टॉप न्यूज

कोकण झालं हाऊसफुल्ल...!

मुश्ताक खान, रत्नागिरी
नववर्षाच्या स्वागताचे प्रत्येकाचे बेत पक्के झालेत. बऱ्याच जणांनी निसर्गरम्य कोकणात गेलेत. 'यावा कोकण आपलाच आसा' या कोकणी रीतीरिवाजाप्रमाणं स्वागतासाठी कोकणही सज्ज झालंय. आताच सुमारे साडेतीन लाख पर्यटक कोकणात दाखल झाले असून जवळजवळ सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीत. हिरवाकंच भरलेला निसर्ग, मा़डाच्या बनांनी झाकोळलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, चावरीबावरी थंडी, सेवेला तत्पर असणारी फणसासारखी माणसं, हे इथलं वैशिष्ट्य. इथल्या प्रत्येक भागात काही ना काही विशेष आहेच. त्यामुळं निसर्गाचा आस्वाद घेत फिरताना इथं वेळ कसा जातो, तेच कळत नाही.
 


kokan 2 bharat4india.com

पर्यटकांची पसंती दापोलीला...
दापोली तालुक्यात मुरूड इथं किनाऱ्याला भेट देण्यासाठी पर्यटक हमखास येतात. येथील खासियत म्हणजे इथं असलेलं वॉटरस्पोर्ट, सॅण्ड बायकिंग आणि पॅरासिलिंग. पॅरासिलिंग असलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव ठिकाण आहे. जवळजवळ २८ प्रकार इथं पाहायला मिळतात. या खेळांबरोबरच मुरूड ही महर्षी कर्वेंची भूमी आहे. त्यांच्या घराला भेट देणं हा वेगळा अनुभव आहे. आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती, उन्हवरेतलं गरम पाण्याचं कुंडही पाहता येतं. हर्णेचा मासळी लिलावही पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतो. दापोली शहरात कोकण कृषी विद्यापीठाला तर आवर्जून भेट द्यायलाच हवी. दाभोळमध्ये तर अत्यंत प्राचीन बंदर आहे. इथून व्यापारी जहाजं जगभर जायची. इथली अंडा मशीद तर खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळं दापोलीहून परतताना अमकं पाहायचं राहूनच गेलं, अशी हुरहूर प्रत्येकालाच लागून राहते.

 

रत्नागिरीतला काळा-पांढरा समुद्र खुणावतोय...
रत्नागिरी शहरातही अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. यात भाट्ये किनाऱ्याला तर पर्यटक हमखास जातात. त्याचबरोबर गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बंदरही प्रसिद्ध ठिकाण आहे. भाट्ये बीच आणि मांडवी बंदर इथं एका गोष्टीत साम्य आहे ती म्हणजे इथल्या किनाऱ्याच्या रंगात. इथला किनारा हा काळा आहे म्हणून याला काळा समुद्र म्हणतात. पर्यटकांबरोबर स्थानिकही इथं मोठ्या संख्येनं येत असतात.
रत्नागिरीत आलात तर काही गोष्टी नक्की टाळू नका. ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा त्याच्याच शेजारी असलेला थिबा पॉईंट, भगवती किल्ला, लाईट हाऊस आणि मस्त्यालयाला तर भेट द्यायलाच हवी. रत्नागिरी शहराच्या आसपासचं पावस आणि गणपतीपुळं तर खास प्रसिद्ध आहे. गणपतीपुळेचा किनारा तर बघण्यासारखाच आहे. तिथंच असणारं प्राचीन कोकणही लोकांना खुणावतं. आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुतांचं मालगुंड गावही गणपतीपुळ्यापासून दोन किलोमीटरवरच. त्यांचं स्मारक पाहिलंच पाहिजे.

