकजवळील वणीची देवी म्हणजे सप्तश्रृंगी माता हे राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक अर्धपीठ. भूतलावर श्री. जगदंबेची ५१ शक्तीपीठं आहेत. या शक्तीपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचं त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपिणी धर्मपीठ ओंकार स्वरुप आधिष्ठीत असून ते म्हणज़े सप्तश्रृंगी देवी होय. महिषासुराचा वध करुन आदिमाया पार्वती विश्रांतीसाठी या सप्तश्रृंगी गडावर आली. सह्याद्रीच्या सातमाळेच्या पर्वतरांगेमुळं या तीर्थस्थानाला भव्यदिव्यता प्राप्त झालीय. त्यामुळंच देदिप्यमान सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेताना अंत:करणही विशाल होऊन जातं.
 

 

vani2सप्तश्रृंगी गड...

नाशिकच्या उत्तरेस सह्यादीच्या सातमाळा डोंगराच्या रांगेत हा गड आहे. या गडाला सात शिखरं असल्यामुळं त्याला सप्तश्रृंग म्हणतात. या डोंगराच्या सात शिखरांवर इंदायणी, कातिर्की, शिवा, चामुंडा, वैष्णवी, वाराही आणि नरसिंही या सात देवता वास्तव्य करतात. देवीच्या समोरील डोंगराला मार्कंडेयाचा डोंगर म्हणतात. नाशिकपासून ५८ किलोमीटरवर गडाच्या पायथ्याला हे गाव आहे. गड चढून मध्यसपाटीवर पोहचलं की सप्तश्रृंग हा हजाराहून अधिक लोकवस्तीचा गाव लागतो. येथून देवीपर्यंत जाण्यास ४७२ पायऱ्यांचा टप्पा चढून जावं लागतं.

 

 गड महात्म...

 सप्तश्रृंगीचं पुराण काळापासुन असलेलं महात्म्य लक्षात घेता या देवीची स्वयंभू अशी मूर्ती असून नवनाथ सांप्रदायातून नाथापासूनचा कालावधी स्पष्टपणे सांगता येतो. 'साबरी कवित्व' अर्थात 'मंत्र शक्ती' ही देवी सप्तश्रृंगीच्या आशीर्वादानं नाथांना प्राप्त झाली. उत्तरोत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर , पेशवे सरकार, दाभाडे, विंचुरकर, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी अगदी जवळचा संबंध होता असं दिसून येतं.

 

vani..अशी आहे सप्तश्रृंगींची मूर्ती!
पर्वतशिखराच्या मधोमध गुहाकृती अशी सुमारे 20 फुट उंचीची कपार असून त्या महिरपात श्री सप्तश्रृंगी देवीची आठ फूट उंच पूर्वाभिमुखी मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती अतिशय भव्य आणि शेंदूरचर्चित रक्कवर्णी आहे. देवीची पूजा शिडी लावूनच करावी लागते. या देवीला अठरा हात असून प्रत्येक हातात एक आयुध आहे. उजव्या बाजूला खालून वरती माणिकमाळा, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड आहे. डाव्या बाजूला वरुन खाली शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू, आहेत. या देवीला अष्टदशभुजा महालक्ष्मी समजलं जातं. सकाळी ता बाला, दुपारी तरुणी, सुर्यास्तकाळी वृद्धारुप स्वरुपात भासते. देवीनं महिषासुराचा वध केल्यामुळं तिला महिषासुरमर्दिनी असं म्हणताता. प्रतिदिनी देवीवर अभिषेक केल्यानंतर तिला नखशिखान्त शेंदूर फासण्यात येतो. पापण्या व भुवया रंगानं कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावण्यात येतं. हे कुंकू दरदिवशी निराळ्या रंगाचं असतं त्यानंतर तिला वस्त्रालंकारांनी सजविण्यात येतं. देवीला रोज महानेवैद्य असतो. मंदिरातीला नंदादिप सतत तेवत असतो. मंदिरात त्रिकाल आरती होते.गडावरील कुंडं

