टॉप न्यूज

साहेबांनंतरचं वर्ष, आठवणींचा गलबला!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज (17 नोव्हेंबर) एक वर्ष झालं. बरोबर वर्षापूर्वी आजच्या दिवशी...'बाळासाहेबांशिवायचा महाराष्ट्र' ही कल्पनाही सहन होत नव्हती. त्या शोकाकुल वेदनेचा हुंकार अवघ्या मऱ्हाटी मुलूखातून बाहेर पडत होता. काळ कुणासाठी थांबत नाही. आता बाळासाहेब परत येणार नाहीत, हे वास्तव स्वीकारत त्यांच्या अफाट कर्तृत्वाची सावली अंगाखांद्यावर घेऊन महाराष्ट्र पुढं जातोय. नव्हे, त्याला तसंच पुढं जावं लागेल. त्यामुळंच त्यांच्या आजच्या प्रथम स्मृतीदिनी 'अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे' असा जयघोष शिवसैनिक करतोय. आम आदमीही आठवणींनी गलबलून गेलाय.
 

 

बाळ केशव ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजेच अवघ्या शिवसैनिकांचे आणि मऱ्हाटी मुलखाचे साहेब, हा जीवनप्रवास विलक्षण आहे. त्याचा लेखाजोखा लोकांसमोर आजही तेवढाच ताजातवाना आहे. साहेबांची प्रत्येक गोष्ट म्हणजे विराट आणि विशाल. त्याला त्यांची अंतिम महायात्राही अपवाद नव्हती. मुंबईतील तो शोकाकुल जनतेचा महासागर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे.

 

1अशी झाली अंतिम महायात्रा...
आठवतंय ते....बांद्र्याच्या मातोश्रीहून निघालेल्या या अंत्ययात्रेला पावलोपावली गर्दीचं भरतं येत होतं.
शिवसेनेची पवित्र वास्तू असणाऱ्या सेनाभवनाजवळ ही अंत्ययात्रा आली अन् लाखो शिवसैनिकांच्या मनाचा बांध फुटला... हीच ती वास्तू जिथं बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोपटं रुजवलं... हीच वास्तू जी शिवसेनेच्या अनेक चढउतारांची साक्षीदार बनली...हीच वास्तू जी तमाम मराठी माणसाच्या सुख-दु:खात सहभागी झाली...पाठीशी भक्कम पणानं उभी राहिली...तमाम मऱ्हाठी मुलुखाची आधारवड बनली...अशा या वास्तूत बाळासाहेबांचं पार्थीव आल्यानंतर क्षणभर ही वास्तूही गहिवरली..! आणि आता आपण पोरकं झाल्याची भावनेनं अंत्ययात्रेतला विराट जनसमुदाय व्याकुळ झाला...


senabhavanसेनाभवनही गलबलंय...
सेनाभवन ही शिवसेनेची केवळ एक वास्तू नाही. शिवसेनेची सारी व्युहरचना बाळासाहेबांनी इथूनच केली. सेनाभावनावरचे आदेश शिरसावंध्य मानून शिवसैनिक तळहातावर शीर घेऊन लढला. सुरूवातीच्या काळात बाळासाहेबांचा सर्वाधिक राबता याच वास्तूत होता. त्यामुळंच सेनाभवन हा शिवसेनेचा चालता-बोलता इतिहास बनलाय. त्यामुळंच आज सेनाभवनही आठवणींनी गलबलून गेलंय.

 


शिवाजी पार्क....

शिवाजी पार्क आणि बाळासाहेब यांचा ऋणानुबंध एवढा घट्ट आहे की बाळासाहेबांशिवाय शिवाजी पार्क नाही. शिवसेनेचा पहिला भव्य मेळावा याच शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर दसरा मेळाव्याची परंपरा. या मैदानानं चार दशकांहून अधिक काळ एकच नेता एकच मैदान आणि लाखोंचा जनसमुदाय पाहिलाय. त्याअर्थान हा एक जागतिक विक्रमच आहे. याच मैदानावर बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यविधीही झाला. आज याच शिवाजी पार्कवर शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणसांचा महासागर जमलाय...प्रत्येक जण एक, एक पणती लावतोय....बाळासाहेबांसाठी!

 

आमची ही आठवण, पहिल्या दसरा मेळाव्याची...
२३ ऑक्‍टोबर, १९६६ रोजी ‘मार्मिक’ मध्ये पहिल्या पानावर बोलकं व्यंगचित्र आणि मजकूर छापून आला. 'रविवार, ३० ऑक्‍टोबर, सायंकाळी ५.३० वाजता शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा.’
‘स्वत:च्याच राज्यात स्वत:ची चाललेली ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसानं या मेळाव्यास जातीनं उपस्थित राहिलंच पाहिजे. पिचक्‍या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. ‘जय महाराष्ट्र’ आणि व्यंगचित्र होते की, अपेक्षाभंग, अन्याय, उपर्‍यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणार्‍या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे.


