टॉप न्यूज

वाह रं मुंबईच्या पठ्ठ्या...!

ब्युरो रिपोर्ट, पुणे
कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याची जिद्द बाळगून असणारा नरसिंग यादव या मुंबईतील पठ्ठ्यानं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला. भोसरीतील लांडगे क्रीडानगरीत लाखभर कुस्तीप्रेमींच्या साक्षीनं नरसिंगनं मुंबईच्याच सुनील साळुंखेवर 7-0 असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी किताबाच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणारा नरसिंग यादव हा पहिलाच मल्ल आहे. या हॅटट्रिकमुळं त्याचं नाव कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणार आहे.

 

kusti thumb ...आणि हॅटट्रिक साधली

गेल्या आठवडाभरापासून भोसरीत सुरु असणाऱ्या या स्पर्धांमुळं अवघी पिंपरी-चिंचवड नगरी कुस्तीमय होऊन गेली होती. नरसिंग यादव विरुद्ध सुनील साळुंखे यांची अंतिम कुस्ती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते सायंकाळी सव्वासात वाजता लावण्यात आली. तोडीस तोड अशी ही कुस्ती असल्यानं सर्वांचे श्वास रोखले गेले होते. नरसिंगनं गेले सलग दोन वर्षं 'महाराष्ट्र केसरी' किताबावर नाव कोरलं होतं. त्यामुळं त्याची सरशी होऊन तो हॅटट्रिक करणार का त्याला चितपट करुन सुनील साळुंखे हा किताब पटकावणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. लढतीच्या सुरुवातीलाच नरसिंगनं आपल्या कुस्तीचं अप्रतिम कौशल्य दाखवलं. पहिल्या सेकंदाला एकेरी पट काढून दोन गुणांची कमाई केली. पुन्हा एकेरी पट काढत एक गुण घेतला. त्यानंतर नरसिंगनं एकहाती डाव टाकला व आणखी एका गुणाची कमाई केली. त्यामुळे सुनील हा बचावात्मक पवित्र्यात गेला. त्याचा फायदा घेत नरसिंगने भारंदाज डाव टाकला व तीन गुणांची कमाई केली. पहिल्या दीड मिनिटांतच नरसिंगने ७-० अशी आघाडी घेतल्यामुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं.

नरसिंगला यावेळी विजेतेपदाबरोबरच चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली. सत्कार सोहळा सुरु असताना सत्कार मूर्ती आणि प्रेक्षकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कुस्तीच्या आखाडय़ावर नामवंत मल्लांचे सत्कार सुरू असतानाही अशीच पुष्पवृष्टी करण्यात येत होती.सलग दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ची किताब पटकावल्यानं यावेळी जिकण्याचा आत्मविश्वस होताच. ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून द्यायचे, हेच आता माझे यापुढचे लक्ष्य आहे, असं नससिंगनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

 


‘महाराष्ट्र केसरी’ची हॅटट्रिक
'२०११मध्ये प्रथम महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरल्यानंतर नरसिंगनं अपेक्षेप्रमाणं २०१२ मध्ये गोंदियात झालेल्या ५६व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय चौधरीवर मात करत अजिंक्यपद पटकावलं आणि सलग दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा पटकावली. महाराष्ट्र सरकारनंही त्याचा छत्रपती पुरस्कार देऊन गौरव केलाय. भारत सरकारतर्फे आपापल्या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणारा अर्जुन अॅवॉर्ड देऊन नरसिंगचा गौरव केला.

 