 

चिपळुणात साकारली शिवसृष्टी...
चिपळूणला जर भेट द्याचं ठरवलं असेल तर डेरवण इथल्या शिवसृष्टीला नक्की भेट द्यायलाच हवी. कारण इथं छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं जीवंत दर्शन घडतं. शिवसृष्टीकडं जातानाच तुम्हाला किल्ल्यात गेल्याचा भास होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मावळे उभे आहेत. घोडेस्वार शिपाई किल्ल्याचं रक्षण करताना दिसतात. अर्थात, हे सगळे पुतळे आहेत. पुतळ्यांच्या माध्यमातून सर्व इतिहास आपल्याला एका मिनिटात लक्षात येतो. वाचण्याची आवश्यकताच भासत नाही. त्याचबरोबर कोकणाला शापित करणाऱ्या परशुरामाचं मंदिर देखील चिपळूणच्या परशुराम घाटात बघायला मिळतं.
गुहागरचं निखळ वातावरण
गुहागर तालुक्याचे समुद्रकिनारे इथली ताकद आहेत. इथले समुद्रकिनारे अत्यंत शांत आणि स्वच्छ आहेत. दापोलीत येणारे पर्यटक दाभोळमार्गे फेरीबोटीनं गुहागरमध्ये जातातच. वेळणेश्वर आणि हेदवीला तर भेट द्यायलाच हवी. हेदवीतलं बामणघळ तर आकर्षणाचं ठिकाण. इथं लाटांच्या माऱ्यानं खाच पडली आहे, त्यामुळं समुद्राच्या लाटा उंचच उंच उठतात.

 

संगमेश्वर मंदिरांचं गाव
संगमेश्वरमध्ये असलेल्या कसबा गावात मंदिराची संख्या साडेतीनशेच्या आसपास आहे. त्यामुळं संगमेश्वरला मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. संभाजीराजेंचं स्मारकही कसबामध्येच आहे. इथंच संभाजी राजांना पकडण्यात आलं होतं. इथंही पर्यटक, मोठ्या संख्येनं येत असतात.
हापूस आंब्याचं शहर देवगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडला खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती इथल्या चवदार आणि रसरशीत हापूस आंब्यांमुळे. देवगडचा आंबा जगभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर देवगडमध्ये असलेल्या पवनचक्क्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात. इथला समुद्रकिनाराही पर्यटकांना भुरळ घालतो.

 

पाण्यामधील मालवण किल्ला
मालवणमधला अतिशय सुंदर असा मालवण किल्लाही पर्यटकांना सतत खुणावत असतो. याच तालुक्यात असलेल्या तारकर्लीला तर भेट द्यायलाच हवी. काश्मीरप्रमाणं इथे हाऊस बोटिंगचा आस्वाद घेता येतो. देवबाग बीचचंही पर्यटकांना विशेष आकर्षण आहे.

 

लाकडी खेळण्यांचं शहर सावंतवाडी
सावंतवाडी शहर लाकडी खेळण्यांसाठी अवघ्या देशात प्रसिद्ध आहे. इथली खेळणी सातासमुद्रापारही जातात. पर्यटक खास खेळणी घेण्यासाठी सावंतवाडीला भेट देत असतात. खेमराज राजे-भोसलेंचा राजवाडा सावंतवाडीची शान आहे. हा राजवाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यापलीकडं राजापूरची गंगा, आंबोलीचा धबधबा, वेंगुर्ले, मार्लेश्वर, हरिहरेश्वर यांसारखी अनेक गावं आहेत, जिथला निसर्ग अनुभवायलाच पाहिजे.

 


kokan 3 bharat4india.comअलिबागही पर्यटकांनी हाऊसफुल्ल

रायगड जिल्ह्यातही पर्यटकांनी केलेल्या गर्दीमुळं प्रमुख पर्यटन स्थळांवर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. इथल्या अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर आणि दिवेआगर इथं पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अलिबाग आणि मुरूड परिसरात तर गेल्या चार दिवसांत २५ ते ३० हजार पर्यटकांनी भेट दिलीय. नाताळाच्या सुट्टीपासूनच पर्यटकांची संख्या वाढलीय. यानिमित्तानं डीजेसह बोटिंग, पॅरासेलिंग, जॉईंट बॉल यासारख्या खेळांचा आनंद पर्यटक लुटतायत.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.