टॉप न्यूज

नव्या पिढीचं, नवीन माध्यम झालं वर्षाचं!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
भारत आणि इंडिया यांच्यातील दरी कमी होऊन त्यांच्यात संवाद, सहकार्य आणि सन्मान प्रस्थापित व्हावा, या उद्देशानं सुरू झालेल्या 'भारत4इंडिया'नं (14 नोव्हेंबर) एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. हे आमच्यासाठी मिशन असून त्यासाठी नव्या दमानं आणि उत्साहानं आम्ही सज्ज आहोत. गेल्या वर्षभरात डोंगराएवढ्या अडचणी आल्या. परंतु त्यामुळं खचून न जाता आम्ही झुंजलो. ही झुंज अजून सुरुच आहे. त्यातूनच आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर हे नव्या पिढीचं नवीन माध्यम झोकात सुरु राहील, हा आत्मविश्वास आलाय.
 

 

'भारत4इंडिया'ला वर्ष झालं... 

नजिकच्या काळात वेबची दुनिया जगभरातील मीडियाचं एकूणच रंगरुप पालटून टाकणार, याची जाणीव झाली. त्यामध्ये मराठी पाऊल मागं असता उपयोगाचं नाही. याशिवाय आतापर्यंतच्या प्रवासात करायला हवं, असं वाटत असूनही जे हातून निसटलं, अशा गोष्टी करण्यासाठी एक सशक्त माध्यम म्हणून बरोबर वर्षापूर्वी म्हणजेच 14 नोव्हेंबर 2012 रोजी 'भारत4इंडिया' सुरु झालं.

 


logoमराठी भाषेतील पहिलं न्यूज पोर्टल...
'भारत4इंडिया' हे आपल्या देशातलं मराठी भाषेतील पहिलं न्यूज पोर्टल. आपला देश एका दिशेनं 'ग्लोबल' झालाय आणि दुस-या दिशेनं आपण आपल्याच देशातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांकडं, घडामोडींकडं, वंचितांकडं पाठ करून उभे आहोत. एकीकडं 'भारत' आणि दुसरीकडं 'इंडिया' अशी ही अवस्था आहे. या दोन्ही गोष्टी वर्तमानातलं वास्तव आहेत. आपण सगळेच याकडं हतबल होऊन पाहू शकत नाहीत. माध्यमांची ताकद भारतामागं समर्थपणे उभी राहायला हवी. तसंच सामान्य शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या शोषण व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षाचं माध्यम, अशी ओळख घेऊन आम्ही 'भारत4इंडिया'ला घेऊन समाजसमोर गेलो. बोले तैसा चाले, याची प्रचिती आल्यानं वर्षभरातचं भारतीयांचा आणि इंडियन नागरिकांचाही त्याला चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळंच आज माध्यमांच्या दुनियेत दखलपात्र मीडिया म्हणून 'भारत4इंडिया' मानानं उभा राहिलाय.

 

हे तर मिशन...
इंटरनेटमुळं झालेल्या बदलांचा परिणाम माध्यमांवरही झालाय. पेपर, टीव्ही ही माध्यमं बदलली....नव्हे इंटरनेटनं त्यांना बदलायला भाग पाडलं. नवीन ऑनलाईन मीडिया जन्माला आला. 'भारत4इंडिया' हा त्यापैकीच एक ऑनलाईन मीडिया. पण, जगावेगळा. टीव्ही आणि पेपर यांचा सुंदर मिलाफ असलेलं हे मराठी भाषेतलं पहिलं न्यूजपोर्टल. इथं तुम्ही चित्रफीत पाहू शकता आणि भरभरुन वाचूही शकता. त्यावरंच तुमचं मतदेखील तत्काळ नोंदवू शकता. हो आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे...आजचा पेपर ही उद्याची रद्दी तर टीव्हीवर जे दिसतं ते पुढच्या क्षणाला नाहीसं होतं. 'भारत4इंडिया'चं तसं नाही. इथं जे काही प्रसिद्ध होतं ते कायम राहातं. तुम्ही कधीही येऊन ते पाहू शकता, वाचू शकता. बदलणाऱ्या घटनांमध्ये त्याचा नवा अर्थ शोधून त्यावरचं तुमचं मत नोंदवू शकता.

