टॉप न्यूज

अंतिम महायात्रेला होता लाखोंचा जनसागर

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
17 नोव्हेंबर 2012. वेळ दुपारची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची बातमी आली आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. राज्यभरातील शिवसैनिक आणि त्यांचे चाहते यांनी मिळेल ती गाडी पकडून मुंबईत धाव घेतली. या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देताना मुंबई सुन्न झाली होती आणि सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांच्या अंतिम महायात्रेची ही एक आठवण...!
 

म-हाटी मुलुखाला आत्मभान देणा-या, मराठी माणसाला आत्मविश्वास देणा-या महानेत्याची, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'महायात्रा' सुरू झाली आणि अवघा मराठी माणूस गलबलून गेला. बाळासाहेबांचं पार्थीव मातोश्रीबाहेर आणण्यात आलं आणि तिरंग्यामध्ये लपेटण्यात आलं. पोलिसांनी मानवंदना दिली. त्यानंतर बाळासाहेबांचं पार्थीव सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आलं. त्यावेळी 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे'च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. बाळासाहेबांच्या पार्थीवासोबत, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, नातलग आणि निकटवर्तीय होते. शिवसेनाप्रमुखांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिकांची मुंबईत दाखल झाले होते. महायात्रेच्या प्रवासात तब्बल 19 लाखांचा जनसागर उसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. संपूर्ण मुंबई बंद होती. महाराष्ट्रात उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला होता.

5मातोश्रीवर गर्दी करू नका, बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल व्हा, असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं होतं. पण बाळासाहेबांच्या आठवणींनी उचंबळलेल्या शिवसैनिकांनी न राहवून मातोश्रीवर धाव घेतली. मातोश्रीबाहेरचा गहिवरलेला जनसागर महायात्रेत सामील झाला. त्यात हमसून हमसून रडणारे कट्टर शिवसैनिक होते. महिला होत्या, होती, वृद्ध बुजुर्ग माणसं होती. बाळासाहेब अमर रहे....याशिवाय दुसरा आवाजाच नव्हता. 

 

19 लाखांचा जनसमुदाय

पोलिसांच्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि देशभरातून आलेले शिवसैनिक आणि सामान्य नागरिक मिळून तब्बल 19 लाखांचा जनसमुदाय अंतिम महायात्रेसाठी आला होता. 'जय भवानी, जय शिवाजी', 'बाळासाहेब ठाकरे अमर रहे', 'आवाज कुणाचा' अशा घोषणा देत, दु:ख सावरत महायात्रा जसजशी पुढं सरकत होती, तसतशी गर्दीचा पूर वाढतच होता. रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तिथं नागरिक दाटीवाटीनं साहेबांना शेवटचं डोळे भरून पाहण्यासाठी उभे राहिल्याचं दृश्य पहायला मिळत होतं. संपूर्ण महायात्रेच्या मार्गावर मुंगी शिरायलाही जागा नव्हती, अशी न भुतो, न भविष्यती गर्दी झाली होती. 

महायात्रेला लोटलेल्या गर्दीनं पोलिसांचेही अंदाज साफ चुकवले. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला १० लाख लोक येतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल १९ लाखांचा समुदाय लोटला. एक नेता, एक पक्ष तब्बल 47 वर्षे... बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना..! असा विक्रम असणाऱ्या शिवाजीपार्कवरचं अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.