टॉप न्यूज

चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा महासागर!

ब्युरो रिपोर्ट, मुंबई
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळलाय. राज्याच्या नव्हे तर देशाच्या कोनाकोपऱ्यातून लेकराबाळांसह लोकं माथा टेकवून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलीत. पंचशिलेचे झेंडे, फिती यामुळं चैत्यभूमी परिसराला निळाईची भरती आली असून 'जय भीम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमू्न गेलाय. लोकांना सुविधा ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यंदाही गर्दीचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज आहे.
 

 खेड्यापाड्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी त्यांच्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्यात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं.

6पुस्तक स्टॉलवर झुंबड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे जथ्थे गेल्या तीन दिवसांपासून चैत्यभूमीवर धडकताहेत. काल सायंकाळपासूनच चैत्यभूमीकडं जाणारे सर्व रस्ते आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीनं भरून वाहत होते. बाबासाहेबांचा जयजयकार करीत, रांगेनं दर्शन घेऊन ही मंडळी प्रतिमा, तसंच आंबेडकरी चळवळीच्या गीतांच्या कॅसेट्सची खरेदी करीत असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय. चैत्यभूमीवर पुस्तकांचे सुमारे साडेतीनशे स्टॉल्स असून खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचं चित्र आहे.

 

कडक बंदोबस्त, चोख व्यवस्था
मुंबई महापालिकेनं पाणी, निवारा, शौचालयं, स्नानगृहं आदी व्यवस्था उपलब्ध केल्या आहेत. सरकारी रुग्णालयांची आरोग्य पथकं रुग्णांवर उपचार करीत आहेत. सेवाभावी संस्था-संघटना अन्नदान, पाणीवाटप करीत आहेत. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याची घोषणा झाल्यानं अभिवादन केल्यानंतर सर्वांचीच पावलं इंदू मिलकडे वळत आहेत. आपल्या दैवताचं स्मारक कसं असेल, याची आता सर्वांना उत्सुकता आहे. त्याबाबत केंद्र सरकारतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काही घोषणा करतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.

 

4महामानवाचे महापरिनिर्वाण

सहा डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलिपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेत बाबासाहेबांचं निधन झालं. दिल्लीहून त्यांचं पार्थिव विमानातून रात्री सव्वातीनला मुंबईत आणण्यात आलं. रात्री सांताक्रूझ विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधे त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अॅम्ब्युलन्समधे खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. सांताक्रूझ ते दादर हे पाच मैलाचे अंतर पार करण्यासाठी तीन तास लागले होते. पाच वाजून पाच मिनिटांनी अॅम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक वाट पाहात होते. धीरगंभीर वातावरणात 'बुद्धं शरणं गच्छामी'चा घोष होत होता. तिथं उसळलेल्या लोकांच्या प्रचंड गर्दीवर काबू मिळवणं पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यर्कत्यांना अशक्य होत होतं. सव्वापाच वाजता बाबासाहेबांचे पाथिर्व अॅम्ब्युलन्समधून उतरवण्यात आलं. तेव्हा जनसमुदायाच्या अश्रुंचा बांध फुटला. अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली. सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. सुमारे बारा लाख लोक त्यात सामील झाले होते. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षा विधी झाला.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.