सेंद्रीय शेतीबद्दलची माहिती
रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडं वळण्याचा ट्रेंड कशा पद्धतीनं सुरू आहे. सेंद्रीय शेतीत नवीन कोणकोणते प्रयोग होतायत, याची माहिती या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांना मिळतेय. ग्राहकांना रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेलं धान्य, भाज्या आणि फळांची खरेदी करण्याची संधीही या प्रदर्शनानं दिलीय.
शेतकऱ्यांनी मार्केटिंग शिकायला हवं
शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव माहीत असतो. पण तो त्याला कधीच मिळत नाही. शेतमालाला योग्य किंमत मिळण्यासाठी गरज असते ती मार्केटिंगची आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची. पण वाहतूक सुविधा आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा नसल्यानं त्यांना आपला माल एकतर जागेवर विकावा लागतो किंवा व्यापाऱ्यांना विकावा लागतो. या दोन्हींमुळं त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांना मालाचा योग्य भाव मिळाल्यास त्यांचा चांगला आर्थिक फायदा होईल. इतरांकडं आपला माल सोपवण्यापेक्षा शेतक-यांनी आपला माल विकल्यास त्यांना ग्राहकांकडून चांगला मोबदला मिळण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च मार्केटिंग शिकून आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवा, तरच त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल, असं मत अभिनव फार्मसी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी सांगितलं.
राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा सहभाग
या प्रदर्शनात सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित केलेली फळे, भाज्या, धान्य अशा अनेक उत्पादनांची विक्री करण्यात आली. सातारा, कोल्हापूर, सांगली, धुळे जिल्ह्यातील 23 हजार शेतक-यांचा सहभाग असलेला हा फार्मर्स क्लब आहे. त्यामुळं कोल्हापूरचा गूळ, साता-याची फळे अशी प्रत्येक ठिकाणची चांगली, कसदार कृषी उत्पादनं घेऊन शेतकरी या प्रदर्शनात आले होते. यात प्रदर्शन आणि विक्री बरोबरच सेंद्रीय शेती आणि उत्पादनांच्या वापरामुळं होणारे फायदे यावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते.
बचतगटांचा सहभाग
अभिनव महिला शेतकरी मंडळाचे तांदळाचे उत्पादन, सातारा येथील प्रगती पुरुष शेतकरी बचत गटाची सेंद्रिय हळद आणि भूईमुगाच्या शेंगा तसंच अभिनव फार्मर्स क्लबची सेंद्रिय भाजी आणि फळे ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कामशेत येथील महिलांनीच एकत्र येऊन अभिनव महिला शेतकरी मंडळाची स्थापना केलीय. वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या या मंडळानं सुरुवातीला खाकरा, चटणी असे घरगुती पदार्थ विकले. पण गेल्या काही महिन्यांपासून या महिला सेंद्रिय तांदळाचं पीक घेतायेत. त्यात हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी, कोळम अशा तांदळाचं उत्पादन आणि विक्री त्या करतायेत. आणि पीक घेण्यापासुन तर ते विकण्यापर्यंत सर्वच स्तरांवर महिला काम करतायेत.
पुरुष बचत गटही आघाडीवर
प्रगती पुरुष शेतकरी गटानं आपली सेंद्रीय उत्पादनं आणुन या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. त्यात हळद, भुईमूग अशा पिकांचा समावेश होता. हळद तसंच भुईमूग याची शुध्दता टिकवण्यासाठी, हळदीचं मूळ रुप, रंग टिकून राहण्यासाठी तीचं सेंद्रीय पद्धतीनं घेतलं जाणारं उत्पादन फायदेशिर ठरतं. ओली हळद, हळदीच्या रंग, सुगंध या शुध्दतेमुळं ग्राहकांची पावले आपोआप त्यांच्या स्टॉलकडे वळत आहेत.
अशा प्रदर्शनांची गरज
सेंद्रीय शेती उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवायला अशा प्रकारची प्रदर्शनं ठिकठिकाणी भरवणं गरजेचं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल आणि ग्राहकांनाही सेंद्रीय उत्पादनं सहज उपलब्ध होतील, अशी आशा आयोजकांनी बोलून दाखवली.
Comments
- No comments found