टॉप न्यूज

बाळासाहेबांचा अखेरचा विसावा

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंतिम महायात्रा शिवसेनेची पवित्र वास्तू असणाऱ्या सेनाभवनाजवळ आली अन् लाखो शिवसैनिकांच्या मनाचा बांध फुटला... हीच ती वास्तू जिथं बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोपटं रुजवलं... हीच वास्तू जी शिवसेनेच्या अनेक चढउतारांची साक्षीदार बनली...हीच वास्तू जी तमाम मराठी माणसाच्या सुख-दु:खात सहभागी झाली...पाठीशी भक्कम पणानं उभी राहिली...तमाम मऱ्हाठी मुलुखाची आधारवड बनली...अशा या वास्तूत बाळासाहेबांचं पार्थीव आल्यानंतर क्षणभर ही वास्तूही गहिवरली..! आणि आता आपण पोरकं झाल्याची भावनेनं अंत्ययात्रेतला विराट जनसमुदाय व्याकुळ झाला...
 
 
 

मातोश्रीहून सुरू झालेली महायात्रा जसजशी पुढं सरकत होती तसतशी गर्दीच्या महासागराला भरती येत गेली.  दादरमध्ये महायात्रा आली त्यावेळी तर अक्षरश: गर्दीचा महापूर उचंबळला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीमधून बाळासाहेबांच्या पार्थिवावर भरल्या डोळ्यांनी फुलं उधळत होते.  'बाळासाहेब ठाकरे अमर रहे'.., 'कोण आला रे कोण आला...शिवसेनेचा देव आला' अशा घोषणा देत लाखो शिवसैनिक आपल्या दु:खाला मोकळी वाट करून देत होते. 

सेनाभवन ही शिवसेनेची केवळ एक वास्तू नाही. शिवसेनेची सारी व्युहरचना बाळासाहेबांनी इथूनच केली. सेनाभावनावरचे आदेश शिरसावंध्य मानून शिवसैनिक तळहातावर शीर घेऊन लढला.  सुरूवातीच्या काळात बाळासाहेबांचा सर्वाधिक राबता याच वास्तूत होता. त्यामुळंच सेनाभवन हा शिवसेनेचा चालता-बोलता इतिहास बनलाय. 

सुरूवातीला शिवरायांच्या अभेद्य गडासारखं रुप असलेल्या या वास्तूला नंतर कार्पोरेट लूक मिळाला. पण शिवसैनिकांच्या मनात या वास्तूबद्दलचा जिव्हाळा कायम राहिला. त्यामुळंच अंतिम महायात्रेच्या प्रवासातला बाळासाहेबांचा सेनाभवनातला हा घटकाभरचा विसावा उमाळ्यांचा बांध फोडणारा होता.  


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.