narsingकुस्तीपटूच बनायचं स्वप्न....
'भारत4इंडिया'शी बोलताना त्यानं आयुष्याचा पट उलगडताना मी देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करीन, असा आशावाद बोलून दाखवला होता. या विजयानं त्या आठवणी ताज्या झाल्यात.
नरसिंगचं लहानपण मुंबईतील जोगेश्वरी या उपनगरात गेलं. घरची श्रीमंती नव्हती, तो एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला. पण त्याला लहानपणापासूनच कुस्तीचं वेड. मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या बघायला तो जायचा. मल्लांचं बलदंड, पीळदार शरीर, त्यांचे जिंकण्याचे डावपेच, जिंकल्यानंतरचा त्यांचा आनंद सारं काही अनुभवण्यात त्याला एक गंमत वाटायची. शाळेत असल्यापासून डॉक्टर, इंजिनीयर न बनता आपण कुस्तीपटूच बनायचं हे स्वप्न त्यानं लहानपणापासून मनाशी ठाम केलं होतं. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यानं कुस्तीच्या आखाड्यात डाव खेळायला सुरुवात केली. यासाठी त्याला त्याच्या वडिलांचीही साथ मिळाली. शालेय, महाविद्यालयीन पातळीवर खेळताना बऱ्याच स्पर्धा त्यानं जिंकल्या. त्यामुळं महाविद्यालयानंतर कुस्तीमध्येच करियर करायचं, त्यानं मनाशी पक्कं केलं होतं. वडील पंचमसिंग यादव हे स्वत: कुस्तीपटू. त्यामुळं त्यांनाही कुस्तीची आवड असल्यानं ते लहानशा नरसिंगला घेऊन कुस्तीच्या आखाड्यात जायचे. त्यांनाही आपल्या मुलानं कुस्तीतच नाव कमवावं, असं मनोमन वाटत होतं. यात वडिलांचा पारंपरिक दुधाचा धंदा असल्यामुळं घरात दुधा-तुपाला तोटा नव्हता. दूधदुभतं आणि कुस्ती यांचे यादवांचे तसे प्राचीन संबंध आहेत. घरातच उपलब्ध असणाऱ्या दूध, तूपावर नरसिंगची शरीरयष्टीही कुस्तीसाठी पोषक झाली होती. देशभरातील कौतुकानं आता तो भारताचा शड्डू सातासमुद्रापार ठोकायची जिद्द बाळगून आहे.

 

गादी विभागात सोलापूर तर माती विभागात कोल्हापूर विजेते
पुणे :सोलापूर जिल्हा संघानं ४४ गुण मिळवित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील गादी विभागात सांघिक विजेतेपद जिंकलं तर माती विभागात कोल्हापूर जिल्हा संघानं ४७ गुणांसह सांघिक अजिंक्यपद मिळविलं.

 


Kustiगटवार निकाल

गादी विभाग-५५ किलो-१.उत्कर्ष काळे, २.आबा अटकळे, ३.राहुल शिंदे व प्रकाश कोळेकर. ६० किलो-१.विशाल माने, २.सोनबा गोंगाणे, ३.सागर लोखंडे व किशोर गायकवाड. ६६ किलो-१.महादेव कुसुमडे, २.संदेश काकडे, ३.अजित शेळके व संजय पाटील. ७४ किलो-१.रणजित नलावडे, २.संतोष गायकवाड, ३.प्रसाद सस्ते व चंद्रशेखर पाटील. ८४ किलो-१.नीलेश लोखंडे, २.बदाम मगदूम, ३.सतीश मुंडे व सुनील शेवतकर. ९६ किलो-१.सागर बिराजदार, २.विजय गुताड, ३.गुलाब आगरकर व संतोष लव्हटे.
माती विभाग-५५ किलो-१.शरद पवार, २.भरत पाटील, ३.विनोद वाक्षे. ६० किलो-१.दादासाहेब सरवदे, २.अरुण खेंगळे, ३.देवानंद पवार. ६६ किलो-१.बाबा मदाने, २.अंगद शेठ, ३.कुमार शेलार. ७४ किलो-१.रवींद्र करे, २.विश्वंभर खैरे, ३.जयदीप गायकवाड. ८४ किलो-१.विलास डोईफोडे, २.सरदार सावंत, ३.अनिल जाधव. ९६ किलो-१.साईनाथ रानवडे, २.सागर सुतार, ३.सारंग जमादार.

 

सागर बिराजदानं पटकावलं सुवर्णपदक
शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम लढतींपैकी गादी विभागात रुस्तुम-ए-हिंदू कै. हरिश्चंद्र तथा मामा बिराजदार यांचा मुलगा सागर याने ९६ किलो विभागात सुवर्णपदक जिंकले. त्याने आपल्या वडिलांचा कुस्तीचा वारसा पुढे चालविताना येथे अंतिम लढतीत विजय गुताडविरुद्ध अप्रतिम कुस्ती केली. त्याचे कौशल्य पाहून अनेकांना मामांची आठवण आली. अन्य लढतीत आंतरराष्ट्रीय मल्ल रणजित नलावडे याने अपेक्षेप्रमाणे गादी विभागातील ७४ किलो गटात सुवर्णपदक जिंकले तर रवींद्र करे याने ७४ किलो माती विभागात सुवर्णमय कामगिरी केली. पुण्याच्या साईनाथ रानवडे याला माती विभागातील ९६ किलो गटात सुवर्णपदक मिळाले.

 

 

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.