हुकमी एक्का...!
शुगर बेल्ट' असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद मोठी असून, ऊस उत्पादक शेतक-यांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यामुळं हा 'हुकमी एक्का' आपल्याला मिळावी यासाठी सेना-भाजपचे नेते स्वाभिमानी पक्षाला महायुतीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. मध्यंतरी आम आदमी पक्षाचे दरवाजेही आम्हाला खुले असल्याचे शेट्टी यांनी म्हटले होते. त्यामुळं शेट्टी नेमकं कुठं जाणार, याविषयी तर्कवितर्क केले जात होते. परंतु, अखेर त्यांना आपल्याकडं खेचण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले.
शेकापलाही बरोबर घेणार....
राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीसोबत लढणार आहे. मात्र, जागावाटप कसे असेल हे अजून ठरलेलं नाही, असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं. महायुतीमध्ये आता शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश झाला असून, लवकरच आम्ही शेतकरी कामगार पक्षालाही आमच्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही मुंडे यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या समन्वय समितीमध्ये आता राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचाही समावेश करण्यात आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीसोबतच लढवेल, असेही गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
मतांसाठी नव्हे मुद्द्यांसाठी लढाई!
आम्ही केवळ मतांसाठी लढत नसून, मुद्द्यांवर लढतो. भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी चार महिन्यांपूर्वी आमच्यापुढे महायुतीमध्ये येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आज झालेल्या चर्चेनंतर शिक्कामोर्तब झालं. आता लोकसभा तसंच विधानसभेच्या निवडणुका आम्ही महायुतीतून एकदिलानं लढवू, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना त्याच्या घामाचं दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वचनबद्ध असून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही कदापि जाणार नाही, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांचा खरा चेहरा...
ऊसदराच्या प्रश्नावरून सातत्यानं आक्रमक आंदोलन करून राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते म्हणून समाजासमोर आलेत. राज्यात शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेमुळं 1980 च्या दशकात राज्यात शेतकऱ्यांचा आवाज घुमू लागला. जोशी यांनी कांदाप्रश्नी केलेल्या आंदोलनाची चर्चा तर सातासमुद्रपार झाली होती. याच आंदोलनातून तयार झालेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन पश्चिम महाराष्ट्रात उसप्रश्नी शेतकऱ्यांचे लढे उभारले. त्यांना शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अलिकडे शेट्टी यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीत जाऊन आंदोलन छेडले होते. आताच्या हंगामात उसदरप्रश्नी त्यांनी केलेले आंदोलनही खूप गाजले. सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणणारा राजू शेट्टी हा आजतही एकमेव नेता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर , सांगली , माढा , उस्मानाबाद , बारामती यांसह आणखी तीन मतदारसंघावर दावा करणारे राजू शेट्टी माढा मतदारसंघाबाबत अधिक आग्रही आहेत. हातकणंगले व माढा यासह आणखी दोन मतदारसंघ मिळाल्यास लगेच महायुतीत दाखल होण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि मुंडे यांच्याकडून त्यांना तसे आश्वास देण्यात आल्याचे समजते.