VANI1) कालीकुंड व सूर्यकुंड

पूर्वी सप्‍तश्रृंग गडावर 108 कुंडं असल्‍याचा उल्‍लेख आहे. सध्‍या प्रत्‍याक्षात 10 ते 15 कुंडं दिसतात. बाकीची कुंडं बुजली असावीत. गडावरून पूर्व दिशेनं गेलं की मारूतीचं मंदिर व थोडं पुढं गेलं की दाजीबा महाराजांची समाधी आहे. या समाधीपासून जवळ्च सूर्यकुंड व कालीकुंड लागतात. ही दोन कुंडं पेशवेंचे सरदार छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडाचा पाण्‍याचा वापर श्री. भगवतीच्‍या दैनंदीन स्‍नानासाठी केला जातो.

 

2) जलगुंफा
या नावानं एक तीर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पोखरणी देवीच्‍या पायापासुन उगम पावली. तिथं भयंकर अंधार असल्‍यामुळं पाण्‍याचा किती थांग आहे, हे सांगता येत नाही, असं सांगितलं जातं. पोखरणीचं मुख पुर्वेकडं असल्‍यामुळं सकाळच्या सूयकिरणांनी अधुंक उजेड पडतो. तीर्थावरील पाणी बफासारखं थंड आहे. तसेच यात तीन डोळयांचा मासा असून त्याच्या स्पर्शानं लोखंडाचं सुवर्ण होतं, असं सांगितलं जातं. या पर्वतावर आणखी एक विचित्र वृक्ष आहे. त्याची पानं काशाच्या स्पर्शानं मृतीकामय होतात. तिचं पाणी पाच प्रहरापर्यंत ठेऊन अग्नीचा स्पर्श केला म्हणजे त्याचं रोप बनतं, असंही सांगितलं जातं. जलगुंफेतील या तीर्थास मछतीर्थ असंही म्हणतात.

 

३) शिवतीर्थ
सप्‍तश्रृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नामक एक पुण्यकारक तीर्थ आहे. हेच ते गिरीजातीर्थ व शिवतीर्थ होय. पूर्वी याचं बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं. परंतु त्याची पडझड झाल्यानं ट्रस्टनं त्याचा नुकताच जिर्णोध्दार केला असून तेथे स्नानाबरोबरच वस्त्रांतर गृहाची व्यवस्था केली आहे. या कुंडात स्नान केल्यास विविध तापापासून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. या तीर्थात सर्व देवांनी स्नान करुन जो कोणी पिंड श्राध्द करील तो पितरासहित जगदंबा स्वरुपास प्राप्त होईल, असा वर दिलाय. तीर्थाजवळ आणखी एक हेमाडपंथी सिध्देश्वर मंदिर आहे. जवळच एक मारुतीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता. मल्लखांबाचे मुळ स्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरु बाळंभट दादा देवधर यांना श्री मारुतीनं या विद्येचे इथंच धडे दिले व इथूनच मल्लखांब विद्या पुढे सुरु झाल्याची उदाहरणे सापडतात.

 

vani4 re४) तांबुलतीर्थ
सप्‍तश्रृंग देवीच्या मागील बाजूला थोडं उत्तरेकडं एक अष्टकोनी कुंड आहे. या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकल्यामुळे पाणी व जमिनीचा काही भाग तांबड्या रंगाचा झाला. त्यामुळं या तीर्थाला तांबूल तीर्थ असं म्हणतात. तसंच एक काजल तीर्थ आहे. देवीनं काजळ घातलेले डोळे इथं धुतले म्हणूण यास काजळ तीर्थ म्हणतात. याचं पाणी काळं आहे. शिवालया तलावाच्या पश्चिमेस गंगा यमुना नावाची दोन कुंडं शेजारी-शेजारी आहेत. यमुना कुंडाचं पाणी काळंभोर व रुचकर आहे. या कुंडापासून थोडं दक्षिणेस गेल्यास पूर्वाभिमुख गणपती मंदिर आहे. पूर्वी वणीकडून गडावर येण्यासाठी याच दगडी पाय-यांच्या मार्गानं गडावर येऊन गणेश मंदिराजवळ विश्रांतीसाठी थांबत असत. इथं पण दगडाचा कोरीव कोरलेलं पाण्याचं तळं असून त्याचा वापर पिण्यासाठी केला जातो.