वयग चतरया व्यंगचित्रातील आशयामुळं ३० तारखेच्या मेळाव्याला शिवाजी पार्कवर चार लाख मराठी जनता गोळा झाली. वसंतराव देसाई यांनी समरगीत गाऊन वातावरण धुंद केलं आणि शाहीर साबळे आणि पार्टीचे महाराष्ट्रगीत आणि ‘आंधळं दळतंय’ मधील गाणी मराठी माणसाला जाग करून गेली. पद्माकर अधिकारी, भालचंद्र ठाकूर, बिरनारे, गोविंदराव शिर्के, रामराव आदिक आणि बाळासाहेब या सर्वांनी कसरतीचे प्रयोग कौतुकानं पाहिले. ऋषितुल्य प्रबोधनकार ठाकरे व्यासपीठावर आले. त्यांनी छत्रपती शिवप्रभुंच्या पुतळ्याला वंदन केलं आणि सभेत बोलताना ते म्हणाले, “अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दाचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचंल तर त्याचा काय परिणाम होईल. याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यकाळांत पाहायचं असेल तर ते पहायला मिळतील.” ऍड. बळवंत मंत्री म्हणाले, “सकाळी उठलं की भैय्या’, रस्त्यावर ‘सिंधी’, ऑफिसात गेल्यावर दर्शन कुणाचं ‘यंडुगुंडु’, दमून भागून घरी आलात तर ‘यह बम्बई है’.” तर रामराव आदिक म्हणाले, “ठाकरे यांनी जे महान काम केलेलं आहे ते तुम्हाला पटलेलं आहे. पण सरकारला पटवून देण्याची आज गरज आहे, म्हणून आम्हाला ‘शिवसेने’ची स्थापना करावी लागली.” प्रा. स. अ. रानडे यांनी “मराठी माणसांनो व्यापारात मागं राहू नका” असं सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “असं हे दृश्य आहे की जो कोणी इथं आला नसेल तो दुर्दैवीच म्हटला पाहिजे. मला वाटतं महाराज जर इथं असते तर त्यांचं घोडंसुध्दा उधळंल असतं! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ दसर्‍याच्या दिवशी होणार होता. पण तो लांबला. कारण महाराजांना असं वाटलं असेल की काय उपयोग आहे येऊन या शिवाजीपार्कवर? जिथं माझा मराठी माणूस भेकड, नेभळट, नामर्द झालेला आहे, तिथं पार्कमध्ये भय्ये हिंडताहेत चुरमुरेवाले, खाणारेदेखील उपरेच. म्हणून महाराजांनी ठरवलं असेल की प्रथम हा शिवसेनेचा मेळावा पहातो, मराठी माणूस जिवंत आहे की नाही, ते बघतो आणि तो जिवंत असेल तर मग १३ ला नाही ६ तारखेला येतो! जे आमच्यावर आरोप करताहेत त्यांना मला सांगायचं आहे, की जर मराठी माणूस हा जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित मनोवृत्तीचा असता तर सदोबाची ही मुंबई कॉस्मोपोलीटन झालीच नसती. कारण आम्ही विशिष्ट दृष्टिकोनांतून पाहिलं की आपण सगळे भारतीय आहोत. ते भक्‍तवत्सलम, मुख्यमंत्री मद्रास म्हणतात की, ज्याला उत्तम तामीळ येतं त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल.
आम्हालाही आमच्या राज्यकर्त्यांना हेच सांगायचंय, की ज्याला उत्तम मराठी येतंय त्यालाच या राज्यात नोकरी मिळेल, हाऊसिंग गाळा मिळेल. होय, मी प्रांतीय आहे, जातीय आहे, संकुचित वृत्तीचा आहे. ‘हिंदी’त आलेल्या फतव्याला केराची टोपली दाखवा, हे म्हणणार्‍या कामराजांनी महाराष्ट्राला राष्ट्रवाद शिकवू नये! महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग असा आरोप करतात की, ‘शिवसेना’ हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचं कुंपण घालीत आहात. पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रध्देचं आहे.”
या शिवसेनेच्या पहिल्यावहिल्या मेळाव्यावर टीकाकारांनी मजबूत टीका केली होती. तरीसुध्दा केवळ मुंबईतीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस जागा झाला. त्यामुळंच तर बाळ केशव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून मऱ्हाटी मुलखात उदयाला आले आणि अमर बनून राहिले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.