''आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नान जे करिती।।...''
असा सोहळा सुरु आहे, भूलोकीच्या वैकुंठात, पंढरपुरात! सारी पंढरी विठ्ठलाच्या नामघोषानं दुमदुमून गेलीय. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा मध्यरात्री पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते झाली. विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव तसेच राज्यावर दुष्काळ-भूकंप असे कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे आपण विठ्ठल चरणी घातल्याचे सोपल यांनी सांगितले. वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान यंदा मिरज तालुक्यातील एरंडोली येथील वारकरी तुकाराम हरी पाटील (वय 64) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (वय 55) यांना मिळाला. त्यांना मंदिर समितीच्या वतीने संपूर्ण वर्षभरासाठीचा मोफत प्रवासाचा पास मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. डांगे यांच्या हस्ते देण्यात आला.
...तुझा विसर न व्हावा!
मागच्या कार्तिक एकादशीला अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला होता. त्यामुळं 'बा-विठ्ठला दुष्काळ हटू दे...' असंच साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं होत. यंदा उत्तम पाऊसकाळ झाल्यानं पीकपाणी झोकात आहे. साहजिकचं विठोबाच्या पायावर डोकं ठेवताना 'हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा' एवढंच मागणं मागून भक्तगण मोठ्या आनंदानं घराकडं परतायत. निवडणुका जवळ आल्यानं यावेळी गर्दीतील राजकारण्यांची उपस्थितीही ठळकपणे जाणवतेय.
चार लाख वारकऱ्यांनी केलं चंद्रभागेत स्नान
एकादशीचं श्री विठ्ठल दर्शन आणि चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी दोन दिवसांपासूनच भाविक पंढरीत मोठ्या संख्येनं दाखल झालेत. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या विविध संतांच्या पायी दिंड्या दाखल झाल्यानंतर तर पंढरीतील रस्तेही विठ्ठलमय झालेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाळवंट, मंदिर परिसर, शिवाजी चौक, बस स्थानक आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. चंद्रभागेचं वाळवंट लाखो वारकऱ्यांच्या, दिंड्या पताकांच्या आणि हरिनामाच्या जगरानं दुमदुमुन गेलंय. कार्तिकी एकादशीच्या भल्या पहाटे गुलाबी थंडीत चार लाखांहून अधिक वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नान केले. पहाटे चारपासून स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. स्नान आटोपून काही भाविक नगरप्रदक्षिणा करण्यासाठी जात होते तर काहीजण नामदेव पायरीचे दर्शन घेवून आपली वारी पोहोचती करत होते. चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांनी टाकलेल्या राहुट्यांमधून भजन, कीर्तन, भारुडाचे फड रंगल्याचं दृश्य पहायला मिळतंय.
उमद्या जातीवंत जनावरांचा बाजार
कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्तानं पंढरीत दरवर्षी परंपरागत जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. या बाजारात सर्वाधिक आकर्षण असतं ते घोडे बाजारातील उमदे घोडे आणि जातीवंत खिलारं बैल. करोडो रुपयांची उलाढाल होणारा हा जनावरांचा बाजार आणि प्रदर्शन बाजार समितीच्या बाजार तळावर भरविण्यात आलंय. त्याचं उद्घाटन मंगळवारी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते आणि सोलापूर डीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन बबनराव अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आता बक्षीस वितरण समारंभ १४ नोव्हेंबरला होणार आहे.
महापूजेला अजित पवार मुकले...
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, असा दंडक आहे. परंतु, काही वारकरी संघटना आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळं अजित पवार यांनी पंढरपुरला न येणंच पसंद केल्याची चर्चा आहे. ठरल्याप्रमाणं अजित पवार हे शासकीय पूजेसाठी पंढरपूरमध्ये येणार होते. मात्र, गो-हत्या प्रतिबंधक कायदा मंजूर होण्यास विलंब होत असल्यानं हा कायदा संमत होत नाही तोपर्यंत पंढरपूरमध्ये शासकीय पूजा होऊ देणार नाही, असा इशारा वारकरी नेते बंडा तात्या कराडकर यांनी दिला. तर शिवराळ भाषा वापरुन अजित पवार यांनी शेतक-यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही शासकीय पूजेला विरोध दर्शवला होता. त्यामुळंच अखेर पंढरपुरात न येण्याचा निर्णय पवार यांनी घेतल्याचं बोललं जातं. परंतु महत्त्वाच्या कामासाठी ते दिल्लीत जात असल्यानं महापूजेला उपस्थित राहिले नाहीत, असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिलाय.
Comments
- No comments found