टॉप न्यूज

'पिफ'ला पुण्यात जोरात सुरूवात

अर्चना जाधव, पुणे
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असताना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजपर्यंतच्या प्रवासात या क्षेत्रात आपण नेमकं काय केलं आणि काय कमावलं याचा विचार करायला हवा. सध्या चित्रपटात अश्‍लीलपणा वाढतोय आणि चांगल्या गोष्टीही कमी होत आहेत, असं का होतंय याचाही विचार आवर्जून करायला हवा...हे मोलाचे विचार मांडलेत ज्येष्ठ मल्याळी दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांनी.
 

 

पुणे फिल्म फाऊंडेशनतर्फे पुण्यात बारावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) सुरू झालाय. 16 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. त्यावेळी जेष्ठ अभिनेता विनोद खन्ना आणि अदूर गोपालकृष्णन यांना जीवन गौरव पुरस्कार तर, जेष्ठ संगीतकार-गायक पंडित ह्रदयानाथ मंगेशकर यांना सचिनदेव बर्मन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना अदूर गोपालकृष्णन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा थोडक्यात आढावा घेऊन आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या.

 

film festival-7मी १९६२ मध्ये पुण्यात 'एफटीआयआय' मध्ये (फिल्म आणि टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) शिक्षण घेण्यासाठी आलो होतो. त्याच पुण्यात हा पुरस्कार मिळतोय त्याबद्दल गोपालकृष्णन यांनी विशेष आनंद व्यक्त केला. चित्रपटसृष्टीच्या शताब्दीतील ५० वर्ष मी संघर्ष करीत आहे. हा माझा संघर्ष अजूनही सुरूच आहे. हल्ली अनेक विद्यार्थी कॅमेरा न शिकातादेखील थेट चित्रपट निर्मिती करताना दिसतात. वयाच्या १९व्या वर्षी अपघातानेच मी चित्रपटसृष्टीत अलो. आता माझे वय ६७ वर्षे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहता येते तोपर्यंत मी चित्रपटसृष्टीत कार्यरत असेन, अशा भावनाही गोपालकृष्णन यांनी बोलून दाखवल्या.

 

 

film festival-1मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य चित्रपट महोत्सवाचा दर्जा दिला जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यात वेगवेगळे चित्रपट महोत्सव होतात, त्यांतील अनेक महोत्सवांना सरकारतर्फे आर्थिक मदतही दिली जाते; पण सर्वच महोत्सवांना 'राज्य सरकारचा महोत्सव' असा दर्जा देता येणार नाही. या सर्व महोत्सवांमध्ये 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' सर्वार्थानं वेगळा असल्यानं या महोत्सवाला आम्ही तो दर्जा देऊ. सध्या राज्य सरकारतर्फे महोत्सवाला ७० लाख रुपयांचा निधी दिला जात आहे. हा दर्जा देतानाच त्यासाठीचा निधीदेखील दिला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

बॉलिवूड'च्या व्यथा मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. बॉलिवूड'मधील घटकांना मूल्यवर्धित करांसह (व्हॅट) अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्या सोडविण्यासाठी मदत करावी, असं विनोद खन्ना यांनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क, मूल्यवर्धित कर सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.

 

मला याआधी काही पुरस्कार मिळालेत, त्या वेळी ओशाळल्यासारखं होत असे, कारण त्या दर्जाचे संगीतकार समोर असायचे; परंतु अलीकडे पुरस्कार स्वीकारताना मी ओशाळत नाही, कारण आजच्या संगीतकारांनी असे काही संगीत कानाकोपऱ्यांत पोचविले आहे, की ते ऐकल्यानंतर आपलेच संगीत चांगले आहे असे वाटते, अशा शब्दात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सध्याच्या संगीतावर मार्मिक टिपण्णी केली.

 

सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर चंचला कोद्रे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, सिटीप्रईडचे अरविंद चाफळकर, लक्ष्मीकांत देशमुख, आशुतोष घोरपडे, डॉ. मोहन आगाशे, दिलीप पाडगावकर,आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

महोत्सवात जागतिक विभागातील ५०० पैकी १४, तर मराठी विभागातील ३५ पैकी ७ सिनेमे अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत. महोत्सवाची सुरुवात जल्लोषात झाली. मराठी सृष्टीतील नामवंत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या बहारदार नृत्यानं चांगली रंगत आणली.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.