टॉप न्यूज

चला...सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला!

ब्युरो रिपोर्ट, नाशिक
खान्देशाला वेगळी ओळख देणारा सारंगखेड्याचा प्रसिद्ध घोडेबाजार परंपरेप्रमाणं दत्त जयंतीपासून सुरु झालाय. देशभरातील घोड्यांच्या व्यापाऱ्यांनी सारंखखेडा गजबजून गेलंय. विविध नस्लींच्या आणि शुभशकुनी पंचकल्याणी सारखे विविध प्रकारचे घोडे इथं पहायला मिळतायत. 20 एकरांवर भरलेल्या बाजारात आजअखेर दोन हजार घोडय़ांची आवक झाली आहे. दोन दिवसांत 79 घोडय़ांची विक्री होऊन एकूण 19 लाख 25 हजार 700 रुपयांची उलाढाल झालीय. घोडा हा किती चपळ आणि उमदं जनावरं आहे, याची प्रचिती या बाजारात नजर टाकताना येते.
 

15 दिवसांचा बाजार

खान्देशातील सारंगखेडा हे तापी नदीच्या तीरावर वसलंय. या ठिकाणी साधारणत: 300 वर्षांचे एकमुखी दत्तमंदिर आहे. या जागृत देवस्थानामुळं दर दत्त जयंतीला सारंगखेड्यात यात्रा भरते. यावेळीच हा प्रसिद्ध घोडेबाजार भरतो आणि पुढं पंधरा दिवस सुरू राहतो. हौसे, नवसे, गवसे...असे सर्वचजण इथं आवर्जून हजेरी लावतात. या बाजाराचं संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केलं जातं. ग्रामपंचायतीतर्फे घोड्यांसाठी व आलेल्या व्यापाऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यातील व्यापाऱ्यांनी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकलेत. त्यांच्यासाठी अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. घोड्यांचे रायडींग करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलीय. घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. बाजारात घोडे दाखल झाल्यापासून वीज वितरण कंपनीकडून डिमांड काढून विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

 

6रेसचे नव्हे, सवारी घोडे
सध्या बाजारात असणाऱ्या चकचकीत महागड्या गाड्यांच काय घेऊन बसलात! त्यापेक्षा कितीतरी महागडे घोडे या बाजारात विक्रीसाठी आहेत. सीनेसृष्टीतील कलाकारांपासुन ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची नस्ल वेगळी असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पहायला मिळतात. मात्र, लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंतही इथं खरेदीसाठी येताहेत.

 


4पंजाब, मारवाड आणि काठीयावाडही...
देशभरात आणि राज्यात भरणारे घोडेबाजार कमी नाहीत. तरीही सारंगखेड्याच्या बाजाराची एक आगळी ओळख निर्माण झाली आहे. या बाजारानं पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथल्या घोड्याच्या व्यापा-यांना आकर्षित केलंय. याचं कारण, या बाजारात पंजाब, मारवाड, काठीयावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे घोडे विक्रीसाठी येतात, एकेका अस्सल जातिवंत घोड्याला 50 हजारांपासून ते 21 लाखांपर्यंत किंमत मिळते. या बाजारात प्रामुख्यानं घोड्यांच्या तीन जातींची हुकमत चालते. मारवाडी जातीचे घोडे पाच ते साडेपाच फूट उंच असतात. ते दिसायलाही आकर्षक असतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढ-या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्र वर्णी पंजाबी घोडे ‘नुकरा’ नावानं प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते. प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे शिकण्यासाठी उत्तम असल्यानं लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. शौकीन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात.

 


घोड्यांच्या 72 खोडी
घोड्यात 72 खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठं आणि कशा आहेत, ते महत्त्वाचं असतं. या खुणा मुख्यत्वे भोव-याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास ‘देवमन’ म्हटलं जातं. घोड्याच्या छातीवर दोन्हींकडं आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल तर तेही शुभ मानून त्यास ‘गंगापाट’ म्हटलं जातं. मात्र, त्याच वेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानलं जातं. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेनं खोल खड्डा असेल, तर तो घोडा चांगला समजला जातो. असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेनं खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो.‘पंचकल्याणी’ घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही पाय ढोपराखाली शुभ्र असतात आणि त्याच्या चेह-यावर पांढरा पट्टा असतो, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना ‘जयमंगल’ असं म्हटलं जातं, अशी माहिती हा बाजार भरवणाऱ्या रावळ कुटुंबियांचे वारस जयपालसिंह रावळ यांनी दिली.

 


शहादा बाजार समितीला उत्पन्न
घोडेबाजारावर सारंगखेडा ग्रामपंचायत आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियंत्रण आहे. या बाजारात होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर शेकडा एक टक्का आकार लावला जातो. त्याचप्रमाणं एक रुपयाला पाच पैसे या दरानं शुल्कही घेतलं जातं. पंधरा दिवस चालणाऱ्या या घोडेबाजारामुळे सारंगखेडा परिसराच्या अर्थकारणालाही चालना मिळते. गवत विकणारे, घोड्यांच्या साज-श्रृंगाराचे साहित्य विकणारे, हॉटेल व्यावसायिक अशा विविध घटकांना या बाजारामुळे रोजगार मिळत असल्यानं सारंगखेडा सध्या खुषीत आहे.
पाययवाटेची सडक झाली. पुढं साधे रस्ते झाले. हळूहळू त्यांचं डांबरीकरण झालं. एकपदरी महामार्ग झाला. तो आता दोन पदरी, चार पदरी, झाला. द्रुतगती महामार्ग आले. त्यावर मर्सिडीजसारख्या चकचकीत गाड्यांमधून आरामात सुसाट वेगानं जाता येतं. तरीही माणसांचं एकेकाळंच दळणवळणाचं मुख्य साधन असलेल्या घोड्याचं वेड काही जात नाही. सारंगखेड्याचा भरात आलेला घोडेबाजार त्याचीच साक्ष देतोय. चला तर मगं जाऊया... सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला!

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.