 

मार्कंण्डेय दर्शन
सप्‍तश्रृंग परिसर अनेक पवित्र ठिकाणांनी पवित्र झालाय. त्यात मार्कंण्डेय ऋषिंचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्‍तश्रृंगीचं मुख पूर्वेकडं आहे. तेंव्हा समोरील मार्कंण्डेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंण्डेय भृगृ वंशातील त्रेता युगात झाले. प्रारंभी ते अल्पायुशी होते, परंतु सप्तर्षींच्या आशीर्वादानं दिर्घायु झाले. धर्मराज वनवासात असताना मार्कंण्डेय ऋषींनी त्याला अनेक वृतांत कथन केले. कल्पातीच्या वटवृक्षाचं व प्रलयाचं दर्शन मार्कंण्डेय ऋषींना झालं होतं. वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दिर्घायुष्य प्राप्तीसाठी जी शांती करतात तिच्यात प्रमुख देवता मार्कंण्डेय हीच असते. याच गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाची कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. मार्कंण्डेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवात श्रेष्ठ ठरले.

 vani3

 

शितकडा
याला सतीचा कडा असंही म्हणतात. शिवालय तीर्थापासून थोडयाच अंतरावर शितकडा नावाची दरी आहे. ही दरी सुमारे १२०० फूट खोल असून हा कडा खूप ऊंच व सरळ आहे. या कड्याचा वापर बलिदानासाठी उपयोगी होईल. गडावर काही संकट आल्यास काही होऊ नये म्हणूण तेथे पशू बळी देण्याची पध्दत होती. याला भाग देणं असं म्हणत. तसंच देवीची कृपा व्हावी म्हणूण या कडयावरुन लोटून बळी दिला जाई. या कड्याबद्दल एक विचित्र अख्यायिका आहे. फार फार वर्षापूर्वी एका बाईनं नवस केला होता की, तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह सप्‍तश्रृंग गड चढून येणार होती व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करुन बैलगाडीतून शितकडा उतरणार होती. शितकडा म्हणजे कुठलीही वस्तू कडयावरुन खाली टाकली तर तिचे भाताच्या शिता सारखे तुकडे तुकडे होणे. देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला. नवस फेडण्यासाठी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत बसली. आपल्या नव-याला तिनं गाडी शितकडयावरुन नेण्यास सांगून मी केलेला नवस फेडावयाचा आहे, असं सांगितलं. तिचा नवरा तयार होईना. शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालविण्यास तयार झाला. सर्वांनी देवीची करुणा भाकली. घरगडी, बैलगाडी, बाई व मुलगा कडयावरुन सुखरुप खाली उतरले. हा भयास नवस देवीनं बाईकडून फेडून घेतला. आजही शितकडयावर गाडीच्या चाकोऱ्या दिसतात. या कडयाच्या वरच्या बाजूस वा-याचा झोत मोठा असतो. सध्या येथे कड्याचा वरील भाग कुंपन घालून सुरक्षित केलेला आहे. हा कडा पवित्र समजून लोक दर्शन घेतात.

पुराणकाळापासून महत्त्व असणारं हे महिषासुरमर्दिनीचं ठाणं दरवर्षीप्रमाणं यंदाही नवरात्रीत देशभरातील भाविकांनी फुलून गेलंय.

 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.