टॉप न्यूज

कांद्याचं निर्यातमूल्य अखेर कमी केलं

ब्युरो रिपोर्ट , नाशिक
कांद्याचे भाव प्रतिकिलो 10 रुपयांपर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. या पार्श्वभूमीवर कांद्याचं शास्त्र समजून घ्या, असं वडिलकीचा सल्ला देताना कांद्याचं निर्यातमूल्य कमी करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलं होतं. त्याप्रमाणं कांद्याचं निर्यातमूल्य सर्वात कमी 150 डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयानं घेतला. नाताळ हा सुट्टीचा दिवस असूनही कृषिमंत्री शरद पवार यांनी मंत्रिगटाची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत हे निर्यातमूल्य सर्वात कमी आहे.

 

कांद्याचं आगार असणारा नाशिक जिल्हा कांद्याचे भाव पडल्यानं गेल्या आठवडाभरापासून धुमसतोय. त्यापार्श्वभूमीवर नांदगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कान उपटलेच शिवाय शहरी ग्राहकांनाही खडे बोल सुनावले. तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील तहसील व पंचायत समितीच्या नव्या इमारतींचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

pawarकाय म्हणाले पवार...?
गणपतीच्या दरम्यान कांद्याचे भाव गगनाला पोहोचले. माध्यमांमध्ये आरडाओरड सुरु झाला. संसदेमध्येही चर्चा झाली. त्यावेळी कांदा उत्पादकांचं दुखणं मी समजावून घेतलं. मात्र, त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकही मायेचा पूत माझ्या बाजूनं उभा राहिला नाही. तुमची बाजू जे मांडतात त्याची नोंद घेण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतलीत, अशी जबर पवार यांनी केली. कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून भक्कमपणे शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहूनही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त झाली. सध्या ढासळणाऱ्या दराला सावरण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणण्याबाबतचा निर्णय होईल, असंही पवार यांनी सांगितलं.

 

रोजच्या खर्चात कांद्यावर खर्च किती?
रोजच्या खर्चात कांद्याचा वाटी किती, असा कळीचा प्रश्न उपस्थित करीत बिसलरी पंधरा रुपयांत व मॉलमध्ये दोनशे रुपयांचे तिकीट काढून सिनेमा बघताना आपण असा विचार का करत नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. देशात सर्वच राज्यांत वेगवेगळी पिकं घेतली जातात, मात्र दिल्लीत काहीच पिकत नाही. तिथं पिकतं फक्त अफवांचं पीक. कांद्याचे दर चढले तर मला दोष, आता ढासळणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्‌द्‌ल कोणी चकार शब्द का बोलत नाही, असंही पवार म्हणाले.

 

...तर शेतकरी उद्ध्वस्त होईल.
केवळ कांद्यामुळं दिल्लीत दोनदा सरकारे आली. आता अरविंद केजरीवाल कांद्याचे दर घटविणार आहेत, असा चिमटा घेत पवार यांनी दर वाढले तरी फायदा, कोसळले तरी पुन्हा फायदाच मग कांदा उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त होणार नाही का? असा जळजळीत प्रश्न विचारला.जर तसे घडत असेल, तर शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहीनच. व्यापाऱ्यांनी केवळ तेजी- मंदीपुरते सीमित राहू नये, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

 

onion3नाशिक जिल्ह्यातील लिलाव बंद...
दरम्यान, केंद्र सरकारनं कांद्यावरील किमान निर्यातमूल्य (एमईपी) 350 डॉलरपर्यंत आणूनही कांदा दरात कोणतीच वाढ न झाल्यानं शेतकऱ्यांनी लासलगाव व पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांतील लिलाव सोमवारी बंद पाडले. आधी एमईपी कमी करण्यासाठी आंदोलन केलं, आता "एमईपी' कमी होऊनही दर का वाढवीत नाही, असा व्यापाऱ्यांना सवाल करीत, आता व्यापाऱ्यांना माल द्यायचाच नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. पहिल्या सत्रात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लिलाव झाल्यानंतर सरासरी दर 950 च्या वर वाढत नसल्यानं अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव थांबवले. बहुतांश शेतकऱ्यांनी माल परत नेण्यावर भर दिला. लासलगाव, पिंपळगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या संपूर्ण 15 बाजार समित्यांतील लिलाव बंद पडले होते.

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांत असंतोष
गेल्या सप्ताहात केंद्रानं एमईपी अगोदर 1150 डॉलरवरून 800 पर्यंत कमी केली, त्यानंतर दोन दिवसांत 800 वरून 350 डॉलरपर्यंत आणली. एमईपी कमी झाल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दरम्यान, नंतरही सरासरी दर 980 च्या वर वाढलेच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. परिणामी, सोमवारी जिल्हाभरातील बाजार समित्यांतील लिलावात दर 1000 च्या वर न वाढल्याने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे लिलाव बंद पाडले होते. आजही लिलाव सुरु होऊ शकले नाहीत.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.