 

झाला दखलपात्र मीडिया...
'भारत4इंडिया'चं वेगळेपण अगदी नावापासूनच सुरू होतं. भारत म्हणजे खेड्यांचा प्रदेश आणि इंडिया म्हणजे शहरी भाग. खेडी आणि शहरं यांना जोडणारा दुवा म्हणजे 'भारत4इंडिया'. आज पेपरात, टीव्हीत जे काही दिसतं ते सारं शहरी छापाचं. का वो... गावात, गावातल्या माणसात काय कमी असतं का? मग हे असं का? मॉलमध्ये काहीतरी चमकलं की सगळीकडं बातमी येते. गावकऱ्यांनी हिंमतीनं माळरानं फुलवली तरी कुणाच्या ते गावीही नसतं. बातम्या शोधण्यासाठी भटकायची आमची ठिकाणंही खेडीपाडी, शेतं आणि माळरानं! खेड्यापाड्यातील लोकं माळरान तुडवत जगतात, पण त्यांच्या जगण्यातही एक 'पॅशन' असते. ती शोधून आम्ही त्यांचं वेगळेपण जगाला दाखवतो. ग्रामीण शहाणपण, अनुभव, म्हणजेच 'रुरल टॅलंट'च्या गोष्टी तर पहिल्यांदा आम्हालाच कळतात. त्या आम्ही एवढ्या जोरकसपणे मांडतो की त्याचा आवाज इतर माध्यमांमध्येही जातो आणि त्यांच्याकडूनही त्याची दखल घेतली जाते.

 

Jagar Panyacha240x135जागर पाण्याचा...
नुकताच संपलेल्या दुष्काळाची ज्यावेळी चाहूल लागली त्यावेळी पाण्यासाठी होणारी पायपीट, गावात टॅंकरभोवती गर्दी करुनही मोकळ्या राहणाऱ्या घागरी, जळालेल्या फळबागा, उभी पीकं, पाण्यासाठी पशुपक्ष्यांची होणारी तडफड, हे सारं माध्यमात येऊ लागलं. त्यावेळी आम्ही नियोजनपूर्वक काबाडकष्ट करुन पाणी राखल्यानं दुष्काळातही ज्यांची तहान विनासायास भागतेय, पीकं बहरलीत, अशा लोकांच्या, गावांच्या, संस्थांच्या बातम्या देऊन पाण्याचा जागर घालायला सुरवात केली. आम्ही एवढ्यावरंच थांबलो नाही तर दुष्काळ ही आपत्ती न समजता इष्टापत्ती समजा आणि तुम्हीपण पाण्याचा जागर घालायला सुरवात करा, असं आवाहन केलं. या 'जागर पाण्याचा' उपक्रमाला शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीकडच्या लोकांचा तुडूंब प्रतिसाद मिळाला. 'भारत4इंडिया'वर आलेल्या अशा बऱ्याच सकारात्मक बातम्यांचा फॅालोअप माध्यमांना घ्यावा लागला.

 

shantabai1सोशल मीडियावर वरचष्मा...
ज्यांना कसलाच चेहरा नव्हता त्यांना 'भारत4इंडिया'नं चेहरा दिला. आमच्या न्यूज पोर्टलवर आलेल्या कितीतरी बातम्या फेसबुकसारख्या सोशल मीडियातून सर्वात जास्त शेअर केल्या गेल्या. आता 'हाती पाळण्याची दोरी अन् वस्तराही' हीच बातमी बघा ना! कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हासूर सासगिरी या लहानशा गावातील शांताबाई श्रीपती यादव. या 70 वर्षांच्या आजींचा नाभिकाचं काम करणारा नवरा भर तारुण्यात गेला आणि शांताबाईंच आभाळ फाटलं. पदरी चार पोरींना घेऊन संसार कसा करायचा, हा गहन प्रश्न त्यांच्यापुढं उभा राहिला. पण, ही माय डगमगली नाय. तिनं वस्तरा हाती घेतला आणि लोकांची केस दाढ्या करू लागली. सध्यादेखील महिला महिलांसाठी ब्युटी पार्लर चालवतात. पुरुषांसाठी नाही. या बाईनं 35 वर्षापूर्वीं वस्तारा हातात घेऊन दाढ्या करायला सुरवात केली. आम्ही तिची बातमी केली. तिला जगासमोर आणलं. अलिकडच्या काळात फेसबुकवर सर्वाधिक शेअऱ झालेला फोटो कोणता असेल तर तो 'भारत4इंडिया'वरच्या या शांताआजीचा. 'भारत4इंडिया'मुळं या मायला नुसताच चेहरा मिळालेला नाही तर जगण्यासाठी अंगी दहा हत्तींचं बळ प्राप्त झालंय.

 

अरे, ही तर बातमी...
जी बातमी नाही, असं आजपर्यंत वाटायचं ती केवढी मोठी बातमी आहे...हे 'भारत4इंडिया'नं दाखवून दिलं. ग्रामीण भागातील तसंच ग्रामीण भागाशी संबंधित कितीतरी गोष्टी आम्ही प्राधान्यानं मांडल्या.केवळ जांभळावर गावाचं अर्थकारण सांभाळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील बहाडोली गावची गोष्ट आम्ही 'बहाडोलीचं जांभूळ आख्यान' या नावानं प्रसिद्ध केली.मातीत राबणाऱ्या महिलांचं आतापर्यंत दुर्लक्षित झालेलं आभाळएवढं कर्तृत्व आम्ही ठळकपणे मांडलं. नवऱ्याच्या अकाली निधनानंतर पदर खोचून शेतात राबून फळबाग फुलविलेल्या वाशिम जिल्ह्यातील वनोजा इथल्या वैशाली राऊत यांची गोष्ट 'ती झालीय 60 लाखांची धनी' या शिर्षकाखाली आम्ही दिली. चिपळूणच्या प्रयोगशील शेतकरी ज्योती रावराणे यांनी अभिनव पद्धतीनं मिरचीची शेती केली. ती बातमी 'गुंठ्यात पिकली एक टन मिरची' या शिर्षकाखाली दिली. अशा अनेक बातम्या. जगण्याच्या लढाईसाठी जगावेगळा मार्ग अवलंबणाऱ्या राज्यभरातील महिला शोधून त्यांच्या बातम्या आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून दिल्या.

 

गावांचं आख्यानं...
मऱ्हाटी मुलखातील आगळंवेगळं काम केलेल्या गावाचं आख्यानं तर आमच्याएवढं कुणीच गायलं नाही. 'पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली', 'पंढरपूरची खरातवाडी बनली बोरवाडी', 'कासेगाव बनलं द्राक्षपंढरी', 'नेरपिंगळाईत भरलाय डिजिटल वर्ग', 'वेळास बनलं कासवांचं गाव', 'आमच्या गावात कोणतंही कलम मिळेल' , 'गावकऱ्यांनी उभारलंय बांबूचं बन' आदी स्पेशल रिपोर्टनी गावांचं आख्यानं सर्वदूर पोहोचवलं. म्हणजे अगदी सातासमुद्रापार.

 

ही काही वानगीदाखल उदाहरणं आहेत. याशिवाय शेतीतील सक्सेस स्टोरीज आहेतच. अगदी मेळघाटातील आदिवासी शेतकरी काय करतोय, विदर्भातील कपाशीच्या मुलखात द्राक्ष कशी पिकू लागलीत, आंब्याच्या एकाच झाडाल 52 जातीची कलमं कशी आलीत, कोकणात फाईव्ह स्टार भाज्या कशा पिकतायत, अशी अवघ्या मऱ्हाटी मुलखातील शेतीतील नवलाई आम्ही समाजासमोर मांडली. विशेष म्हणजे, या सर्वांचं लोकांनी जोरदार स्वागत केलं.

top breed photo
 हवाय ग्रामीण भागाचा विकास...

शेतातलं, गावातलं असं वेगळं चित्र जगासमोर मांडताना त्यांचा विकास कसा होईल, यासाठीही आम्ही कंबर कसतोय. 'टॉप ब्रीड' सारखा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. सध्याच्या हायब्रीडच्या जमान्यात जातीवंत पशुधन नष्ट होते की काय, अशी परिस्थिती आहे. सध्याच्या पिढीला पशुधन समजावं, त्यांचं संगोपन व्हावं आणि ही मराठी मातीची देन वाढावी, यासाठी 'टॉप ब्रीड' ही कामधेनूच्या लेकरांची अभिनव स्पर्धा आम्ही घेत असतो. अशाप्रकारे भारतातील उपयुक्त गोष्टींना इंडिया आणि जगभरात घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.

 

त्याच, त्याच बातम्यांनी कंटाळलेल्या सुजाण वाचक, प्रेक्षकांनाही आता 'भारत4इंडिया'चा हा वेगळेपणा भावतोय. बरंच काही असूनही चेहरा नसलेल्यांचा चेहरा, चेहरा असणाऱ्यांसमोर आणणं हेच आमचं ध्येय आहे. 'भारत4इंडिया'च्या बातम्या, उपक्रम, आदी सर्वांची मांडणी याच उद्देशानं आम्ही करीत असतो. त्यावर लोकांनी पसंतीची मोहोर उमटवलेलीच आहे. त्यामुळंच न्यूज पोर्टलच्या दुनियेतील मराठी भाषेतील हे पहिलं बाळ आता बाळसं धरु लागलंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.